# माझ्यातली मी
# विकेंड टास्क
दि.१२./९/२५
*मनकुप्पीतला अनंतगंध*
रविवार होता. रेशमा ने दिवाळीसाठी घर आवरायला घेतलं होतं. घरभर सगळा पसारा पडला होता.काही कागदं उडत होते, जिकडे तिकडे धूळ कचरा जमला होता. हल्ली फ्लॅट मध्ये पूर्वी सारखी अडगळीची खोली नसते पण घर म्हटल्यावर तिथे नित्य वापरातील वस्तू आणि काही टाकावू नसल्या तरी कधीतरी लागणा-या वस्तू असणारच. ह्या रोज लागणाऱ्या नसल्या तरी कधीतरी लागणार म्हणून त्या बाथरूमच्या वर असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या असतात. तेथे खूप जुन्या सुटकेस,काही जास्तीची भांडी, पत्राच्या जमान्यातील काही धुळीने माखलेली पत्रे, दिवाळीतल्या तेलकट पणत्या,धूळ साचलेले जुने आकाशकंदील पण असतात ह्या सगळ्या गर्दीत.
ए ,आई भूक लागली आज काही स्वयंपाक केलेलाच नाही वाटतं,असं म्हणत १२ वर्षांचा तेजस घरात प्रवेश करतच बोलला. रविवारची सकाळ असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता.
केलाय सकाळीच.
काय केलंस,भाजी पोळी असेल.
होय रे नंतरच आवरायला घेतलं.
ए जाऊ दे मी बाहेरूनच मागवतो.
दे तुझा फोन .
त्याने आलू पराठे,पनीर पराठे असं सगळं मागवलं.फोन पे वरून पैसे पण पाठवले.
रमेश टूरवर असल्याने दोघे मायलेकच घरी होते.
रेशमाने आणि तेजसने तेच पराठे,चटणी सॉस सोबत खाऊन हात धुतले.तेजस क्लासला गेला.
थोडा आराम करून रेशमाने सगळा पसारा पटापट आवरून ठेवायचा ठरवला. बरंच आवरून झाल्यावर तीला लग्नातली तिची सुटकेस सापडली. लग्नातल्या त्या मुंडावळी आणि बरंच काही दिसलं.ती सगळ्या जुन्या आठवणीतच हरवली. खरंतर हे लग्न तिला करायचं नव्हतं.शाळेपासूनचा तिचा बालमित्र राजन तिला खूप आवडत होता.डॉ राजनचं पण तिच्याशी सख्य होतं. गोरी अन् कुरळ्या केसांची रेशमा,ब-यापैकी उंची आणि नितळ त्वचा यामुळे राजन ला लहान पणापासून आवडायची आणि डॉक्टर झाल्यावरही त्याने त्याची आवड जोपासली होती. रेशमा शिक्षणातही हुशार होती,तीने कंपूटर सायन्समध्ये मास्टर्स केलेलं होतं,त्याला साजेसा जॉब पण तिच्याकडे होता.
तो लंडनला नवीन सर्जरीच्या कोर्स साठी गेला होता.अतिशय व्यस्त दिनचर्या असूनही तो रोज एकदा तरी तिच्याशी बोलायचा. ऐनवेळी राजन लंडनमधेच स्थिर होणार हे त्याच्या आजीने सांगितलं आणि हीच्या घरच्यांनी हीचं लग्न रमेश सोबत ठरवले.लग्नात ती खरं तर खूप रडेल असं सगळ्यांना वाटत होतं पण रेशमा अजिबात रडली नाही. तिच्या समोर आलेला प्रसंग ती तटस्थपणे पाहात होती. इकडे आल्यावर रमेशच्या प्रेमाने तिला बोलतं केलं.सासुबाई पण प्रेमळच होत्या.कधी रागावणं ओरडणं तिला माहीतच नव्हतं. ती जे काही करेल तेच प्रमाण होतं.हळुहळु मग ती इकडे रमली.
भांडेवालीच्या आवाजाने भानावर येतच तीने सगळा पसारा बाजूला केला.भांडेवालीला दार उघडलं.आता सगळं लवकर भरून ठेवते म्हणून तीने, सुटकेस उलटी केली.सुटकेसच्या खालच्या चेनमध्ये तिला एक बंद पाकीट सापडलं.ते अजून उघडलेलंही नव्हतं,त्यावर फ्रॉम डॉ.राजन लाखे लिहीलेले होतं.तीने त्याची एक बाजू फाडून वाचायला घेतलं, रेशमा मी सर्जरीचा कोर्स पूर्ण केला आणि पुढच्या आठवड्यात बहुतेक मी परत येतोय आणि बरंच काही लिहीले होते,पण हीच्या डोळ्यात पाणी तरळल्याने ती पुढचं वाचू शकली नाही.
बाई ssजी जाते दार लावून घ्या असा पुकारा भांडेवालीने केला.आपले अश्रू लपवितच तिने दार लावून घेतले.
सकाळचा आवरायचा फ्रेश मूड आता पार तेरा वर्षे मागे जाऊन,उदासीनतेकडे झुकला होता.
दिवाळीत माहेरी गेल्यावर तिने आईला,बहिणीला विचारले,मी सासरी गेलेली असताना राजन घरी आला होता का?तेव्हा बहिणीने सांगितले त्याचं एक
बंद पाकीट मी तुझ्या सुटकेस मधे ठेवलं होतं ते तू वाचलं असशीलच.तीने रडतच सांगितले की, नाही गं,ते पाकीट मी आत्ता तेरा वर्षांनंतर वाचलं.
आईने सांगितले की तुझ्या लग्नानंतर तो पंधरा दिवसांनी आला होता आणि म्हणाला मी येऊन गेल्याचं रेशमाला सांगू नका.नाहीतर ती खूप दुःखी होईल.आता तो लडंनमधेच स्थायिक झाला आहे आणि तिथल्याच मुलीशी विवाह पण केलाय.
खूप जड अंतःकरणाने रेशमा पुन्हा सासरी परतली.
©® स्वाती देशपांडे ( सुमन)
१२/९/२५.

धन्यवाद संगीता 🙏
सुंदर कथा
सुरेख कथा
खुप छान
धन्यवाद सगळ्यांना
सगळ्यांना धन्यवाद 🙏