लवकरच गणरायाचे आगमन सर्वत्र होणार आहे त्यानिमित्ताने…..
शीर्षक :- सुगंध, सजावट आणि स्नेहबंध.
गणेश चतुर्थी जवळ आली की घराघरातील वातावरणच बदलून जायचं. घराच्या अंगणात शेणाने सारवण, तुळशी वृंदावन स्वच्छ करणे, देव्हाऱ्याला रंग देणे ही काम सुरू व्हायची. नुसत्या बाप्पाच्या आगमनाच्या बातमीनेच घरात एक उत्साह संचारलेला असायचा.
सजावट आणि कलात्मकता :-
सजावटीसाठी बाजारपेठेतून काहीही विकत आणलं जायचं नाही. घरात उपलब्ध असलेल्या वस्तू यांचा कल्पकतेने वापर व्हायचा. टाकाऊतून टिकाऊ बनवण्याची संकल्पना तेव्हापासूनची.
मातीच्या वस्तू:-
घरातील मुलं आणि मोठी माणसं मिळून माती पासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करायचे. हत्ती, मोर, पण त्या, बाप्पाचं वाहन असलेला उंदीर मामा, आणि गणपतीची मूर्ती सुद्धा काही जण घरीच बनवत. या वस्तू बनवून झाल्या की तो रंगवण्याचा सोहळा असायचा.
तसेच प्लास्टिकच्या बाटली पासून रंगीत फुले, पाने बनवणे, दिवे बनवणे आणि या वस्तू रंगवणे. नारळाच्या करवंटी पासून सुद्धा गणपती बनवत असत. सजावटीच्या काही वस्तू सुद्धा बनवल्या जायच्या आणि डहाळ्यांचा आरास करण्यासाठी उपयोग केला जायचा.
रांगोळी आणि चित्रकला :-
घराच्या मुख्य दारासमोर आणि गणपतीच्या समोर मोठीच्या मोठी, रंगीबेरंगी रांगोळी काढली जायची, त्यासोबत लक्ष्मीची पावलं ही असायचीच. रांगोळीचे रंगही घरीच बनवले जात. तांदळाच्या पिठीत हळद, कुंकू, गेरू मिसळून तयार केले जायचे
काही घरात भिंतीवर सुद्धा चित्र काढली जायची उदाहरणार्थ मोर, स्वस्तिक, त्रिशूल, हत्ती अशी शुभचिन्ह रेखाटली जायची.
प्रसादाचा सुगंध :-
गणेश उत्सवात लाल भडक जास्वंद, टपोरा लाल रंगाचा गुलाब, दूर्वा, पत्री आणि सुवासिक फुलं गोळा करतात. तेही स्वतःच्या अंगणातील बागेतून. तोही आनंद वेगळाच!
मोदकांचे प्रकार :- तळणीचे आणि उकडीचे मोदक हे दोन प्रकार आपापल्या घराघरातील रितीप्रमाणे बनवले जात. ते नैवेद्यासाठी विशेषतः बनवले जातात. पंचखाद्य, विविध प्रकारचे लाडू, करंजा , पुरणपोळी
असे विविध गोड पदार्थ बनवले जात. यासाठी घरातील सर्वांचीच मदत व्हायची. पुरुष मंडळी नारळ फोडून देत, बायका ते नारळ खवत असत आणि मुले ते पळवत असत.
आज-काल चॉकलेट, आंबा, पिस्ता, गुलकंद असे विविध प्रकारचे मोदक बाजारात दिसतात. पण पारंपारिक मोदकांची मजा त्यात नाही. घराघरातून गूळ, खोबरं, वेलची, जायफळ यांचा सुगंध गल्लीभर दरवळायचा, त्या सुवासानेच मन तृप्त व्हायचे.
सर्व पदार्थ स्वच्छ आणि सात्विकच असायचे. सोवळ्यात केलेले.
घरातील वातावरण :-
गणेश उत्सवात घर हे घर न राहता ते मंदिरासारखे पवित्र स्थान बनवून जाई.
भक्तिमय वातावरण :-
सकाळ संध्याकाळ आरत्या, भजन आणि मंत्रोंचार सुरू असायचे. आरतीसाठी शेजारी पाजारी, मुले गोळा व्हायची. एकत्र आरती, भजनं, टाळ मृदुंगाचा गजर, धूप आणि उदबत त्यांचा मनमोहक सुगंध हा एक अविस्मरणीय अनुभवच! त्यामुळे लहान मुलांच्या आरत्या आणि मंत्र तोंड पाठ व्हायची हा फायदाच नाही का?.
एकत्रित कुटुंब :-
गणेश उत्सवात दूरवर असलेली मुलं- बाळ, नाते बाईक, मित्रमंडळी गोळा होतात. एकत्र गप्पा मारणं, सुखदुःख वाटून घेणं, बाप्पाच्या सेवेत रमून जाणं यामुळे नकळतच मुलांच्यावर आणि नव्या पिढीवर चांगले संस्कार होतात. आपल्या रितीभाती कळतात. याशिवाय कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी अधिकच घट्ट होते.
घरातील प्रत्येक जण काही ना काही काम करायचाच. संपूर्ण तयारीत कृत्रिमतेचा लवलेशही नसायचा. या नैसर्गिक साधेपणातच एक वेगळा आनंद, आपुलकी आणि समाधान दडलेलं असायचं. बाप्पाचं आगमन म्हणजे फक्त पूजा नव्हे तर सर्वांच्या हातांनी घडवलेलं, प्रेमाने सजवलेलं जणू नात्याचं बंधनच. त्यात कलेचा आणि मायेचा एक अनोखा संगम होता. ज्याची आठवण आजही मनात आनंद देऊन जाते. काळ बदलला, पद्धती बदलल्या पण गणेश उत्सव आनंदाने, प्रेमाने, सहकार्याने
आजही साजरा केला जातो याचं कौतुकच! त्यामुळेच पुढच्या पिढ्यांना आपले संस्कार, सण-उत्सव, परंपरा यांचे ज्ञान मिळते.
मातीच्या मूर्तीत जीवनाचा स्पर्श,
सजावटीतून उमले, नवा चैतन्याचा हर्ष,
एकमेकात गुंतता, नात्यांचे हे धागे,
घर हेच मंदिर, असा बाप्पाचा संदेश संगे.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

छान