अनामिक नातं

#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क.(,२६/९/२५)
#कथालेखनटास्क
#अनामिकनातं

संध्याकाळी नेहमीप्रमाणे निमा फेरफटका मारायला निघाली. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ह्या हिरव्यागार वनराईतून फिरताना तिच्या मनाला हिरवा तजेलदार उत्साह स्पर्श करायचा. गेले तीन महिने ती इथे नित्यनेमाने येत होती. लोकांच्या रोजच्या ये जा करण्यामुळे तिथे एक सुंदर पायवाट तयार झाली होती. थोडे चालून झाल्यावर तिथे ठराविक अंतरावर लोकांना बसण्यासाठी बेंचेस ठेवले होते. एका ठराविक बेंचवर निमाने अगदी पहिल्या दिवसापासून एका काका काकूंना पहिलं होतं. चालताना त्यांच्या बाजूने जाताना दोघेही तिच्याकडे बघायचे. निमाला ते आपल्याकडे पाहत आहत हे जाणवायचं. दोन-तीन दिवसांनी निमाने सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं. आपसुकच एकमेकांच्या ओठांवर स्मितहास्य फुललं. तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला.

नंतर रोजच निमा त्यांच्या इथून जात असताना दोघांशी हसायची. सुरुवातीला फक्त हसण्यापर्यंत मर्यादित असलेली त्यांची ओळख आता एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यापर्यंत गेली. एक दिवस काकूंनी निमाला जवळ बोलावलं.

“तुला आम्ही रोज बघतो गं आणि आम्हाला आमच्या परदेशात असलेल्या लेकीची खूप आठवण येते. नाव काय तुझं पोरी.”

“काकू माझं नाव निमा आहे. मी पण तुम्हाला रोज बघते आणि तुम्हाला बघून मला सुद्धा खूप आनंद होतो.”

“आम्ही इथून जवळच “बिल्वदल” नावाचा बंगला आहे तिथे राहतो. दिवसभर दोघेच घरात असतो. कधीतरी दुपारी कधी खरेदीला, कधी सिनेमाला जातो. संध्याकाळी मात्र आवर्जून आम्ही दोघे येथे येऊन बसतो. ह्या निसर्गाच्या सानिध्यात मन रमते. शिवाय जाणाऱ्या येणाऱ्या मध्ये आपसूकच ओळख निर्माण होते जशी तुझ्याशी झाली. तू इथे कुठे जवळपासच राहतेस का.”

“हो काकू मी इथून जवळच “आम्रपाली” नावाची सोसायटी आहे तिथे राहते. मी पेशाने एक शिक्षिका आहे. सकाळी माझी शाळा असते. शाळेतून आल्यावर दुपारी जे विद्यार्थी खाजगी शिकवणीला जाऊ शकत नाहीत अशा गरीब विद्यार्थ्यांना मी मोफत शिकवते. संध्याकाळ झाली की मला सुद्धा ही जागा खूप खुणावते. आता तुमच्याशी ओळख झाली आहे त्यामुळे रोज इथे यावसं वाटतं. चला आता येते मी. नाहीतर मुख्य चालण्याचा उद्देश बाजूलाच राहील.”

अशा तऱ्हेने रोज त्यांच्या गप्पा होऊ लागल्या. काकूंचं नाव निर्मला होता आणि काकांचं नाव नितीन होतं. त्यांची निलाक्षी नावाची मुलगी परदेशात राहत होती. लग्नानंतर ती तिथेच स्थायिक झाली होती. मुलगा सुद्धा भारतातच दुसऱ्या शहरात राहत होता. काका लष्करातून निवृत्त झाले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लष्करी ठसा दिसत होता. काकूंचं तारुण्यातले सौंदर्य आताही दिसत होते. काही दिवसांनी निमा त्यांच्या बाजूने जायला लागली की त्या तिला मुद्दाम बोलवत होत्या.

“अग निमा ये आज बघ मी तुझ्यासाठी नारळाच्या वड्या आणल्यात. मी स्वतः केल्या आहेत.” एक नारळाची वडी तोंडात घालत निमा म्हणाली,

“आहाहा काकू खूपच खुसखुशीत आहे नारळाची वडी. खूप छान चव आहे तुमच्या हाताला.” काकूंना बोलायची खूप हौस होती.

“अगं आमच्या बंगल्याच्या आवारात खूप झाडं लावली आहेत. नारळाची, आंब्याची, पपई आहे, फुलझाडं आहेत. त्याच नारळाच्या झाडाचा नारळ आहे.”

“अय्या काकू मला ना शहाळ्याचे पाणी आणि त्याच्या आतील मऊमऊ खोबरं खूप आवडते खायला.”

“अगं मग तू ये ना एकदा आमच्या घरी. आपण खूप बोलूया. त्या आधी उद्याच मी तुला तसं शहाळ्याचे पाणी आणि तो मऊसुत नारळ घेऊन येते ना.”

