……. स्वयंसिध्दा……

# माझ्यातली मी #
… खालील दिलेल्या ओळीवरून लघुकथा लेखन टास्क….
.. स्त्री शक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही,
तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झालीच पाहिजे….
……….. स्वयंसिध्दा………
एक अतिशय गरीब कुटुंब… विद्या व विजय..
कमावणारा फक्त एक व खाणारे सहा. त्यांना दोन मुले व दोन मुली. त्यावेळेस विज्ञान एवढं पुढे गेलेलं नव्हतं त्यामुळे निसर्ग नियमाने कुटुंब वाढत गेलं. मिळकत तुटपुंजी. विजयने आई वडील नसल्यामुळे किराण्याच्या दुकानात नोकरी करत करत व्यवहारापुरते शिक्षण घेतले. लग्नाचं वय झालं. स्वतःच गरीब असल्यामुळे त्याने गरीब कुटुंबातली मुलगी केली.त्यांचा संसार ऐपतीप्रमाणे सुरू होता.

हळूहळू कुटुंब वाढत गेलं. त्याच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले. आपण बायको व मुलांचे संगोपन करू शकत नाही म्हणून त्याने स्वतःबरोबर कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला. सकाळी बायकोला चहा करायला सांगून त्यात त्याने विष घालून ते सगळ्यांना दिले. तिने हा भ्याडपणा काहीच कामाचा नाही समजून विष तोंडात धरून ठेवले. मोठ्या मुलाला चहा आवडत नसल्यामुळे त्याने लगेच तो थुंकून टाकला व दोघांनीही मिठाचे पाणी पिऊन विष बाहेर काढले. बाकीच्यांचा जीव मात्र केव्हाच गेला होता.

तिने आपल्या दहा वर्षाच्या मुलाची जबाबदारी हिमतीने पार पाडायचा वेडा उचलला. तिच्या मनाने उचल खाल्ली. आपण फारच आयुष्य वाया घालवलं. पैशाअभावी नवऱ्याला व मुलांना गमावलं. काहीही करून आपण मुलासाठी पैसे कमवायचेच. परंपरेप्रमाणे तिने हातात लाटणे घेऊन चार घरी पोळ्या करायला सुरुवात केली. हळूहळू लोकांकडे जाऊन स्वयंपाकालाही सुरुवात केली. तिच्या हाताला चव असल्यामुळे घरे वाढली व त्यामुळे ती स्वतःचे व मुलाचे संगोपन व त्याचे शिक्षण पूर्ण करू शकली. पुढे जाऊन तिने एक खानावळ उघडली. मुलाला नोकरीचा चान्स आला होता पण त्याने त्याच खानावळीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच काहीही न शिकलेली ही नारी व्यवसायात कुठल्या कुठे निघून गेली.

परिस्थितीतून निर्माण झालेल्या आपत्तीवर तिने हार न मानता सकारात्मकतेचा विचार करून स्वतःची व मुलाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. स्वतःच्या मेहनतीने तिने तिची व मुलाची आर्थिक परिस्थिती सुधारली.
…… म्हणूनच नारीशक्ती जिंदाबाद…..
… स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही,
तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झालीच पाहिजे…
…… अंजली आमलेकर…… २९/९/२५

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!