खालील कथेतील पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंधित नाहीत. असल्यास तो केवळ योगायोग समजावा.
…….. एक सुसंस्कारित घराणं…….
अंजली आमलेकर ( भाग १)
विदर्भातील भंडारा शहर. या शहरात एक सुसंस्कारित ब्राह्मण घराणं राहायचं. रमेश कोल्हटकर व मीनाक्षी कोल्हटकर. त्यांना छानशी गोंडस मुले होती. परिस्थिती व्यवस्थित. त्यामुळे त्यांनी मुलांच्या शिक्षणात कुठेही कमतरता पडू दिली नाही. दोन मुले व एक मुलगी असा त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू होता. मुलांचे वडील रमेश यांची सरकारी नोकरी होती व आई एक खाजगी शिक्षिका होती. मुलांचे आजी आजोबा हे त्यांच्या जवळच राहत होते. रमेश त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांचे घरही बऱ्यापैकी मोठे होते. त्यामुळे कुठेच काहीही अडचण नव्हती.
मुले जसजशी मोठी होऊ लागली तसतश्या त्यांच्या गरजाही वाढू लागल्या. त्यांचे मित्र मंडळ घरी यायला लागले. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमही ते घरी घ्यायला लागले. त्यामुळे त्यावेळेस त्यांना हे घर कमी पडायला लागले. मुलांचे आई-बाबा नोकरीवर गेल्यावर व मुले शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर आजी आजोबा दोघेच घरी राहत. त्यांना जास्त माणसांचा सहवास हवाहवासा वाटायचा. पण जसजशा मुलांच्या गरजा वाढल्या तसतशी त्यांना आजी-आजोबांची अडचण व्हायला लागली.
आजकालच्या मुलांना स्वतंत्रता पाहिजे असते. घर मोठे असूनही त्यांना ती जागा कमी वाटू लागली. प्रत्यक्षात आजी-आजोबांशी कसे बोलावे हा प्रश्न त्यांना पडला. आजी आजोबांवर त्यांचे नितांत प्रेम होतेच पण स्वतःच्या करमणुकी पुढे त्यांना ते दिसत नव्हते. त्यांनी आई-बाबांना हाताशी धरून आपण त्यांना आपल्या गावाला पाठवू शकतो का? असा प्रश्न विचारला. त्यांचे गावाला सुद्धा खूप मोठे घर होते. पूर्वी त्यांच्याकडे खूप मोठी शेती पण होती पण आता त्यांनी ती कोणालातरी वाहायला दिली होती.
मुलांनी आजी आजोबांना आपण गावाला पाठवू शकतो का असा प्रश्न विचारताच आई-वडील तर अवाकच झाले. बापरे! आपण मुलांना इतके चांगले संस्कार दिलेत पण हा काय प्रश्न त्यांनी आपल्यासमोर उभा केला. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. रमेश व मीनाक्षीला हे काही योग्य वाटले नाही. आपल्या आई-बाबांना त्यांना दूर ठेवायचे नव्हते. मुलांच्या अट्टाहासापुढे त्यांनी स्वतःला वाकू दिले नाही. मुलांनी त्यांच्या आई-बाबांना सांगितले की आई बाबा,… तुम्ही आजी-आजोबांना थोडे गोडी गुलाबी ने सांगा.त्यांचे मनही दुखले नाही पाहिजे. आम्हाला पण ती हवी आहेत पण मित्रमंडळी आली की आम्हाला मनमोकळेपणा मिळत नाही. वडिलांनी त्यास पूर्णपणे नकार दिला. त्यांचा निर्णयही पक्काच झाला. कारण आई-बाबांना आपल्यापासून दूर ठेवणे त्यांना पटतच नव्हते. मीनाक्षी सुद्धा आई-बाबांना खूप मानत होती. तिच्या तीनही मुलांना तिने लहानाचे मोठे केले होते. खूप कोड कौतुक करून त्यांना वाढवले आणि आताच काय एवढे त्यांना ते जड वाटायला लागले! केवळ स्वतंत्रता पाहिजे म्हणून त्यांना दूर करायचे हे शक्यच नाही.
आई-वडिलांनी सरळ मुलांना प्रश्न केला की तुम्हाला जी काही मौज मजा करायची असेल ती सगळ्या समवेत करा. त्यावेळेस ते आपले त्यांच्या खोली मध्ये बसून राहतील. एवढी कशाची स्वतंत्रता पाहिजे तुम्हाला या वयात. मुले चूप झाली.