बोलल्याप्रमाणे काकू दुसऱ्या दिवशी निमासाठी शहाळ्याचे पाणी आणि नारळ घेऊन आल्या. निमा आणि काका काकू खूपच जवळ येऊ लागले. त्यांच्यात एक अनामिक नातं निर्माण झालं होतं. काका काकू घराबाहेर पडले की त्यांना निमा कधी दिसते असं होऊन जायचं. त्याचप्रमाणे निमा सुद्धा चालायला निघाली की तिला काका काकू दिसले की खूप आनंद व्हायचा.

रोजच्या प्रमाणे आज निमा संध्याकाळी चालायला बाहेर पडली आणि तिला त्या नेहमीच्या बेंचवर काका काकू दिसले नाहीत. ती खूपच कावरी बावरी झाली. नंतर तिने विचार केला आज कदाचित काका काकू कुठेतरी बाहेर गेले असतील. दुसऱ्या दिवशी पण तिला काका काकू दिसले नाहीत. तिला कळेच ना की नक्की काय झालं असेल. तसा त्यांनी तिला “बिल्वदल” बंगल्याचा तोंडी पत्ता दिला होता. पण तिने मनाला समजावलं अगदी दोन दिवसातच त्यांच्या घरी जायला नको. जर उद्याही काका काकू दिसले नाहीत तर आपण थेट त्यांच्या बंगल्यावरच धडकायचं.

तिसऱ्या दिवशी पण काका काकू तिला दिसले नाहीत आणि तिचं अवसानच गळले. ती बंगल्याचा पत्ता शोधत शोधत तिकडे गेली. बंगल्याच्या गेटला खूप मोठे टाळे लावलं होतं. ती कॉलनी अशी सगळ्या बंगल्यांची होती. आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं. ती धीर करून शेजारच्या बंगल्याजवळ गेली. तिकडे झोपाळ्यावर एक आजी बसल्या होत्या. निमाने त्यांना काका काकू बद्दल विचारलं.

“पोरी तू निमा आहेस ना!”

“हो पण तुम्हाला माझं नाव कसं कळलं”

“अगं निर्मला मला सांगून गेली की एक-दोन दिवसात आमची चौकशी करायला निमा नावाची मुलगी येईल.”

“हो पण काका काकू कुठे गेले अचानक काय झालं नक्की.”

“अगं काकांना त्यादिवशी अचानक थंडी भरून ताप भरला. ताप काही उतरेच ना. इथे ते दोघेच असतात म्हणून काकूंनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. त्यांचा मुलगा एक दोन दिवसात येईलच.”

निमाला धीर निघवेना तिने लगेच त्यांच्याकडून हॉस्पिटलचा पत्ता घेतला आणि ती थेट “मातृभक्ती” हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे काका काकूंना भेटल्यावर तिला खूप बरं वाटलं. ती काकूंना म्हणाली,

“काकू काकांना फक्त ताप आलाय तर तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नका ठेऊ. त्यांना उगाच जास्त आजाऱ्या सारखं वाटेल. तुमचा लेक येईपर्यंत आपण त्यांना माझ्या घरी नेऊया.”

“अगं वेडी आहेस का तुझ्या घरी कसं न्यायचं.”

“काकू माझे सख्खे काका काकू असते तर त्यांच्यासाठी मी हेच केलं असतं ना. माझ्या घरी आई-बाबा आणि माझी एक धाकटी बहीण सुद्धा आहे. आणि शाळेतून आल्यानंतर मी सुद्धा घरीच असते. दोन-तीन दिवस मी ट्युशन्स बंद ठेवेन. तुम्हाला अगदी आपल्या घरी असल्यासारखं वाटेल.”

“अगं आम्ही कोण कुठचे! आत्ताच आपली ओळख झाली आणि तू आम्हाला घरी कुठे नेतेस.”

“काकू तुम्ही मला पहिल्या दिवशी पाहिलं तर तुम्हाला माझ्यात तुमची लेक दिसली ना. मग आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही. मी काकांचे डिस्चार्ज कार्ड बनवते. आपण त्यांची औषध बरोबर घेऊन जाऊया.”

“निमा खरंच तू आम्हाला दोघांना इतका लळा लावला आहेस ना की तुझा आग्रह आम्ही मोडू शकणार नाही.”

निमाच्या मनात सुद्धा येत होतं ह्यांना आपण हल्लीच भेटलो. आधी कधी पाहिलं सुद्धा नाही पण आता आपल्यामध्ये एक अनामिक नातं तयार झालं आहे. दोन दिवस ते आपल्याला दिसले नाही तर आपण किती कासावीस झालो. त्यांची ओढच आपल्याला असं वागायला भाग
पाडते आहे. हे ऋणानुबंध बहुधा जन्मोजन्मीचे असावेत.

©️®️ सीमा गंगाधरे

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!