# माझ्यातली मी
लघुकथा (२९/९/२५)
शीर्षक :- मायेचा दिवा.
# दिलेल्या वाक्यावरून लघुकथा लिहा.
चिमुकली मनस्वी तिच्या आईवर खूप चिडचिड करायची, ओरडायची, छोट्या छोट्या कारणांनी रुसायची. पण आई मात्र तिच्या आवडीचा डबा बनवायची, युनिफॉर्मला इस्त्री करायची, संध्याकाळचा खाऊ तिच्याच आवडीचा बनवायची. आईचं विश्व जणू मनस्वी भोवतीच फिरे.
मनस्वीच वागणं बदलत नव्हतं. एकदा फ्रॉक चा रंग तिच्या आवडीचा घेतला नाही म्हणून दोन दिवस तिने अबोला धरला, ताटात आवडीची भाजी नसेल तर ताटही भिरकावून द्यायची. आजीला तिचं वागणं अजिबातच पटत नव्हतं.
एके दिवशी आजी मनस्वीला समजावून सांगू लागली,” बाळा, तुझी आई लक्ष्मी म्हणून घराची तिजोरी सांभाळते. सरस्वती सारखी तुझ्या अभ्यासाची काळजी घेते. अन्नपूर्णा म्हणून रोज गरम जेवण वाढते. दुर्गा म्हणून घराच्या सुरक्षिततेची काळजी घेते आणि गृहमंत्री बनून सगळ्या जबाबदाऱ्या पेलते. हो की नाही?
स्त्री शक्ती ही देवीचचं रूप असते. देवाला प्रत्येक घरी जाता येत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. तिचा आदर आपण करायला हवा! काय पटतय का? मनस्वी काहीही न बोलता तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी दसरा होता, मनस्वी ने आजीचीच गोष्ट सांगून शाळेत भाषण केले. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुख्याध्यापकांनी तिच्या विचारांचे कौतुक केले आणि पुढे म्हणाल्या,” स्त्री शक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे आणि ही आयुष्यभराची कर्तव्य बुद्धीही आहे.
असा नवा विचार नव्या पिढीत रुजवून कार्यक्रम संपला.
शब्द संख्या :- १९०
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
