#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (१/९/२५)
#निरोप
#ताटातूट
गेले काही दिवस विभा एकटीच असली की तिच्या डोळ्यात अश्रू दाटून यायचे. त्याला कारणही तसंच होतं. तिच्या लाडक्या सावूचे कंपनीतर्फे जपानसाठी “ऑनसाईट” पोस्टिंग झालं होतं. खरं तर खूपच लवकर सावूला ही सुसंधी मिळत होती त्यामुळे विभा सुखावली होती परंतु एकुलती एक लेक दीड वर्षासाठी आपल्यापासून दूर जाणार या कल्पनेने सारखे तिचे डोळे भरून येत होते.
सावली ही विभा आणि विक्रमची एकुलती एक लेक. विभाच्या मनात आलं की आत्ता आत्तापर्यंत आपलं बोट धरून शाळेत जाणारी सावू मोठी झाली कधी, नोकरीला लागली कधी आणि आता एकदम परदेशात जाणार. ह्या विचाराने विभाचे चित्त थाऱ्यावर नव्हते. आज अखेर सावू जपानला जाण्याचा दिवस उजाडला आणि विभाचे मन सैरभैर झालं. खूप उत्साही असणारी सावूसुद्धा कावरीबावरी झाली होती. विमानतळावर सावूला निरोप देण्यासाठी विभा गेली तेव्हा तिने तिच्या वहिनीने सांगितलेले एक वाक्य लक्षात ठेवलं होतं. “विभा डोळ्यात अजिबात अश्रू आणायचे नाहीत. तिथे सावू एकटीच जाणार आहे. इथे तुझ्या पाठीवर हात फिरवायला आम्ही सगळे आहोत.” या वाक्याची अंमलबजावणी करताना विभाला आपले अश्रू आवरणे खूपच कठीण गेलं. हसऱ्या चेहऱ्याने तिने सावूला निरोप दिला आणि ती आत गेल्यावर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
©️®️ सीमा गंगाधरे


सुंदर..तुमचा अनुभव लिहिलात का सीमा ताई