#गणपती विशेष टास्क.
#क्रिएटिव्हटास्क.
गणपती सजावटीच्या आयडिया.

भाद्रपदातील चतुर्थी विशेष महत्त्वाची कारण भद्र म्हणजे शुभकारी, कल्याणकारी, मंगलकारी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भाद्रपदातील शेतीचे नुकसान होऊ नये आणि देशावर विघ्न येऊ नये म्हणून विघ्नकर्त्याची स्थापना भाद्रपदात केली जाते.

गणेशोत्सव म्हटला की घराघरात, मंडपात आणि सोसायटीमध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते. फुले, रांगोळ्या, तोरणे, कापूर, धूप उदबत्त्या, पारंपारिक तशीच आधुनिक सजावट….. सगळ्या प्रकारांमध्ये भक्त आपला उत्साह आणि कल्पकता व्यक्त करतो. आजच्या काळात सजावट ही शोभा नाही तर एक संदेश देणारी कलाकृती बनली आहे. चला पाहूया गणपती सजावटीच्या 10 खास क्रिएटिव्ह कल्पना……..

(१) पुस्तक व ज्ञानाची सजावट:-
लहानशा लायब्ररी सारखा मंडप, भोवती ठेवलेली विविध रंगी आणि आकाराची ,विषयांची पुस्तके. अक्षरांचे सजावटी पॅटर्न. विघ्नहर्ता म्हणजे ज्ञानदाता हा संदेश देता येतो.

(२) गो ग्रीन (झाडांच्या रोपांचा दरबार)

कुंड्यांमधील लहान रोपे, फुलझाडे ,मनी प्लांट, बोगनवेल, जाई जुईचे वेल वापरून मंडप आणि परिसर सजवता येतो.
मंडपात कृत्रिम सजावट न करता औषधी वनस्पती उदाहरणार्थ, ओवा, तुळस, गवती चहा, कढीपत्ता अशासारख्या उपयोगी वनस्पतींची आकर्षक कुंड्यात मांडणी करून सजावट करता येते.
त्यामुळे सजावटीला एक नैसर्गिक, टवटवीत ताजेपणा येतो. उत्सवानंतर या कुंड्या रोपे देवळात, शाळेत, घराच्या अंगणात पुन्हा लावता येतात.

(३) फळ आणि भाजीचा मंडप:-
फळांचे रंग भाज्यांचे रंग यांचं उत्कृष्ट कॉम्बिनेशन करून आकार लक्षात घेऊन उत्कृष्ट सजावट करता येते शिवाय उत्सवानंतर गरजूंना, गरिबांना, अनाथ आश्रमाला दान करता येते.

(४) पेपर मॅशे मूर्ती:-

कागद, पुठ्ठे, जुन्या वर्तमानपत्रांपासून किंवा रद्दीतील कागदापासून विविध कलाकृती उदाहरणार्थ फुले, पंखे, लहान मखर तयार करता येतात. मोठे पुठ्ठे वापरून मंदिरासारखी रचना तयार करता येते.
नुसत्या मूर्तीच नाही तर संपूर्ण मंडप पेपर मॅशने (ओल्या कागदाच्या लगद्याने) तयार करता येतात. हलके, टिकाऊ आणि सहज नष्ट होणारे, पर्यावरण पूरक.

(५) फुलांची सजावट :-

फुलांची सजावट नेहमीच आकर्षक दिसते झेंडूचे विविध प्रकार, गुलाब, जाई जुई, चाफा, पारिजात, जास्वंद इत्यादी फुलांच्या माळा, आकर्षक तोरणे, फुलांची जाळी किंवा पडदा अशा फुलांचा वापर करून मखर तयार करू शकतो किंवा मूर्तीची पार्श्वभूमी सजवणे हा ही एक उत्तम पर्याय आहे या फुलांचा नंतर खतासाठीही वापर करता येतो.
(६) बियाणांचा मंडप :-
गहू, तांदूळ, मूग, मटकी, चवळी इत्यादी सारख्या बियाणांनी सजवता येते शिवाय आजूबाजूला मोहरी किंवा खसखस टाकली की त्याला छान फुले येतात त्यानेही मंडप सुशोभित करता येतो
उत्सवानंतर धान्य वाटून टाकता येते.

(७) शंख, शिंपले आणि रंगीत दगड :-

समुद्रकिनारी रहात असाल तर किनाऱ्यावरची चमकणारी रेती, शंख, शिंपले, रंगीत कोरल या सर्वांची उत्कृष्ट मखर सजवता येते आणि त्याला एक वेगळाच लूक मिळतो.

(८) पुनर्वापर आणि नवनिर्मिती:-

जुने कपडे आणि साड्या, रंगीबेरंगी दुपट्ट, यांचा वापर करून मखर आणि सजावटीसाठी पडदे तयार करू शकतो. या कपड्यांचा पुन्हा पुन्हा वापर होऊ शकतो आणि ते आकर्षकही दिसतात. जुन्या पैठण्या आणि चंद्र कळे पासून
चौरंगाचे कव्हर, बॅक ड्रॉप, समई खाली ठेवायला कमळ, उत्कृष्ट तोरणे अशा अनेक वस्तू बनवू शकतो.

(९) टाकाऊतून टिकाऊ:-

पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, प्लास्टिकचे डबे, नारळाच्या करवंट्या आणि झावळ्या
यांचाही सजावटीसाठी वापर करता येतो उदाहरणार्थ… बाटल्यांना रंग देऊन , एलईडी दिवे घालून सुंदर दिवा बनवता येतो. शिवाय फुले, पानें, छोटे पक्षीही बनवता येतात.

(१०) सेंद्रिय रंगांची भिंत सजावट:-

हळद, माती, चहा, जास्वंद, कापूर आणि गिरी यांच्यापासून नैसर्गिक रंग बनवून मंडपाच्या कलात्मक भिंती सजवता येतात. पर्यावरणाला हानी पोहोचत नाही आणि भिंती ही सुरेख दिसतात.

अशी सजावट फक्त डोळ्यांना आनंदच देत नाही तर धरती मातेचे ओझंही कमी करतात.
” बाप्पा म्हणजे पर्यावरणाचा रक्षक त्याचे स्वागत आपण निसर्गाशी एकरूप होऊनच करावं” हा खरा संदेश यातून पसरतो…..

” कागद, माती, रंगी फुलांनी,
मंडप सजवा भक्तिभावांनी,
प्लास्टिक टाळा, निसर्ग जपा,
संदेश द्या साऱ्या जनांनी .”

सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!