#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क(०६/१०/२०२५)
#स्वप्नीलकळ्या🥀
#विषय:—-“काही नात्यांना नाव नसते…
आणि काही नाती नावापुरती असतात….”
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
#अनामिक _नातं
जीवनात आपल्याला रक्ताची नाती जन्माने मिळतात तर काही नाती आपण मनाने निवडतो.
सुरभी आणि विवेकच्या अरेंज लग्नाला जवळपास दहा वर्षे झाली होती. पदरी मुलगा होता.पण इतके वर्षे संसार करूनही त्यांची मने कधीच जुळली नाही. नवरा बायकोचे नाते नावापुरते होते ,नाते बहरलेच नाही.
ह्याला कारण विवेक अतिशय‌ अबोल तर होताच पण कधीही सुरभीशी मनमोकळेपणाने बोलत ही नसे.
याउलट सुरभी म्हणजे नुसता उत्साहाचा धबधबा.अत्यंत हौशी, कलाप्रेमी ,बोलघेवडी, मनमोकळ्या स्वभावाची.
लग्नानंतर छोटीशीच अपेक्षा होती की तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची विवेकनी दखल घ्यावी, मनापासून कौतुक करावे. मनमोकळेपणाने विचारांची देवाणघेवाण करावी.
पण स्त्रीसुलभ भावना कशा असतात,पत्निच्या साथीदाराकडून काय अपेक्षा असतात ह्याची त्याला जाणीवच नव्हती .
शेवटी काय “पदरी पडलं पवित्र झालं” ह्या उक्तीनुसार सुरभी संसाराचा गाडा ओढत राहिली. हळूहळू ती पण खूप अबोल अबोल
राहायला लागली, जीवन निरस वाटायला लागले.
त्यांच्या रहात्या बंगल्यातील दोन खोल्या भाड्याने द्यायचे ठरले आणि बॅंकेत सर्व्हिस करणारा विधुर सुशांत तेथे भाड्याने रहायला आला.
थोड्याच दिवसात त्याच्या मनमोकळ्या, बोलघेवड्या स्वभावामुळे त्याचे काहीना काही निमित्याने ह्यांच्या घरी येणे-जाणे वाढले. बरेचदा विवेक घरी नसला तरी तो एकटा जीव सदाशिव असल्यामुळे तिच्या मुलासोबत क्रिकेट खेळायचा.
सुरभी सुरवातीला संकोच वाटून फार बोलत नसे पण हळूहळू ती मोकळेपणाने गप्पा मारू लागली.
दोघांच्या आवडी निवडी समान होत्या. तो सुद्धा कलाप्रेमी असल्याने त्यांच्या आवडत्या विषयावर ते भरभरून बोलू लागले. तिच्या बऱ्याच गोष्टींचे मनापासून तो कौतुक करू लागला. मनमोकळा संवाद होवू लागल्याने सुरभी आता पुन्हा आनंदी राहू लागली. तिचा चेहरा प्रसन्न दिसू लागला.
सुरभी आणि सुशांतमध्यें जे अनामिक नाते निर्माण झाले होते त्या नात्याला काय नाव द्यावे हा प्रश्नच होता ! कारण ही नुसती मैत्री नव्हती तर ते भावनिक पवित्र नाते होते की ज्या नात्यातून सुरभीच्या भावनांचा कोंडमारा नाहिसा झाला होता.
शिवाय सुशांतही जीवनात एकटा पडला असल्याने त्याचे ही सुरभी बरोबरच जुळलेले अनामिक नातं
त्याला आनंद देऊन जात होते.
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀

5 Comments

  1. या नात्याला नाव नसते पण मर्यादा खूप असतात.स्त्री कडून एखादा मेसेज जरी चुकीचा गेला की पुढे उतार असतो त्यावरून गाडी घसरणारच.स्त्रीला ठाम रहावे लागते अशा नात्यात. कथा थोडी वाढवायला हवी होती.छानच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!