” श्री रामचंद्र कृपालु भजुमन”.. राम स्तुती 🙏

# माझ्यातली मी #
.. विकेंड टास्क…. रसग्रहण गाण्याचे..
***” श्री रामचंद्र कृपालु भजमन **( रामस्तुती )
मी राम भक्त. श्रीराम माझे आराध्य, तसेच ते हिंदू धर्मातील प्रमुख दैवत व भगवान विष्णूचे सातवे अवतार. रामायण ही मालिका मी अनेकदा बघितली. कितीही वेळा बघितली तरी समाधानाच होत नाही. रामायण या महाकाव्यातील राम हे मुख्य पात्र. रामाचे आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोरून हलत नाही. धर्म व न्यायाचा प्रतीक असलेला राम हा केवळ सत्याच्याच मार्गावर चालतो. त्यामुळे मला रामाविषयी ओढ वाटू लागली. गाण्यांमध्ये म्हणाल तर मला रामाची कुठलीही गाणी अगदी मनापासून आवडतात ऐकायला व गायला सुध्दा. रामनवमीचा उत्सव सुद्धा मी भक्तिभावाने साजरा करते. घरातील सर्व मंडळींचा पाठिंबा जबरदस्त असतो. दरवर्षी या उत्सवामध्ये मी हे गाणे आवर्जून म्हणते.

जशी काही नाती नकळत जुळतात तशीच काही गाणी नकळतच आपल्याला आवडायला लागतात. मनापासून आवडणारी जी गाणी आहे त्यातीलच हे मला आवडणार गाणं…..
” श्री रामचंद्र कृपालु भजमन ”
या गाण्याने माझ्या मनाचे बंध घट्ट होऊन रामायणातील रामावरच्या अतूट बंधाची झंकार हलकेच मनात हृदयाचा आकार घ्यायला लागली. आपल्या आवडत्या व्यक्तीपासून जसे दूर जाणे आपल्याला कठीण वाटते तसेच आपल्या आवडीचे गाणे गुणगुणल्याशिवाय वा ऐकल्याशिवाय चैनच पडत नाही .
हे एक हिंदी भजन ती एक राम स्तुती आहे. हे भजन लता मंगेशकर,सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, अनुप जलोटा यासारख्या दिग्गजांनी गायले आहे. त्यामुळे संगीतकारही भरपूर आहेत. हे गाणे मला का आवडले तर या सगळ्या गायकांची मी वेडी आहे. त्यांचे गाणे ऐकताना मन अगदी भारावून जातं. या गाण्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ मनात घर करून राहतो. ” श्री रामचंद्र कृपालु भजमन ” याच ओळीने मी भारावल्या गेले. आपलं मनच आपल्याला म्हणतं, हे मना तू रामाचे भजन कर. या पूर्ण गाण्यात रामाची स्तुती केलेली आहे. यात त्यांच्या गुणांचे व सामर्थ्याचे वर्णन गौरविण्यात आलेले आहे.
या गाण्यातील शब्द व बोल काळजात रुतून बसतात. त्यातील गाण्याचे स्वर कानात दडून राहतात. हे गाणे ऐकतांना व गातांना निरंतरसा संवाद तो आत कुठेतरी गुंजी घालत राहतो.

मला आलेला एक अनुभव…….
एकदा तामिळनाडूत लग्नाला जायचा योग आला. संबंध घरच्यासारखे असल्यामुळे त्यांनी आम्हाला आवर्जून लग्नाला नेले. त्यांच्या मुलीने तमिळ मुलाशी प्रेम विवाह केला असल्यामुळे तेथील रूढी व परंपरा त्या लग्नात बघायला मिळाली. स्वागत समारोह मध्ये गाण्याचा कार्यक्रम हा आवर्जून केला जातो. कोणी ना कोणी कार्यक्रमांमध्ये अनेक प्रकारची गाणी गायली. माझा पण नंबर त्यात लागला. मी सुरुवातीला नाही म्हणाले कारण आपण मराठी यांना काय कळणार. मग सगळ्यांनी खूप आग्रह केला. तू हिंदी गाणे गाऊ शकतेस. ते काहीतरी त्यांना नक्कीच समजेल. मग कशी तरी मी तयार झाले. थोडासा तणाव जाणवला.
मग मी आपले रामाचे भजन” श्री रामचंद्र कृपालु भजमन ” हे गाणं गायला सुरुवात केली. तत्पूर्वी मनामध्ये ‘ सा ‘ हा स्वर लावून घेतला व बिनधास्त गायला सुरुवात केली. तबल्याचा स्वर मी बरोबर पकडला व गाणे एकदम जबरदस्त झाले. मी तल्लीन होऊन ते गाणे गायली. टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांनी कौतुक केले. ज्यांना हिंदी, इंग्लिश समजत होते त्यांनी बोलून कौतुक केले व ज्यांना फक्त तामिळ येत होती त्यांनी हस्तांदोलन केले. मला कधीच असे वाटले नाही की तामिळनाडूत येऊन मी गाणे म्हणेल. मी भारावून गेले. मी प्रोफेशनल गायिका नव्हती आणि नाही.एक आवड म्हणून मी गाणी गाते. हा न विसरणारा एक आठवणीतला अनुभव…..

हे गाणं माझ्यासाठी तरी ऐकतांना व गातांना अंतरातले भाव भारावून जातात. अंतर्मनाचा गाभारा फुलून जातो. जितका फुलतो तितकाच खुलतो व भावचिंब होऊन जातो. त्यातील प्रत्येक शब्द अंतरंगाला धरूनच चालतो. त्याच्या बोलामध्ये अव्यक्तसा भाव जाणवतो. हे गाणं ज्या ज्या रसिकांनी ऐकले असेल ते खरे भाग्यवंत….🙏
….. अंजली आमलेकर….४/१०/२५

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!