हरवले ते गवसले…..
बरेच दिवसात कपाट लावले नव्हते. सगळा पसारा झाला होता. एखादी वस्तू काढायला गेले की, सगळे कपडे अंगावर धावून येत होते. आज जरा निवांत वेळ होता. हे कामासाठी बाहेर गावी गेलेत व मुलं सुट्टी असल्याने मामाकडे गेलेत. मग काय चला कपाट आवरूया म्हणून सुरवात केली.
सगळे कपडे बेडवर ठेवले. एकेक वस्तू काढताना अलीबाबाच्या गुहेत गेल्या सारखे वाटत होते. ज्वेलरी विखुरली होती तो बाॅक्स घेऊन खाली बसले व कानातल्यांच्या जोड्या लावताना अचानक एका कानातल्याने लक्ष वेधून घेतले. खूप जुने कानातले झुमके होते. यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मला दिले होते आणि नुसते दिले नाहीत तर स्वतः माझ्या कानात घातले ते आठवले व नकळतपणे गोड हसू आले व चेहरा लाजून गुलाबी झाला.
प्रत्येक वस्तूत जुन्या आठवणी होत्या. हि साडी लग्न झाल्यावर माहेरी गेल्यावर आईने ओटी भरताना दिली होती. हि पर्स छान आहे म्हणताच ताईने दिली. भावाच्या खजिन्यातल्या कितीतरी वस्तू माझ्याकडे होत्या त्या एका बाॅक्स मध्ये मिळाल्या. मला गाणी ऐकायला आवडतात म्हणून नवीन ट्रांझिस्टर बाबांनी दिवाळीला दिला होता. मैत्रीणी कुठे कुठे ट्रिपला गेल्या की तिथली आठवण म्हणून आणलेल्या व जपून ठेवलेल्या वस्तू वेगळ्याच जगात घेऊन जात होत्या. नवीन आले की जुने मागे पडते पण त्याचे महत्त्व कमी होत नाही उलट असे अचानक समोर आले की, जो आनंद होतो तो शब्दात सांगता येत नाही.
जयश्री काळे.
