आठवणीतली हिरवळ

# माझ्यातली मी#
….. चित्रकथा लेखन टास्क…..
…….. आठवणीतली हिरवळ…….
आज सायली खूप खुश होती. तिचा प्रियकर सुयोग परदेशातून वापस येणार होता व नंतर ती दोघे लग्न करणार होती. लहानपणापासून ती दोघे एकत्र खेळली, बागडली व मोठे झाल्यावर प्रेमात सुद्धा पडली. सुयोगच्या आई-बाबांना ते एकत्र येऊ नये असेच वाटायचे. कारण एखाद्या वेळेस ते प्रेमात पडले तर आपल्या तोलामोलाचे ठिकाण नाही हे त्यांना माहिती होते. दोघांच्या वागणुकीवरून त्यांना तो प्रेमाचा इशारा आहे हे कळून चुकले होते. पण जोपर्यंत आपल्याला सुयोग काही सांगत नाही तोपर्यंत यावर चर्चा नको असे त्याच्या आई-वडिलांनी ठरवले.

दोघेही खूप हुशार होते. दोघांनाही शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग आला. परंतु सायलीला परिस्थितीमुळे जाता आले नाही. सुयोग श्रीमंत थाटात वाढल्यामुळे तो शिक्षणासाठी परदेशी निघून गेला. परदेशी जाण्यापूर्वी इकडे शिक्षण सुरू असतानाच त्यांचे भेटण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हिरवीगार बाग. त्या बागेमध्ये असणारी निसर्गातील हिरवळ, तेथील शांत वातावरण त्यांना आपोआपच तिकडे ओढून नेले. त्या बागेत त्यांना भेटायला खूप आवडायचं. ती दोघे वेळ मिळेल तशी त्या बागेमध्ये यायची.

त्या बागेत एक रिकामा बेंच होता. जणू काही तो दोघांसाठीच आहे की काय असे वाटायला लागायचे. त्या बेंचच्या सभोवती हिरवीगार मोठ मोठी झाडे होती. जणू त्या झाडांनी त्या बेंचला वेढा घातला की काय असेच वाटायचे. नाही खरंच तो वेढाच होता…. त्या बेंचला सुद्धा त्या दोघांची सवयच झाली होती. एखाद्या दिवशी काही कारणाने त्या दोघांचे येणे जमले नाही तर बेंच हा रिकामाच असायचा. जणू काही तो बेंच हा दोघांच्या प्रतीक्षेची वाट पाहत असावा.

त्या बेंचवर बसून त्या दोघांनी आणाभाका घेतल्या की आपण लग्न करायचे आणि ते सात जन्म टिकवायचे आजूबाजूच्या झाडांमधून एक छोटीशी पायवाट सुद्धा गेलेली होती. हातात हात गुंफून पूर्ण बागेला फेरफटका मारून परत ते त्या बेंचवर येऊन बसायचे. त्या बेंचवर बसल्यावर आजूबाजूला उंच झाडे असल्यामुळे येणारा पानांचा सळसळणारा आवाज त्यांना सुखावून जायचा. पानांमधून डोके काढून येणारा सूर्यप्रकाश जमिनीवर नक्षी काढून जायचा. हे असे विलोभनीय दृश्य बघून त्यांच्या प्रेमाला अजूनच उधाण यायचे. त्या बागेत इतकी शांतता होती की बेंचवर बसणाऱ्यांच्या विचारांना एक वेगळीच दिशा मिळायची.

सायलीचे सुद्धा शिक्षण पूर्ण होऊन तिला पण चांगली नोकरी मिळाली. सुयोग चे सुद्धा शिक्षण पूर्ण होऊन अमेरिकेतच त्याला नोकरी मिळाली. सायलीला आता वाटू लागले की सुयोग येणार हे त्याने आपल्याला तर सांगितले पण थोडीशी निराशेची पाल चुकचुकायला लागली की तो आता तिकडेच सेटल होईल की काय!

परत इकडे येण्याचा सुयोग चा दिवस उजाडला. ती सुद्धा सुट्टी काढून पुण्यावरून त्याला भेटायला आपल्या गावी आली. तिने आपल्या आई-बाबांना अंधारात ठेवले नाही व तिने तिच्या मनातला जो गोंधळ सुरू होता तो त्यांच्यासमोर मांडून मन मोकळे केले.
आई-बाबा,
मला सुयोग शी लग्न करायचे आहे कारण आमचे दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम आहे. बेटा…. तुझे सगळे बरोबर आहे पण सुयोगचे ठिकाण आपल्यासाठी खूप महाग पडणार आहे. आपण त्यांची बरोबरी करू शकणार नाही आणि आम्हाला नाही वाटत त्याचे आई-बाबा तयार होतील.

