#majhyatlimi
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
#हिरवाईला ऑडिट हवंय..हिरव्या शाईनं
त्याचं पोस्टिंग आदिवासी वस्तीत झालं होतं.
शांत स्वच्छ वातावरणात तो आता निवृत्तीची स्वप्नं रंगवत होता .
रोजच्या हिरव्यागार भाज्या जमिनीतनं ताटात .. ताटातनं पोटात . किरकोळ आजार झाला की आदिवासी एकदम जालिम नुस्खे द्यायचे .
हिरव्या वनराईनं त्या अजाण अडाणी आदिवासी जमातीला संतुष्ट ठेवलं होतं..पिढ्यानपिढ्या.
कुठली सरकारी जीप धूर काढत आली की वनदेवीच्या
हिरव्या काळजाचे ठोके वाढायचे . आदिवासीही सैरभैर व्हायचे ..आता कोणती संक्रांत येणार म्हणून .
राष्ट्रीय ध्वजातल्या हिरव्या रंगाकडे पाहून ते वंदन करायचे . पण पांढरेही पडायचे . अशोकचक्र त्यांच्या डोक्यात खळबळ उडवून द्यायचं . गोंधळ माजवायचं .
निसर्गानं त्यांच्यासाठी हिरवं दान दिलं होतं . गरजा थोड्याच होत्या . त्या सगळ्या भागत होत्या . कुणाचा हस्तक्षेप नको होता त्यांना .
त्या जंगलाच्या संरक्षणासाठी काहीही करायची तयारी होती त्यांची .
आणि एक चळवळ या सगळ्यात मधे घुसून हैदोस घालू पहात होती .. नक्षलवाद्यांची .
ते लाल झेंडे आव्हान देऊ पहात होते तिरंग्याला .. घनदाट हिरव्या रंगाचा आडोसा घेऊन.
ते अशिक्षित रिकाम्या तरुणाईला काळे झेंडे फडकवायला सांगत होते . सरकारच्या विरोधात . तरुण आदिवासी भरकटत होते .. लाल झेंड्यामागे .
खरं तर हिरवा रंग शांतीचा सकारात्मकतेचा संतुलनाचा .
पण सर्वांनाच ओरबाडून घ्यायचा होता हा रंग . त्यात कंत्राटदार , अनुषंगाने अधिकारी वर्ग आणि बऱ्याच जणांचे हितसंबंध गुंतलेले होते .
औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करताना सुरक्षितता दर्शविण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो . त्या कंपन्या खऱ्या अर्थाने लूटमार करणाऱ्या हिरवाईच्या हितशत्रू होत्या . इथले वणवे कुणाचं कारस्थान हे कळणं मुश्किल होतं .
प्रत्यक्ष भगवंतावरही विश्वास बसत नव्हता . त्यानं तर पांडवांच्या महत्त्वाकांक्षेसाठी आख्खं खांडववन जाळले होतं .
कित्येक योजनं विस्तीर्ण हिरवाईचं काही दिवसांत भस्म केलं होतं . तो विध्वंस आता टाळायचा होता.
निर्मितीचा सृजनात्मक सोहळा असलेल्या वनराईचं आरोग्य आणि अस्तित्व दोन्ही धोक्यात आलं होतं . हिरव्या रंगाची गती ,जोश ,आवेग ,चंचलता सारं काही उतरलं होतं .. तरुणाईत आणि हीच लक्ष्य झाली होती . नक्षलवाद्यांची .
तो बेचैन होता . त्याची लाडकी हिरवाई स्फोटक ठरणार होती .. मूठभर लोकांच्या हट्टासाठी.
इथलं चैतन्य , समृद्धी , स्थैर्य सगळ्याला नजर लागली होती . त्यातला गडदपणा महत्वाकांक्षेला , लोभाला खेचत खतपाणी घालणार होता.
त्यात काही आदिवासी अल्पसंतुष्ट होते . ते म्हातारपणाकडं झुकले होते .
त्यांचा हिरवटपणा पिवळसर होत चालला होता .. त्यांना भ्याड आजारी आणि निरुपाय अगतिक करत .
स्वतःला क्षमा करण्याची ताकद त्यांच्याकडे होती . दुसऱ्याचे मन संभाळण्याचाही ते आटोकाट प्रयत्न करत होते . त्यांना “नाही” म्हणता येत नव्हतं .
हिरव्या रंगाकडून आपण काय शिकायचे ? मी आहे , माझे असणे , माझ्या विश्वात जे काही आहे ते आहे . त्याला अधिक चांगले कसे बनवायचे ह्यासाठी आपल्या परीने काम करत राहणे .. हिरव्या रंगात रंगून .
आणि हीच भावना त्याच्या नसानसात खेळत होती…
आता त्यानं खूप विचार केला आणि त्याला एकच उपाय सापडला . पत्रकारितेचा आश्रय घ्यायचा . लेखापरीक्षकांना बोलवायचं.
वनराईच्या हिरवाईवर आणि हिरवाईच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायची आता तो कुणाचा मिंधा नव्हता . निवृत्त झाला होता सरकारी नोकरीतून .
हिरवा रंग त्याला सांगत होता .. लगे रहो .
रचनात्मक कार्य करायचं होतं .
शिक्षण, आरोग्य सगळ्याच योजना प्रत्यक्षात मिळवायच्या होत्या .. सरकारकडून .
त्याची हिरवी शाई आता हिशोब तपासत राहणार होती .
हिरव्या चैतन्याच्या सोबत जिवात जीव असेपर्यंत .


अवश्य वाचा
ज्वलंत प्रश्नावर आधारीत खूप सुंदर कथा👌👌
छान विषय 👌
छान 👌🏻📖✍🏻 कथा
खूप छान 👌🏻📖✍🏻 कथा
धन्यवाद
सुंदर
अप्रतिम ऑडिट …हिरवाईच
खुप छान
खूप अप्रतिम कथा मॅम 🫡
सुंदर कथा