नवे वारे

#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (१५.८.२५)
#आउटिंग आणि स्वातंत्र्यदिन

नवे वारे

” अगं सायली; किती गडबड…! आणि ह्या मैत्रिणी.. सकाळीच ? कुठे म्हणायचे आउटिंग आज?” आजीने विचारले.

“काय ग मुलींनो, आज १५ ऑगस्ट ना ? मग कॉलेजमध्ये जाऊन ध्वजवंदन वगैरे काही नाही का तुम्हाला ? आमच्या वेळेला सकाळी लवकर उठून परिट घडीचे गणवेश घालून आम्ही शाळेत हजर…देशभक्तीपर गीते, ध्वजारोहण, मानवंदना, संचलन, भाषणे आणि मग खाऊ वाटप..! किती भारावलेले असायचो आम्ही..! आणि तुम्ही मुली…”

एकीकडे हे सर्व ऐकणारी सायली आवरून बाहेर आली..म्हणाली, ” अगं आजी बरोबर आहे तुझं…आता काळ बदलला आहे…आम्ही आउटिंगला जातोय..पण ते बघ, सर्वांनी मस्त पांढरे कपडे घातलेत…दुचाकींना तिरंगे लावलेत..आणि ती बघ छोटी रोपं, बिया, पाण्याच्या बाटल्या घेतल्यात बरोबर..! साऱ्या जणी जवळच्या टेकडीवर जाऊन वृक्षारोपण करणार..! आज १५ ऑगस्टच्या निमित्ताने आमचाही देशासाठी खारीचा वाटा..!
चला गं..!”

आजी पाठमोऱ्या मुलींकडे बघत समाधानाने पुटपुटली…
“चला..देशभक्तीची बीजे इथेही रुजत आहेत की..!”

सौ.सुविद्या करमरकर
पुणे

शब्द संख्या…१३१

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!