#माझ्यातलीमी
#विकेंडटाक
#रसग्रहणगाण्याचे
सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू सावली
सांज ये गोकुळी
१९९४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ वजीर ‘ चित्रपटातील हे गीत. सुधीर मोघे यांचे अप्रतिम शब्द… पुरिया कल्याण व यमन रागावर आधारित तितक्याच ताकदीचे श्रीधर फडक्यांचे संगीत…आणि आशा भोसले यांच्या गायकीतील जादू.. असा त्रिवेणी संगम असलेले हे गाणे माझ्या मनाला खूप भिडणारे. त्यातून अत्यंत सालस सोज्वळ अश्या लाडक्या अश्विनी भावेवर चित्रित झालेले.
खेड्यातील संध्याकाळचे अतिशय सुरेख वर्णन या गाण्यात केले आहे. कदाचित माझे बालपण मुंबईसारख्या गर्दीत गेलेले. त्यामुळे खेड्याचे नेहमीच आकर्षण ! म्हणूनच कदाचित ह्या गाण्यातील शब्द नि शब्द काळजाला भिडतो.
धूळ उडवित गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी
तिन्हीसांजेला गाई म्हशी गोठ्याकडे परतताना उडालेली गोधूळ..आकाशातील पक्ष्यांचे थवे आणि
हळू हळू तिन्हीसांजेचा ओढला जाणारा पटल … त्याला सावळ्याची सावली पडत आहे अशी उपमा दिली आहे.
खेड्यातील देवळात दूर आरती चालू आहे आणि त्याचा गोड घंटानाद ऐकू येत आहे ! ते शांत आणि भक्तिमय वातावरण डोळ्यांसमोर उभं राहतं !
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणु दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली
दूरवरच्या डोंगरांच्या रांगेवरून सरकत चाललेला अंधार…जणु काजळ घातल्यासारखा भासतोय..पाण्याचा गडद होत चाललेला रंग.. म्हणजे जणु कृष्ण पुढे पुढे येतोय आणि त्याची सावळी छाया पाण्यात दिसू लागली आहे. किती सुंदर हा कल्पनाविलास..!!
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यासवे वाहते बासरी
अमृताच्या जणु ओंजळी
तर अश्या ह्या सावळ्याच्या नुसत्या चाहुलीनेच अंधार पान्हा झाला आहे. आणि सारे चराचर जणु कृष्ण ! आणि बासरीची मंद धून म्हणजे अमृत प्राशनाने तृप्त झालेला कान्हा..! अंधार गडद होवू लागला आहे..पसरू लागला आहे..ह्यासाठी किती भव्य उपमा..!
फक्त तीन कडव्यांचं हे गाणं.. पण सुधीर मोघ्यांच्या शब्द सामर्थ्याला सलाम ! गाणं संपलं तरी मनात रेंगाळत रहाते आणि बासरीची धून खोल घुमत रहाते. एक वेगळीच अनामिक शांती, तृप्ती मिळते मला या गाण्यातून..म्हणूनच माझं खूप आवडतं.. जवळचं.. पुन्हा पुन्हा गुणगुणत रहावं असं वाटणारं..!!
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

अप्रतिम रसग्रहण
वाह ताई सुंदर
सुरेख
खूप सुरेख
सुरेख 👌👌
खूप छान