#माझ्यातली मी…
#शतशब्द कथा लेखन
# निरोप
शीर्षक-अखेरचा ढोल…
गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष, सगळं काही नेहमीसारखं होतं. पण माझ्या डोळ्यासमोरून बाप्पाची मूर्ती नाही, तर आमच्या शेजारच्या काकांचा हसरा चेहरा सरकत होता. घरातला बाप्पाचा उत्साह, मोदकांचा सुगंध, ती रोषणाई… सगळं एका क्षणात शांत झालं.
चार दिवसांपूर्वी आरती करताना अचानकच काका खाली कोसळले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ‘लवकर परत येईन आणि यंदाही मिरवणुकीत पहिला ढोल मीच वाजवणार,’ असं ते म्हणाले होते. त्यांचा तो आत्मविश्वास पाहून मला वाटलं, बाप्पा त्यांना लवकर परत पाठवेल. पण आज, बाप्पाच्या निरोपाच्या दिवशी, काकांनीही कायमचा निरोप घेतला.
बाप्पाला निरोप देताना डोळे भरले, पण काकांचा निरोप घेताना मनात फक्त एकच प्रश्न होता – ‘आता पुढच्या वर्षी कोण विचारणार, ‘कधी येणार बाप्पा?’ माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले, पण ढोलांचा गजर काही थांबत नव्हता. अचानक, ढोलांच्या गजरात एक वेगळीच लय जाणवली. ढोलांचा आवाज अधिकच जोरदार आणि उत्साही झाला. तो आवाज काकांचाच होता. माझ्या नकळत मी त्या आवाजाच्या दिशेने ओढला गेलो.
जेव्हा मी मागे वळून पाहिलं, तेव्हा ढोल वाजवणारा काकांचा मुलगा, राजू, डोळे पुसत ढोल वाजवत होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षाही एक वेगळाच निर्धार दिसत होता. ‘हा अखेरचा ढोल बाबांसाठी,’ असं तो माझ्याकडे पाहून म्हणाला. काकांचा विरह एक वर्षाचा नव्हता, तो अखेरचा होता. पण मला जाणवलं की काका खऱ्या अर्थाने गेले नव्हते. त्यांनी त्या ढोलाच्या गजरात, त्यांच्या मुलाच्या प्रत्येक ठोक्यात स्वतःला जिवंत ठेवलं होतं. ती पोकळी आता भरून येत होती.
काकांचा ढोल आता आम्ही वाजवत होतो. एका वर्षाच्या प्रतीक्षेचा निरोप आणि कायमच्या विरहाचा निरोप एकाच वेळी माझ्या आयुष्यात आला होता. पण आता तो विरह कायमचा नाही, हे मला कळलं होतं. तो ढोल वाजवणारा आता वेगळा होता, पण त्यातला उत्साह, त्यातली भावना तीच होती – काकांचा तो अखेरचा ढोलच होता….
~अलका शिंदे

Khup sundar
अप्रतिम.. खूप भावनिक
इमोशनल