inbound4171300826209170519.png

# माझ्यातली मी
#विकेंड टास्क कथा लेखन
#समान ब्लॉग लेखन
​ कथा: प्रेमा तूझा रंग कसा…

​कॉलेजचा कट्टा म्हटलं की नुसता कल्ला आणि मजा. याच कट्ट्यावरची दोन जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणजे रिया आणि सानिया. रिया शांत, थोडी लाजरी, पण अभ्यासात हुशार. तिच्या बोलण्यात एक प्रकारचा गोडवा होता. सानिया मात्र बिनधास्त, बोलकी, आणि कोणत्याही गोष्टीची भीती नसलेली. कॉलेजमध्ये त्यांच्या गमती-जमती नेहमीच चर्चेत असत. कधी रियाला चिडवून सानिया वर्गातून बाहेर पळायला लावायची, तर कधी सानियाच्या मस्तीला आवर घालताना रिया जाम वैतागून जायची. त्यांची मैत्री म्हणजे ‘उत्तरेकडील हवा’ आणि ‘दक्षिणेकडील वारा’ यांच्यासारखी होती. दोघींमध्ये खूप फरक असूनही त्यांच्यात एक वेगळंच ‘बॉण्ड’ होतं. त्यांची मैत्री कॉलेज मध्ये नेहमीच चर्चेचा विषय होती. किती तरी मुलींनी त्यांचीं मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांची मैत्री अतूट होती.

​ त्यांच्या आयुष्यात अचानक एंट्री झाली रोहितची. रोहित दिसायला देखणा, शांत आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो दिसायला जितका आकर्षक होता, तितकाच हुशारही होता. पहिल्याच भेटीत तो दोघींच्याही मनात घर करून बसला. रिया त्याच्या शांत स्वभावावर फिदा झाली, तर सानियाला त्याची आत्मविश्वासपूर्ण वागणूक खूप आवडली. पण दोघींनाही हे माहीत नव्हतं की त्या एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या आहेत. रोहित स्वभावाने खिलाडू वृत्तीचा. तो दोघींशी मोकळेपणाने बोलायचा त्यामुळे दोघींचा गैरसमज झाला की, याला आपण आवडतो व ज्या भावना त्याच्या बद्दल आपल्या मनात आहे त्याच भावना त्याच्याही मनात आपल्या बद्दल आहे. त्यामुळे त्या एकमेकींना टाळून त्याच्याशी बोलायच्या.

​ हळूहळू त्यांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जिथे कधी गप्पांचा फड रंगायचा, तिथे आता शांतता पसरू लागली. एकत्र बसून जेवणं, एकमेकींच्या डब्यातून खाणं, कॉलेजच्या गेटपासून घरापर्यंतच्या गप्पा, हे सगळं कमी झालं. त्यांच्यातील मैत्रीची जागा एका अज्ञात स्पर्धेने घेतली होती. दोघींमध्ये ‘मी त्याच्याशी आधी बोलणार’ ही भावना वाढू लागली.
​एके दिवशी कॉलेजमध्ये ‘फेअरवेल पार्टी’ होती. सगळ्यांनी खूप तयारी केली होती. सानियाने एक सुंदर लाल ड्रेस घातला होता. तर रियाने गुलाबी शरारा घातला होता. रियाने तिला पार्टीसाठी तयार होण्यात मदत केली. त्यावेळी सानिया म्हणाली, “रिया, मला रोहित आवडतो माझे त्याच्यावर प्रेम आहे. तुला काय वाटतं? मी आज रोहितला प्रपोज केलं तर?”
​सानियाच्या या बोलण्याने रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिला धक्का बसला व मनातून खूप दुखावली गेली, पण तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं, “सानिया… तुला जे योग्य वाटेल ते कर.”
​ रियाचं हे थंड उत्तर ऐकून सानियाला थोडं विचित्र वाटलं, पण तिने त्यावर जास्त विचार केला नाही. पार्टीमध्ये सानिया रोहितसोबत नाचत होती, तेव्हा रिया दूर उभं राहून त्यांना पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण तिने स्वतःला सावरलं. तेवढ्यात रोहित तिला नाचण्यासाठी घेऊन गेला. याचा सानियाला राग आला पण तेव्हा ती काहीच बोलली नाही पण ​दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये नेहमीप्रमाणेच एकच कल्ला सुरू होता. रिया आणि सानिया एकमेकींना भिडल्या.
​”तू माझ्या मैत्रिणीसारखी वाटत नाही. तू माझ्यापासून दूर जात आहेस. तू माझ्यासोबत अशी का वागतेस?” सानिया रियाला रागाने म्हणाली.
​“मी तुझ्यासोबत चांगलीच वागतीये पण मला माझ्या प्रोजेक्ट वर लक्ष द्यायचंय. “. तुला काय वाटतं ? मला कळतं नाही का? तू माझ्या बरोबर डाव खेळतेस ते ? रियाने उत्तर दिले.
​”मी तुझ्यासोबत काही डाव वगैरे खेळत नाहीये. मला फक्त रोहित आवडतो.” सानिया म्हणाली.
​”मला पण रोहित आवडतो.” रिया नकळतपणे आपली भावना व्यक्त करते.
​दोन्ही मैत्रिणींच्या प्रेमाच्या भावना, पहिल्यांदाच बाहेर आल्या होत्या. त्यामुळे दोघींनाही धक्का बसला.
​“तुला माहित होतं की मला रोहित आवडतो, पण तरीही तू त्याच्या मागे धावलीस.” सानियाने रागाने रियाला सांगितले.
​“मला माहित नव्हतं. माझ्या मनात त्याच्याविषयी अशा भावना आहेत, हे मला नंतर कळलं.” रियाने डोळ्यात पाणी आणत सांगितले.