सायली बेटा,
सुयोग ने सांगितले का ग घरी?
नाही आई, तो अमेरिकेतून आल्यानंतर बोलणार होता.
अगं, पण तो इतक्या वेळेवर आई-बाबांना सांगणार. त्यांचं हो नाही काहीच आपल्याला माहिती नाही अन तू गृहीतच धरून चाललीस. हे योग्य नाही बाळा. आधी त्याला येऊ दे व त्याच्याशी बोल. तो काय म्हणतो ते ऐकून घे. मग पुढचं बघू. पण हेही लक्षात ठेव त्यांची बरोबरी आपण कधीही करू शकणार नाही.

तो अमेरिकेतून परत आला. सायलीने त्याला फोन करून बागेत भेटायला बोलविले. तो म्हणाला…. आजचा दिवस मी आई-बाबांसोबत घालविणार आहे त्यामुळे मी तुला भेटायला बागेत उद्या येतो. ठरल्याप्रमाणे तो आला. इतक्या दिवसांनी ते त्या बागेत आले तरी तो बेंच रिकामाच होता. जणू काही तो प्रेमी युगुलांसाठी एक प्रेमाचं प्रतीकच होय. ते अनेकदा त्या बेंचवर बसल्यामुळे तो रिकामा बेंच त्यांच्या आठवणींचा साक्षीदारच होता.

इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यावर सायलीने मुख्य मुद्द्याला हात घातला.
सुयोग,
आपण ज्या आणाभाका घेतल्या होत्या त्याविषयी तू आई-वडिलांशी बोललास का?
तो म्हणाला, नाही अजून तरी नाही पण मी आजच बोलणार आहे.
सायली म्हणाली… बोल पण लवकर बोल. मी तर माझ्या आई-बाबांशी बोलले आहे. घरी गेल्यावर त्याने आई-बाबांना त्याचा निर्णय सांगितला.
ते म्हणाले बेटा,
सायली ही मुलगी चांगली आहे पण आपल्या तोला मोलाची नाही लोक काय म्हणतील.
तो म्हणाला, आई बाबा…. आमचं प्रेम हे एकतर्फी नाही गं. आम्ही आणाभाका घेतल्या आहे सात जन्म एकत्र राहू अशा. प्रेम काय परिस्थिती बघून करतात का गं.

आई बाबा,
नात्यांमधली हिरवळ जर टिकवायची असेल तर परिस्थितीला बाजूला ठेवून जरा विचार करा ना. तिच्यासारखी सालस, गुणी मुलगी आपल्या घराला नीट बांधून ठेवेल. तिच्यातला खट्याळपणा, हलकीफुलकी गंमत, वागण्या बोलण्यातला मोकळेपणा मला तिच्या प्रेमात पाडून गेला. आणि वाटायला लागले की नाती जर जवळ आली तर अधिक बहरतील व अधिक काळ टिकतील. मुलाच्या बोलण्याने त्यांच्या विचारांपासून स्वतःला दूर नेले व दोघांनी त्यांच्या लग्नाला होकार देऊन लग्न लावून दिले. दोन महिन्यात तिचा विजा वगैरे तयार करून तिला पण सोबत नेण्याचे ठरविले.

अमेरिकेत जाण्यापूर्वी दोघे परत एकदा त्यांच्या आवडत्या बागेत शेवटचे आले. रिकामा बेंच आजही रिकामाच होता. तो त्यांच्या प्रतीक्षेची जणू खरोखरच वाट पाहत होता.
तो बेंच स्वतःशीच बोलून गेला….. की जी व्यक्ती आज इथे आली ती आपल्यापासून दूर जाणार आहे पण त्यांच्या आठवणीत मी तर स्वतः ला सदैव जिवंत ठेवणार आहे.

शेवटी दोघेही सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी परत आले. ज्येष्ठ नागरिकांच्या भूमिकेत आले तरी ते त्या बागेला विसरले नाहीत. बाग जशी होती तशीच हिरवीगार, शांत व तो त्यांचा आठवणींचा प्रतीक असलेला रिकामा बेंच अगदी तसाच होता. त्यावर दोघे आपल्या तारुण्यातल्या आठवणींना उजाळा देत निवांत बसले….
…… अंजली आमलेकर…… २७/९/२५

5 Comments

  1. किती सुंदर .. बागेतील तो बेंच जणू त्यांच्या प्रेमाच्या आठवणीने सजीव झाला ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!