विकएंड टास्क…. ४) अपूर्ण प्रेमपत्र. (१२/९/२५)
…… अबोल प्रीति …….
ठरवून अगदी कांदेपोहेचा कार्यक्रम करून मनोज व प्रतिभाचे लग्न झाले. मनोज बॅंकेत होता तर प्रतिभा काॅलेजमध्ये लेक्चरर होती. दोघेही एकमेकांना अनुरूप होते. मनोज खूप कमी बोलायचा तर प्रतिभा बोलकी. जे मनात असेल ते बोलून मोकळी होणारी.
घरात मनोजचे आईबाबा व एक लहान बहिण काॅलेजात शिकणारी साक्षी व हे दोघे, असे पाच जण. बाबा कडक शिस्तीचे. आई खूपच प्रेमळ होती. दोन्ही मुलांना चांगले वळण व शिस्त होती. प्रतिभा लवकरच घरात रुळली. तिने प्रेमाने व आपलेपणाने सर्वांची मने जिंकली. साक्षी व प्रतिभा वहिनी नणंद पेक्षा मैत्रीणी जास्त झाल्या.
मनोज कामापूरता सगळ्यांशी बोलायचा. सुरवातीला प्रतिभाला वाटायचे, मनोजने आपल्याशी गप्पा माराव्यात, बँकेतील काही सांगावे पण …. तिच्या लक्षात आले की, यांचा अबोल स्वभाव आहे पण मनाने चांगले आहेत. न बोलता घरातली जवाबदारी घेतात. सगळ्यांची काळजी घेतात. बहिणीचे व तिचेही लाड करतात. हळूहळू तिला त्याच्या अबोल स्वभावाची सवय झाली.
त्यांचा संसार सुरू झाला. प्रणव व प्राची यांच्या जन्माने संसार बहरला. साक्षीचे लग्न होऊन ती सासरी गेली. आईबाबा थकले होते. माहेरी पण आता आईबाबा नव्हते. दादाचे लग्न झाले. दोघांनी तिला कधी अंतर दिले नाही. माहेरपणाचे सुख तिला कायम देत होते. म्हणता म्हणता वर्षे गेली. प्रणव व प्राची शिकून नोकरीला लागले. प्राचीने प्रेमविवाह केला व ती बंगलोरला गेली. प्रणवने पण प्रेमविवाह केला व तेही इथेच रहात होते. आईबाबा दोन वर्षांपूर्वी गेले.
यावर्षी त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस होता. मुलांनी तो दणक्यात साजरा केला. एके दिवशी प्रतिभा कपाट आवरत होती. तिला मनोजची डायरी मिळाली डायरी कोरी होती पण डायरीत खूप जुने एक लिहिलेले पत्र मिळाले. पत्र खालील प्रमाणे होते…..
प्रिय, प्रतिभा,
माझे हे पत्र वाचून तूला नवल वाटेल पण… तू बाळंतपणासाठी माहेरी गेलीस तेव्हा मला समजले की, तू माझे सारे आयुष्य व्यापून टाकले आहेस. तूझा वावर, तूझे बोलणे, तूझे असणे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे. तूझे सतत भास होतात आईबाबा सारखी तूझी आठवण काढतात. आता तू असतीस तर असे बोलली असतीस, तू असे केले असते, तसे केले असते म्हणून तूझ्या आठवणीने डोळ्यात पाणी काढतात.
तूला वाटत असेल की, माझे तूझ्यावर प्रेम आहे की नाही, कारण मी ते कधीही बोलून दाखवले नाही. कारण माझा तो स्वभाव नाही. पण मी अगदी मनापासून कबूल करतो की, तू मला खूप आवडतेस व माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूप समजूतदार आहेस. तूझी कधीही कसलीही तक्रार नसते. सगळ्यांचे सगळे हसतमुखाने करतेस. तू घरात नाहीस तर घरही सुनेसुने झाले आहे.
तूझ्या आठवणींनी डोळ्यात अश्रू आलेत. मी जास्त काही लिहीत नाही फक्त येवढेच सांगतो की बाळाला घेऊन लवकर आपल्या घरी ये. तूझी आम्ही सगळेच खूप आतुरतेने वाट पहात आहोत.
तूझा आणि फक्त तूझाच अबोल,
मनोज.
पत्र वाचताना प्रतिभाचे डोळे पाणावले. ती मनात म्हणाली की, तुम्ही बोलून दाखवले नाही तरी तूमच्या डोळ्यात, स्पर्शात, वागण्यात मला जाणवत होतेच की, तूमचे माझ्यावर खूप प्रेम आहे व मी तुम्हांला आवडते. याच विश्वासावर तूमच्या बरोबर ५० वर्षे संसार केला. तूमची अबोल प्रीति या पत्राने बोलकी केली व या पत्राने ती शिक्कामोर्तब पण केली.

खूप छान
खूप छान
मनापासून आभार🙏💕
खूप अप्रतिम कथा
खूप छान कथा
खूप छान
खूप छान