#माझ्यातली मी
#गणपती विशेष टास्क
#लेखन टास्क आठवणी
#गणपती आठवणीतला
बालपणीचा गणेशोत्सव: आठवणींचा उत्सव
गणपतीचे दिवस आले की मन भूतकाळात रमून जाते,
बालपणीच्या आठवणींचे गोड क्षण पुन्हा अनुभवावे वाटते.
आमच्या घरी बाप्पा नसले, तरी गणेशोत्सवाचा आनंद होता.
शेजारच्या सार्वजनिक गणेशोत्सवात वेगळाच रंग भरला होता.
वर्गणी गोळा करण्यापासून, मंडप उभारण्यापर्यंतचा उत्साह सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी, सारेजण घेत त्यात भाग. “पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा,
“गणराज रंगी नाचतो”, “तूच सुखकर्ता” ही गाणी कानावर पडायची, आणि त्या सुरांमध्ये आमची बालमने रमून जायची.
संध्याकाळची आरती, प्रसादाचा गोडवा
प्रसाद कधी साधा,कधी शेंगदाणे साखर, साखर फुटाणे असाच असायचा पण तरी प्रसादासाठी चढाओढ असायची.
आणि रात्रीच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहणे,
रस्त्यावर चटई टाकून बसलेले सारेजण,
तो पडद्यावर दिसणारा हलकासा प्रकाश,
आणि त्यात दडलेले निरागस कुतूहल,
सिनेमातील काहीही कळत नव्हतं, तरी ते पाहण्यात एक वेगळीच मजा होती.
गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये फक्त आरती आणि सिनेमाच नाही, तर अनेक स्पर्धा आणि खेळही असायचे.
मंडपाच्या बाहेर छोट्याशा जागेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा भरवली जायची, आम्ही सारे उत्साहाने त्यात भाग घ्यायचो.एका बाजूला बच्चेकंपनीसाठी चमचा-लिंबू आणि संगीत खुर्चीचे खेळ असायचे,
हसण्या खिदळण्याचा आवाज सगळीकडे घुमायचा.
स्पर्धा जिंकणाऱ्यांना लहानमोठी बक्षीस मिळायची,
आणि जिंकणाऱ्यापेक्षा भाग घेणाऱ्यांचा आनंद मोठा असायचा.
मंडळाचे कार्यकर्ते मोठ्यांसाठीही काहीतरी घेऊन यायचे,कधी अंताक्षरी गाण्याचा कार्यक्रम, तर कधी नृत्य स्पर्धा. हा आनंद, हा उत्साह, सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणायचा.
गणपतीच्या दहा दिवसांपैकी एका खास दिवशी,
आई-बाबा आम्हाला पुण्याला घेऊन जायचे.
सार्वजनिक गणपतीच्या देखाव्यांची भव्यता बघायला,
त्या गर्दीतून वाट काढत आम्ही निघायचो.
पेठांमध्ये शिरताच एक वेगळंच जग दिसायचं,
प्रत्येक चौकात एकापेक्षा एक देखणे देखावे मांडलेले असायचे.
कुठे पौराणिक कथा जिवंत झाल्यासारख्या वाटायच्या,
तर कुठे सामाजिक संदेश देणारे देखावे मन जिंकून घ्यायचे.
एका देखाव्यात डोंगरावर शंकर-पार्वती उभे,
त्यांच्या डोक्यावर चंद्रकोर आणि निळ्या प्रकाशाचा झगमगाट, हे सारं इतकं खरं वाटायचं की डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
फुलांच्या माळा, सुवासिक धूप आणि रंगीबेरंगी रोषणाई,
त्या वातावरणात आम्ही हरवून जायचो.
एका ठिकाणी तर गणपतीची मूर्ती अशी ठेवली होती,
की जणू ती थेट स्वर्गातून अवतरली आहे.
तिच्याभोवती लावलेले रंगीत दिवे आणि नक्षीदार फुलांचे हार,त्यामुळे बाप्पा अधिकच तेजस्वी दिसत होते.
एका चौकात पाहिलेला देखावा तर कधीच विसरता येणार नाही.
तेथे एका वाड्यातील जुन्या काळातील गणपतीचं रूप दाखवलं होतं. लाकडी नक्षीकाम, जुन्या पद्धतीची रोषणाई, आणि त्या काळातले गणपतीसमोरचे कार्यक्रम.
हे सारं पाहताना वेळ कसा निघून जायचा हे कळतंच नव्हतं.
परतीच्या वाटेवर मुलांच्या खेळण्यांच्या गाड्यांची गर्दी असायची,
फुगे, कागदी कॅमेरे आणि प्लास्टिकची खेळणी घ्यायचो.
ती साधीसुधी खेळणीही किती आनंद देऊन जायची.
आजही गणपती आले की त्या आठवणी ताज्या होतात,
तो उत्साह, तो आनंद, ती निरागसता,
सारं काही मनात घर करून राहिलेलं आहे.
हा उत्सव फक्त १० दिवसांचा नव्हता,
तो आठवणींचा, आनंदाचा आणि उत्साहाचा
एक अविस्मरणीय काळ होता. ~अलका शिंदे
