# माझ्यातली मी #
*** विकेंड कथालेखन टास्क***
*** अपूर्ण प्रेम पत्र ***
………… मुकंप्रेम………
अश्विनी व आदेशला एक मुलगी. तिचे नाव अबोली. तिचे वडील सरकारी नोकरीत व आई शिक्षिका. अबोली ही नावाप्रमाणेच अबोल होती. ती लहान असतानाच तिच्या आळीत एक मित्र भेटला. स्वरांग त्याचे नाव. त्याचेही आई-वडील नोकरी करत. दोघेही समोरासमोर राहत असल्यामुळे एकमेकांकडे खेळायला जात. अबोली ही जशी अबोल होती तशीच ती चुणचुणीत व हुशारही होती. तिचा मित्र स्वरांग सुद्धा जितका हुशार तितकाच समजूतदार सुद्धा होता. इतक्या लहान वयात दोघांच्याही अंगी दैवी गुणांची संपत्ती होती.
एकच गोष्ट अबोलीची खटकायची. बोलायची कमी पण बोलली तर मोठ्यांसारखे बोलायची. म्हणजे त्यात इतक्या लहानपणात दिसणारा प्रौढपणा. वडिलांना वाटायचे की अबोलीला विचारांची जाण आहे व आईला तो उद्धटपणा वाटायचा.
कालांतराने मोठी झाल्यावर अबोली व स्वरांग एकाच कॉलेजमध्ये एकत्र जायला लागले. स्नेहसंमेलन असो की क्रीडाक्षेत्र असो ते दोघे हिरीरीने सहभागी व्हायचे. एखाद्या सहलीला जायचे असेल, एखाद्या ट्रेकला जायचे असेल तर दोघांनाही आवड असल्यामुळे सोबतच जायचे . त्यामुळे दोघांचा सहवास हा सतत वाढतच गेला. दिलखुलासपणे हसणं, एकमेकांची सुखदुःखे वाटून घेणं या सर्व प्रकारामुळे अबोली त्याच्यात गुंतत गेली.
शिक्षण पूर्ण होऊन दोघेही नोकरीला लागलीत. एका शहरात पण वेगळ्या कंपनीत. त्यामुळे सहवासाचे अंतर थोडे कमी झाले. तिला वाटायचे तो आपल्यात गुंतला की नाही हे आपणाला कसे कळणार. तिला प्रेम भावना व्यक्त करण्याची इच्छा असूनही भीती वाटायची. आपण जर आपले प्रेम व्यक्त केले तर नाती दुरावतील का? मैत्रीच्या नात्यात अंतर पडेल का? त्याचं मन दुखावेल का? अशा विचारांचं काहूर तिच्या डोक्यात सुरू झालं.
तिने विचार केला आपण बोलून व्यक्त होऊ शकत नाही तर आपण पत्राद्वारे आपले प्रेम व्यक्त करायचे . तिने कामावरून आल्यानंतर एक प्रेमपत्र लिहायला घेतले. अबोल असल्यामुळे हाच उपाय तिला योग्य वाटला आणि रात्री ती सुखद क्षणांची आठवण सोबत घेऊन झोपी गेली. कामाच्या धबडग्यात पत्राबद्दल ती पार विसरून गेली.
दोन दिवसांनी स्वरांगची दुसऱ्या शहरात बदली झाली ही बातमी कंपनीत गेल्यावर तिला कळली. हा तिच्यासाठी धक्काच होता. आता त्याचा सहवास आपणाला लाभणार नाही. ती अस्वस्थ झाली. विचारांचे जाळे तिच्याभोवती गुरफटायला लागले व ती घरी आली.
त्याच्या वागणुकीवरून तर तिला वाटायचे की तो सुद्धा माझ्यात गुंतला असावा. पत्र तर आपण लिहिले. त्याला आपल्या मनातील भावना, आपली त्याच्याविषयीची स्वप्ने, त्याच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाची अपेक्षा तिला अस्वस्थ करू लागली. तिने पत्ररूपात आपल्या भावना एकत्र तर ठेवल्या पण व्यक्त होता येत नाही म्हणून तिला आपल्या प्रेमात अपूर्णता वाटू लागली. प्रत्यक्षात प्रेम म्हणजे काय असतं याचा उलगडा तिला करताच येत नव्हता. आपलं प्रेम हे एकतर्फी तर नसेल! असंही असू शकेल का प्रत्येकाचं प्रेम काही सारखंही नसेल. खऱ्या प्रेमाची व्याख्या काय असते असे वेगवेगळे विचार तिच्या डोक्यात येऊ लागले.
तो पुण्याला जातांना तिला भेटायला आला. पण लिहिलेले प्रेमपत्र त्याला द्यायला तिची हिंमतच झाली नाही. त्याला भेटतांना तिला अश्रू आवरेनात. आपण फोनवर बोलत राहू असे आश्वासन देऊन तो निघून गेला. एक वर्षाने त्याचे लग्न जमल्याची बातमी त्याच्या घरूनच कळली. ही बातमी ऑफिसमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सुखद धक्क्याऐवजी हा न विसरणारा दुःखद धक्का तिला पचवणे कठीण झाले. ऑफिस मध्ये कोणाला कळू नये म्हणून तिने अश्रूंना आवर घातला व घरी आल्यावर अश्रूंचा बांध मोकळा केला. वाईट साईट विचारांनी तिच्याभोवती गुंफण घातले.
रात्री बाराच्या पुढे तिच्या मोबाईलवर मेसेज आला. अबोली माझे लग्न जमले आहे आणि तुला त्या लग्नात यायचे आहे. अश्रू दाटल्यामुळे तिने तो मेसेज रडत रडत डोळे पुसत वाचला. एक वेळ तिच्या मनात विचार आला की त्याचा नंबर व मेसेज हा नष्ट करावा का? या एकाच प्रश्नात ती अडकून पडली. कारण तिला थोडाफार राग हा आलाच होता. पण लगेच तिच्या मनात विचार आला का नष्ट करावा त्याचा नंबर आणि मेसेज. त्यात त्याची काय चूक. आपण जर आपली भावना त्याच्यासमोर व्यक्तच केली नाही तर त्याला आपली भावना कशी कळणार. याच भावनेत ती गुंतून राहिली आणि आता लग्न न करण्याचा विचार मनी पक्का ठेवून आपल्या नोकरीवर लक्ष केंद्रित केले.
पुढे पन्नाशी आली आणि तिने लिहून ठेवलेले ते अपूर्ण प्रेम पत्र जे एका वहीत दडवून ठेवले होते,जे स्वरांगपर्यंत कधी पोहोचलेच नव्हते ते तिला सापडले. अपूर्ण असलेले ते प्रेमपत्र, तिचे अपूर्ण राहिलेले प्रेम यात गुंतून न राहता त्यालाच आपली ताकद बनवून पुढची वाटचाल करण्यास प्रवृत्त करावे हेच ध्येय समोर ठेवून तिने अविवाहित राहून नोकरीत यशाचे शिखर गाठले…..
….. प्रेम मिळविण्यासाठी सुखाची किल्ली तिच्या हाती होती पण तिला ती वापरताच आली नाही…
……. अंजली आमलेकर……. १३/९/२५

छान आहे
छान आहे 👌