#माझ्यातली मी
#लघु कथालेखन टास्क
@everyone दि-२९/९/२०२५
खरा आदर: साथ तुझी
नवरात्री संपल्यावरही रमेशच्या वागण्यात फरक नव्हता. तो मंदिरात देवीची पूजा करायचा आणि मीराला उद्देशून म्हणायचा, “स्त्री शक्तीचा आदर हा आपला धर्म आहे.” पण मीरा अनेक महिन्यांपासून अशक्त होती. सततचा ताप, थकवा तिला त्रास देत होता. रमेश मात्र तिला डॉक्टरकडे घेऊन न जाता, फक्त पैसे हातात ठेवून म्हणायचा, “जाऊन ये, कामात गुंतलोय.” त्याला वाटायचं पैशांनी सगळं ठीक होतं. मीराला पैशांपेक्षा त्याच्या साथीची गरज होती.
एक संध्याकाळ रमेश म्हणाला, “चहा लवकर दे.” मीराच्या डोळ्यात पाणी आलं. तिने स्पष्टपणे म्हटलं, “मला नऊ दिवसांचा आदर नको. मला माझ्या भावनांची कदर आणि साथ आयुष्यभर हवी आहे.” रमेश वैतागला.
त्याच आठवड्यात रमेशची आई अचानक चक्कर येऊन पडली. रमेश घाबरून त्यांना त्याच डॉ. देशमुखांच्या दवाखान्यात घेऊन गेला, जिथे तो मीराला एकटीला पाठवत होता.
आईची तपासणी झाल्यावर डॉक्टर गंभीर झाले आणि म्हणाले, “तुमच्या आईला फक्त थकवा आहे. पण रमेश, मला तुमच्या पत्नीबद्दल बोलायचं आहे. मीराची अवस्था यापेक्षा खूप गंभीर आहे. तिचे रिपोर्ट चांगले नाहीत. तिला तुमच्या वेळेची, तुमच्या भावनिक आधाराची जास्त गरज आहे. फक्त पैसे देऊन तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करू शकत नाही.”
रमेशला धक्का बसला. त्याला लगेच जाणवलं की त्याने मंदिरातल्या देवीला पूजलं, पण घरातल्या ‘देवीला’ पैशांच्या आधारावर एकटं सोडलं. तो घरी धावत गेला आणि मीराला म्हणाला, “मीरा, मला माफ कर. खरा आदर देवाला नाही, तर घरातल्या स्त्रीला आधार देण्यात असतो. मी आयुष्यभर तुझी साथ देईन, एक क्षणासाठीही तुला एकटं सोडणार नाही.”
मीराच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित आलं. त्याला वेळेत त्याच्या चुकीची जाणीव झाली होती.
~अलका शिंदे


Very good👍
सुंदर कथा
चांगली कथा
Apratim
चांगली कथा