​ रियाच्या मनातल्या भावना बाहेर आल्यावर कॅन्टीनमध्ये शांतता पसरली. सानियाला काहीच सुचत नव्हतं. ती रागावून तिथून निघून गेली. रिया तिथेच स्तब्ध उभी राहिली. तिचे डोळे ओलावले होते. तिला वाटलं, “आज आपली मैत्री संपली.” दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. रिया आणि सानिया वेग-वेगळ्या बेंचवर बसल्या होत्या. त्या दोघी एकाच क्लासमध्ये असूनही त्यांच्यात खूप दुरावा निर्माण झाला होता. घरी आल्यावर रियाला खूप रडायला आलं. तिला सानियाची आठवण झाली. त्यांची मैत्री आणि त्यांनी एकत्र घालवलेले दिवस आठवले. रियाला वाटलं की तिने तिच्या प्रेमामुळे तिच्या मैत्रिणीला गमावलं. दुसऱ्या क्षणी, तिने निर्णय घेतला की आपण प्रेमाचा त्याग करायचा. रोहित व सानियाच्या मध्ये आपण यायचे नाही.

पण वेगळेच घडले. सानिया व रिया कॅन्टीन मध्ये बोलत असताना रोहितने ऐकले होते व आपल्या मुळे या मैत्रीणींची इतक्या वर्षाची मैत्री तुटायला आली. याचे त्याला वाईट वाटले. आपण दोघींकडे फक्त मैत्रीणी म्हणून बघतो. आपणच त्याचा गैरसमज दूर करायला हवा. रोहितने दोघींना फोन करून कॅन्टीन मध्ये बोलावले. दोघीही आल्या. हाय, हॅलो झाले. रोहितने चहा व सामोश्यांची ऑर्डर दिली व दोघींना म्हणाला, मला तूमच्या दोघींशी बोलायचे आहे, असे म्हणून त्याने बोलायला सुरवात केली. मला माहीत आहे, मी तुम्हांला आवडतो व मैत्री पेक्षा वेगळी भावना तूमच्या दोघींच्या मनात आहे. मी तूमच्या भावनांची कदर करतो, पण मी आधीच एकीच्या प्रेमात आहे. आमच्या सोसायटीत प्रिशा हि माझी बालपणीची मैत्रीण आहे. आमच्या दोघांच्या घरी माहिती आहे. आमचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्यावर आम्ही लग्न करणार आहोत. त्यामुळे साॅरी. तूमच्या सारख्या मैत्रीणी मला मिळाल्या याचा मला आनंद आहे. आपण यापुढेही असेच चांगले मित्र म्हणून राहूया. चालेल ना? तेवढ्यात चहा व सामोसे आले. चहा खाणे झाल्यावर रोहित दोघींना बाय करून गेला. रोहितने केलेल्या खुलाशाने दोघीही एकमेकींकडे बघायला लागल्या.
दोघींच्या चेहर्यावर एकाच वेळी धक्का व अपराधीपणाचे भाव उमटले. दोघीही एकदम गप्प झाल्या काय बोलावे कळत नव्हते पण दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. दोघींनी एकमेकींना मिठी मारली व साॅरी म्हणत एकमेकींचे अश्रु पुसले. सानिया बोलायला लागली, रोहितला मिळवण्याच्या नादात आपण आपली मैत्री पणाला लावली. रिया म्हणाली, खरंच गं, आपली मैत्री, प्रेमा पेक्षा जास्त महत्वाची आहे. प्रेमाच्या रंगा पेक्षा, मैत्रीचा रंग पक्का आहे. खरंच प्रेमा तुझा रंग कसा मैत्रीपेक्षा पक्का नक्कीच नाही ना?

©® लेखिका : जयश्री काळे
अलका शिंदे

4 Comments

  1. आमची कथा वाचून दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून आभार🙏💕

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!