दीर्घ कथा

inbound891952693476510956.png

#Story katta
#कथा लेखन
​ पुन्हा भेटशी नव्याने… (भाग ३)
~अलका शिंदे
​ प्रियाचे डोळे पाण्याने भरले होते. समीरला तिच्या डोळ्यात एक वेगळीच वेदना दिसत होती. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ती शांतपणे त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती. त्यां दोघांवर लांबून नजर होती श्वेताची. तिला प्रियाची अवस्था कळत होती. ती तिच्याकडे गेली.
​श्वेता: “प्रिया… काय झालंय? तू ठीक आहेस ना?”
​प्रियाने पटकन डोळे पुसले.
​प्रिया: “मी ठीक आहे, श्वेता. मला घरी जायचं आहे. मी निघते.”
​ती इतक्या घाईत होती की तिने कोणालाही काही न सांगता जाण्याचा निर्णय घेतला. श्वेताने तिचा हात धरला.
​श्वेता: “प्रिया, तू कुठे चाललीस? तुझ्या डोळ्यात पाणी आहे. काहीतरी नक्कीच घडलं आहे. तू माझ्यापासून का लपवतेयस?”
​प्रिया: “श्वेता, मला जाऊ दे.”
​पण श्वेताने तिला जाऊ दिले नाही. ती तिला एका बाजूला घेऊन गेली.
​श्वेता: “प्रिया, मी तुला ओळखते. आपण दोघी खूप जवळच्या मैत्रिणी आहोत. तू माझ्यापासून काही लपवू शकत नाहीस. मला सांग, काय झालंय?”
​प्रियाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
​प्रिया: “श्वेता, मी खूप मोठी चूक केलीये. मला इथे यायला नको होतं. समीरला पाहून मला जुने दिवस आठवले. पण आता खूप उशीर झालाय.”
​श्वेता: “समीरशी बोल तू एक मित्र म्हणून. तू त्याच्यापासून का लपतेयस?”
​प्रिया: “मी त्याला सोडून गेले. मी त्याला काहीही न सांगता निघून गेले. आता मी त्याला कसं तोंड देऊ?”
​श्वेताने तिला मिठी मारली.
​श्वेता: “प्रिया, तू त्या दिवसांबद्दल विचार करू नकोस. आता तू तुझ्या आयुष्यात खूश आहेस ना? मग बस झालं.”
​इकडे समीरही कबीरला शोधत होता. कबीर हा समीरचा सर्वात जवळचा मित्र होता, ज्याला त्यांच्या नात्याबद्दल सर्व माहिती होतं.
​समीर: “कबीर, ती मला टाळतेय. ती माझ्यापासून पळतेय. मला कळत नाहीये की मी काय करू?”
​कबीर: “समीर, शांत हो. प्रियाबद्दल आपल्याला काही माहिती नाही ती नेहमीच अशी होती, भावना लपवणारी. पण तिला समजून घे.”

​समीर: “पण का? तिला माझ्यापासून का लपायचं आहे? मी तिच्यासाठी काही करू शकतो का?”
​कबीर: “समीर, तू तिला काहीही विचारू नकोस. तिला थोडा वेळ दे. ती स्वतःहून तुझ्याशी बोलेल. पण मला वाटतं की तिच्या आयुष्यात ती खूश आहे. तू आता जुन्या गोष्टी आठवून त्रास करून घेऊ नकोस.”
​समीर: “कबीर, मला वाटतं ती माझ्यापासून काहीतरी लपवते. ती खूप अस्वस्थ आहे.”
​कबीर: “मी तुला एक गोष्ट सांगतो, समीर. प्रियाच्या आयुष्यात काहीतरी असं घडलंय, जे ती कोणालाच सांगू शकत नाहीये. पण तिच्यावर विश्वास ठेव.”
​समीर शांत झाला. त्याला आता थोडं बरं वाटलं.
​समीर: “कबीर, खरं सांगू? आजही मला तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. मला तिला विसरता येत नाहीये.”
​कबीर: “मी तुला ओळखतो, समीर. पण आता तू तिला मदत करू शकशील. तू फक्त तिच्यावर विश्वास ठेव.”

​सगळेजण जेवण करून झाल्यावर ‘फनी गेम्स’ कार्यक्रमाची घोषणा झाली. श्वेताने माईक हातात घेतला आणि ती उत्साहात म्हणाली, “आता सुरू करूया आपला ‘फनी गेम्स’ कार्यक्रम! चला, सगळे तयार आहात का?”
​ सगळ्यांनी टाळ्या वाजवून होकार दिला आणि वातावरण हलके झाले. प्रिया आणि समीर त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत बसले होते. एका गेममध्ये, सर्वांना आपापले आवडते गाणे म्हणायला सांगितले.
​एक-एक करून प्रत्येकजण स्टेजवर जाऊन गाणे म्हणत होता. श्वेताने माईक समीरच्या दिशेने धरला.
​श्वेता: “चला, आता आपल्या समीरची पाळी! समीर, तुझं आवडतं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.”
​समीरने थोडं टाळण्याचा प्रयत्न केला, पण कबीर आणि इतर मित्रांनी त्याला आग्रह केला. “अरे, ये ना! तू खूप छान गातोस! ये, ये!” कबीरने त्याचा हात धरून त्याला स्टेजवर घेऊन गेला.
​समीरने माईक घेतला. त्याचे डोळे नकळत प्रियाकडे गेले. प्रियाच्या चेहऱ्यावरील हास्य आता पूर्णपणे गायब झाले होते. ती त्याला शांतपणे बघत होती. समीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याने गाणे सुरू केले. त्याचे शब्द हळू-हळू वातावरणात घुमू लागले.
​गाण्याचे बोल होते:

​”मुझे छोडके जो तुम जाओगे,
बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे…
​सूनसान रातों में,
जब तुम अकेले होगे,
यादें मेरी सताएँगी,
जब तुम अकेले होगे…
​मुझको छोड़के…
तुम कहाँ जाओगी…
तुम कहाँ जाओगी…
बड़ा पछताओगी, बड़ा पछताओगी…”

​समीरच्या आवाजात एक वेगळीच वेदना होती. तो प्रत्येक शब्द इतक्या भावनेने गात होता की जणू काही ते शब्द त्याच्या आयुष्याची कहाणी सांगत होते. त्याचे डोळे प्रियावरच खिळले होते. प्रियाला वाटले की हे गाणे फक्त तिच्यासाठीच गायले जात आहे. तिचे डोळे पुन्हा एकदा भरून आले. प्रत्येक शब्दागणिक तिला जुन्या आठवणी आठवत होत्या. समीरचा आवाज थेट तिच्या हृदयाला भिडत होता. तिने पटकन मान खाली घातली, जणू काही ती त्याच्या डोळ्यांतून तिच्या मनातील भावना लपवू इच्छित होती.
​ समीर गातच राहिला. गाणे संपल्यावर सगळे जण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते, पण समीरला त्या टाळ्यांची पर्वा नव्हती. त्याचे लक्ष फक्त प्रियाकडे होते, जी अजूनही मान खाली घालून बसलेली होती.

काय होईल पुढे any guess…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!