#storykatta

inbound2096788551622305312.png

#storykatta
#दीर्घ कथा
@everyone
#​पुन्हा भेटशी नव्याने… भाग 4

​समीरच्या आवाजातील प्रत्येक शब्द प्रियाच्या कानावर आदळत होता. तो गाणं गात असतानाच, तिचे मन नकळत भूतकाळात, त्यांच्या कॉलेज जीवनात गेले. तिला आठवले तो दिवस, जेव्हा ती पहिल्यांदाच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसली होती. नवीन शहर, नवीन कॉलेज आणि अनोळखी चेहरे पाहून ती थोडी घाबरली होती.
​तिला आठवतं, तिच्या हातात एक पुस्तक होतं आणि ती त्यात पूर्णपणे हरवून गेली होती. आजूबाजूला खूप गोंधळ होता, पण तिला फक्त एकच आवाज ऐकू येत होता. कोणीतरी गिटार वाजवत होतं आणि एक अतिशय गोड आवाज गात होता.
​गाण्याचे बोल होते:
​”ये मौसम की बारिश,
ये बारिश का पानी,
ये पानी की बूँदें,
तुझे ही तो ढूँढे…
​ये दिल की तमन्ना,
तुम्हे ही तो ढूँढे…
ये मेरी आरज़ू,
तुम्हे ही तो ढूँढे…”

​तो आवाज ऐकून ती हळूच मान वर करून बघू लागली. तिला दिसला तो, समीर. तो डोळे मिटून पूर्णपणे गाण्यात रमला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याला बघून प्रियाच्या चेहऱ्यावर नकळत एक स्मितहास्य आलं. तोच तो क्षण होता, जेव्हा ती पहिल्यांदा त्याला भेटली आणि तिला तो आवाज मनापासून आवडला होता.

​समीर गाणे थांबवल्यावर, त्याच्या मित्रांनी त्याला खूप दाद दिली. तो सगळ्यांशी हसत-हसत बोलत होता. नंतर तो तिला कॅन्टीनमध्ये दिसला आणि त्याने तिच्याकडे बघून हसले. प्रियाने लाजून पटकन मान खाली घातली आणि पुन्हा पुस्तकात लक्ष दिले.
​या आठवणीत प्रिया इतकी हरवून गेली होती की तिला आजूबाजूचा काहीच अंदाज नव्हता. समीरचं गाणं संपलं, पण त्याच्या आवाजाने तिच्या मनात भूतकाळातल्या त्या क्षणांना पुन्हा जिवंत केलं होतं. डोळ्यांत आलेलं पाणी तिने पटकन पुसलं आणि तिने पाहिले, समीर तिच्याच दिशेने येत होता. तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती विचार करू लागली, आता काय होईल? तो पुन्हा जुने प्रश्न विचारेल का?

​समीर: “प्रिया… तू ठीक आहेस ना?”
​प्रियाने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अजूनही भूतकाळातील आठवणींची ओलावा दिसत होती. ती काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली.
​प्रियाच्या शांतपणाने समीरला थोडं अस्वस्थ वाटलं. त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. “प्रिया, मी माहीत आहे की मी अचानक तुझ्या आयुष्यात परत आलोय. पण…”
​”समीर…” प्रियाच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला. तिचा आवाज खूप हळू होता, जणू काही ती बोलत आहे की नाही हेच कळत नव्हतं.
​तिचा तो आवाज ऐकून समीरलाही त्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणी आठवल्या. कॉलेजमध्ये त्या दोघांचीही चोरून भेटण्याची जागा ठरलेली होती. कॉलेजच्या बागेतील एका जुन्या, मोठ्या आंब्याच्या झाडाखाली ते नेहमी भेटायचे. तिथे जास्त कोणी येत-जात नसे.
तिला आठवतं, एकदा तिने त्याला विचारले होते, “समीर, आपण असं चोरून का भेटतो?”
तो हसला आणि म्हणाला, “कारण आपल्या प्रेमाची ही वेगळीच गंमत आहे. चोरून भेटण्यात जी मजा आहे, ती उघडपणे भेटण्यात नाही. आपण दोघंही पकडले जाऊ नये म्हणून धडपड करतो, पण तीच धडपड आपल्या नात्याला अजून घट्ट करते.”
​त्या दिवसांची आठवण येताच प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. तिला आठवले, एकदा लेक्चर बंक करून ते दोघेही शहराच्या पलीकडच्या एका टेकडीवर गेले होते. तिथे जाऊन त्यांनी सूर्यास्त पाहिला होता. तो क्षण इतका सुंदर होता की तो त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला.
“ती आजही तिथे जात होती. त्या ठिकाणाला आणि त्या आठवणींना ती कधीच विसरू शकली नाही.”
​प्रियाने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्यालाही हे आठवत होते, हे पाहून तिला खूप आनंद झाला. पण त्याच वेळी तिला वाईटही वाटले की ते दिवस आता परत येणार नाहीत.
​त्या दोघांच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते. भविष्यात काय होणार, हे त्यांना माहीत नव्हते. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, त्यांच्या भूतकाळातील प्रेम अजूनही जिवंत होते.

​पुढे काय होईल? समीर प्रियाला कोणती मदत करेल? जाणून घेण्यासाठी वाचत रहा, पुन्हा भेटशी… नव्याने..,..
~अलका शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!