#माझ्यातलीमी
#लघुकथलेखन (१२/८/२५)
#लघुकथा
#संतोष
🩵 संतोष 🩵
रात्रीचे अकरा वाजता राजीव संतोषच्या घरी आला.
“अरे दादा! अचानक एवढ्या रात्रीचा आलास!”
“संत्या.. पार लुबाडला गेलो .. घेतलेलं कर्ज फेडता नाही आलं, सावकाराने शेतीवर कब्जा केला. सगळे पैसे हिच्या आजारपणात गेले. तुझी मदत मिळेल म्हणून आलो.”
आतून उमा ऐकत होती.
जेवण कमी पडू नये म्हणून थोड्या पोळ्या आणि भात बनवला .. जेवणं झाल्यावर आवरून खोलीत गेली. संतोषला झोपण्याच्या नाटकातून उठवलं.
“आले परत हात पसरत, तुम्ही नेहमीप्रमाणे हवे तेवढे पैसे देणार..!! एवढं करता त्यांच्यासाठी, त्यांना काही किंमत आहे का? वहिनीच्या बाळंतपणात, आजारपणात मदत केली! अमेयच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. सुमी च्या लग्नातही सारा खर्च तुम्हीच केला…”
तो म्हणाला, “मी मदत नाही करणार तर कोण करणार..? अमेय, सुमी माझे मुलंच ना! आपले प्रवीण, राहुल जसे, तसेच तेही.”
“हेच म्हणते मी..! एवढी वाडवडीलांची शेती, पण आपल्याला कधी काही मिळालं? तीस वर्ष होऊन गेली .. पण नाही .. !!”
“आपल्याला काही कमी आहे का!? माझं शिक्षण दादानेच तर केलं. मला नोकरी लागली. आपण शहरात राहतो, मुलांना चांगलं शिक्षण देतोय. आपल्या लग्नाची जबाबदारी, शहरातील आपलं वास्तव्य यासाठी त्यानेच तर मदत केली. तुला किती सांभाळून घेतलं! तुला स्वयंपाकही वाहिनीनेच शिकवला ना!”
उमाचा रोख बदलला. “त्याचं एक वेळ ठीक, सख्खे आहेत. तुम्ही नावाप्रमाणेच संतोषी आहात. सगळ्यांना मदत करायला पुढे! नातेवाईक, मित्र, शेजारी.. किती मित्रांना तुम्ही आर्थिक मदत केली. तुमच्या शब्दाने किती मुलांना मेडिकल ला प्रवेश मिळाला. डीन तुमचा चुलत भाऊ असल्याने येतात तुमच्याकडे वशिल्यासाठी. आपल्या प्रवीणसाठी मात्र नाही टाकला शब्द. बिचारा झालाय बी. एस. सी. ! ”
“वीस हजारांसाठी इतका चांगला प्लॉट गेला! तुमच्या मित्रांनी थोडे थोडे पैसे दिले असते तर मोक्याची जागा गेली नसती. देणगी देता न आल्याने राहुल ला इंग्रजी शाळेत शिकवता आले नाही.”
संतोष हातच न ठेवता मदत करणारा आणि केलेली मदत विसरणारा!. पण इतरांनी केलेली मदत मात्र लक्षात ठेवायचा.
त्याने उमाला समजावले. “हे बघ असा त्रागा केल्याने आपण सुखी नाही होऊ शकत. आपल्याला कुणी आर्थिक मदत नाही केली. पण आपल्याला मानसिक आधार त्यांचाच मिळाला ना. आपले नातेवाईक तिकडे गावात. कधी मुलं आजारी पडली, तुला काही झालं की तेच धावून यायचे. दोन वर्षांपूर्वी माझा अपघात होऊ पायाला फ्रॅक्चर झालं तेव्हा दवाखान्यात धावपळ करायला त्यांचीच तर मदत झाली. प्रवीण च्या मेडिकल शिक्षणाबद्दल म्हणत असशील तर त्याला वशिल्याने नव्हे तर स्वहुशारीवर प्रवेश मिळावा असे मला वाटत होते. राहुलला इंग्रजी शाळेत शिकवण्याचा हट्ट तुझा होता. त्यामुळे तुला असं वाटत. पण बघ, मराठी शाळेत शिकूनही आपला राहुल आता अभियांत्रिकीचं शिक्षण घेतोच आहे ना. ”
“एक कायम लक्षात ठेव उमा, आपण इतरांसाठी काय चांगलं केलं यापेक्षा त्यांनी आपल्यासाठी काय चांगलं केलं हे लक्षात ठेवलं तरच आपण सुखाने जगू शकतो.”
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (१२/८/२५, ११:३०AM)
शब्दसंख्या : ४००
———————————————-
टीप: ही कथा ६०% माझ्या आई बाबांची आहे. भावनेच्या भरात ८०४ शब्द झालेले, त्यावेळी कथा ८०% खरी होती, पण शब्द कमी करताना रिॲलिटी पासून दूर गेली.


सुंदर कथानक 👌👌.
Thank you tai