#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (६.१०.२५)
# काही नात्यांना नाव नसते
#तर काही नाती ही नावापुरती असतात.
प्रकाश किरण
सुधा आणि सुधीर यांना दोन मुली. सुखवस्तू कुटुंब. दोन्ही मुलींची मोठ्या घरांत लग्ने झाली आणि परदेशी निघून गेल्या. घर सुनं झालं खरं ..पण दोघे छान ट्रीप, फिरणे यांत वेळ घालवू लागले. आणि अचानक सुधीरचे निधन झाले. सुधावर आकाशच कोसळले. मुली आल्या..सर्व कार्य केले आणि “तुझा व्हिसा झाल्यावर तुला घेऊन जाऊ” असे म्हणून निघून गेल्या.
पूर्ण खचली सुधा. शांत एकटक पहायची नुसती. जगण्याची इच्छाच संपली जणु ! सुरवातीला येणारे मुलींचे फोन कमी कमी होत गेले आणि नाते फक्त नावापुरते उरले..!
शेवटी एक दिवस मैत्रिणीच्या सांगण्यावरून सुधाने एका उच्चभ्रू वृद्धाश्रमात राहायचा निर्णय घेतला. स्वतंत्र खोल्या, उत्तम मेस, डॉक्टर्स, अटेंडेंट्स सर्व सुखसोयी..!
तिथे तिची ओळख रविजींशी झाली. हसतमुख, उमद्या स्वभावाचे रविजी..वेगवेगळ्या विषयांचे सखोल ज्ञान..सुधा हळू हळू मोकळेपणाने बोलू लागली.. तिचे नैराश्य मावळू लागले. जगण्याची आशा वाटू लागली रविजींच्या सहवासात…! जवळ जवळ तीन महिने झाले. सुधाला आश्रम आवडू लागला. आणि अचानक रविजीही जग सोडून गेले.. तिला नंतर कळले की त्यांना आधी दोन सिव्हिअर अटॅक येऊन गेले होते.
काय नाते होते त्यांचे ? प्रेम, ओढ, मैत्री, माणुसकी की अजून काही ? त्या नात्याला नावच नव्हते. तो होता एक किरण..लख्ख प्रकाश देणारा..! सुधाच्या आयुष्यात नवसंजीवन देऊन जगण्याची इच्छा पुन्हा निर्माण करणारा…ऊर्जा देणारा..!
शब्दसंख्या – 188
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

सुंदर