प्राची कुलकर्णी ( भाग २)
रमेश आणि मीनाक्षी यांच्यासमोर मुलांनी आजी-आजोबांना गावाला पाठवायचा प्रस्ताव ठेवला, तो क्षण त्यांच्या मनाला छिनभिन्न करून गेला. घरभर शांतता पसरली. भिंतींनाही जणू त्या बोलण्याचा धक्का बसला होता. आई-वडिलांनी डोळ्यांनीच एकमेकांशी संवाद साधला… ” आपण कुठे चुकलो का? ”
रमेशच्या मनात वादळ उसळलं. ” आई बाबा माझं आयुष्य घडवायला कष्टाने उभे राहिले. त्यांचं मायेच सावट नसतं तर मी आज इथे कसा उभा राहिलो असतो? आणि आज त्यांनाच आपल्या संसारातून दूर ठेवायचं. ”
रात्री सगळे जेवणं उरकून झोपले. मुले मोबाईल मध्ये बुडाली होती पण रमेश आणि मीनाक्षी दोघांनाही झोप लागत नव्हती. गच्चीवर बसून मीनाक्षी हलक्या आवाजात म्हणाली… रमेश, मुलं मोठी होतायेत. त्यांची इच्छा आहे पण केवळ त्यांना स्वतंत्रता मिळावी म्हणून आपण आपली मुळेच उखडून टाकणार का?
रमेश दीर्घ श्वास घेत म्हणाला….
” बरोबर आहे, माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा पाया घरच्या संस्कारांमध्येच असतो. आई-बाबांना गावाला पाठवायचं म्हणजे घरचं छत काढून टाकण्यासारखंच आहे. ”
त्या रात्री दोघांनी ठरवलं… मुलांना गोडी गुलाबी ने बोलता ठामपणे समजावून सांगायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना रमेशने समोर बसवलं. त्याचा आवाज शांत पण ठाम होता…..
” बघा, तुम्हाला मित्रांना घरी आणायचंय, त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे…. त्यात काही वाईट नाही. पण त्या आनंदासाठी आजी-आजोबांना घराबाहेर काढणं ही कल्पना मला मान्य नाही. कारण हे घर जसं भिंतीवर उभं आहे तसंच ते त्यांच्या आशीर्वादावरही उभं आहे. ”
मुलांनी नजर चुकवली. त्यांना शब्द सापडत नव्हते. मीनाक्षीनेही संवादात ऊब आणली….
” तुम्ही विसरलात का? जेव्हा लहान होता, तेव्हा आजीने झोपताना अंगाई गायली होती. आजोबांनी हात धरून तुम्हाला चालवायला शिकवलं होतं. आज जर त्यांनाच आपण दूर ठेवलं तर तुमच्या बालपणाचं ऋण कधी फेडणार? ”
घरात क्षणभर स्तब्धता पसरली. मुलांच्या डोळ्यात पाणी दाटलं. मोठ्या मुलानेच हलक्या आवाजात कबुली दिली….
” आमच्याकडून चूक झाली बाबा…. आम्हाला खरंच असं विचारायलाही नको होतं. आमच्या आनंदापुढे त्यांचं मोल कसं विसरलो आम्ही!”
त्या दिवसानंतर घरात बदल जाणवायला लागला. आजी आजोबा परके न राहता पुन्हा घराचा केंद्रबिंदू झाले. आजीने मित्रमंडळींसाठीही गरमागरम पुऱ्या, भजी, लाडू करून दिले.
मित्रमंडळी म्हणू लागली….
” वा! तुमची आजी तर आमच्या आजीपेक्षाही भारी आहे. काय चविष्ट स्वयंपाक करते!”
आजोबा मात्र गोष्टींचा खजिना होते. इतिहास, पुराणं, त्यांच्या तरुणपणीच्या गमतीजमती सगळं रंगवून सांगायचे. मित्रांचे हसण्याचे,टाळ्यांचे आवाज घरभर दुमदुमू लागले. मुलांनाही उमगलं…. स्वातंत्र्य म्हणजे मोठ्यांना दूर करणं नव्हे, तर त्यांच्यासोबत आनंद वाटून घेणं होय.
काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली. आपापल्या वाटांनी निघाली. पण कोल्हटकरांचं घर कायम एकत्र राहिलं. प्रत्येक सण, उत्सव,संकटं आणि सुख…. सगळं पिढ्यान पिढ्या एकत्र अनुभवतांना त्या घराने पाहिलं.
आज रमेश आणि मीनाक्षी वृद्ध झाले, तरी त्यांच्या डोळ्यात समाधान आहे. कारण त्यांनी संसाराचा दिवा विजू दिला नाही. मुलांना एक गोष्ट ते कायम सांगतात….
” घर मोठं भिंतींनी होत नाही तर मनानी होतं. जेव्हा पिढ्या एकत्र राहतात तेव्हाच घर खरं सुसंस्कारित ठरतं.
आणि म्हणूनच भंडार्याच्या गल्लीत लोक अजूनही म्हणतात….
” कोल्हटकरांचं घर…. खरंच एक सुसंस्कारित घराणं आहे. ”
.. अंजली आमलेकर– प्राची कुलकर्णी..
६/९/२५
