#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (२९/९/२५)
#खराविजय
“स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे”
निखिल एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत होता. त्यांचे साहेब हे अनुभवी असून गुणांची कदर करणार होते. त्यांच्या कार्यालयातील महिला कर्मचारी आणि इतर महिलांबद्दल त्यांना खूप आदर होता. या नवरात्रीला त्यांनी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली. या योजनेनुसार प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातील महिलांशी म्हणजे कोणीही, आई, बहीण, मुलगी किंवा पत्नी ह्यांच्याशी ते कसे वागले ह्याचे नऊ दिवसाचे फोटो काढून आणायचे होते.
स्पर्धा सुरू झाली म्हटल्यावर सर्वांमध्ये अहमहमिका सुरू झाली. प्रत्येकजण नऊ दिवसांत आपल्या घरातील स्त्रियांशी जरा जास्तच प्रेमाने आणि लाडाने वागू लागले. आपल्याकडे बरेच पुरुष स्त्रीला गृहीत धरतात हे साहेबांना माहित होते. खरं तर अशी चर्चा त्यांच्या कानावर आली होती म्हणूनच त्यांनी ही स्पर्धा ठेवली होती.
नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यावर साहेबांनी पाहिले की त्यांच्या कार्यालयातील पंधरा पुरुषांनी असे फोटो आणले होते. फक्त निखिलने एकही फोटो आणला नव्हता. साहेबांनी निखिलबद्दल ऐकलं होतं की तो घरात सर्व प्रकारची मदत करतो, कोणतंही काम त्याला कमीपणाचं वाटत नाही, सगळ्यांची खूप छान काळजी घेतो. सगळ्यांचे फोटो पाहिल्यावर साहेब निखिलला म्हणाले,
“तू या स्पर्धेत भाग घेतला नाहीस का?”
“साहेब मला माफ करा. कोणतीही स्त्री ही प्रथम एक माणूस असते. आज ती आहे म्हणून आपण सर्व आहोत. आपण फक्त नवरात्रीत आणि महिला दिन अशा विशिष्ठ दिवशी त्यांना मान देतो त्यांचा आदर करतो. हे खूप चुकीचं आहे. माझे प्रामाणिक मत आहे की स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे.”
साहेब आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि अर्थात निखिल विजयी झाला.
©️®️सीमा गंगाधरे
शब्दसंख्या २४३

सुंदर कथा