बोल अंतरमनाचे

#माझ्यातली मी…
#लघुकथा लेखन
#दि -४/८/२०२५

🌹 अंतरमनाचे बोल 🌹
बागेतील कठड्यावर बसून तो दूरवरच्या शहराच्या दिव्यांकडे पाहत होता. दिव्यांची ती चकाकी त्याला आपल्या आयुष्याची खिल्ली उडवल्यासारखी वाटली. त्याच्या ओठांवर नकळतपणे, ‘समाधानी आहे का मी?’ हे शब्द आले आणि विचारांचं वादळ मनात उठलं.
‘मनाचे श्लोक’ आणि ‘चाणक्य नीती’ यातून मिळालेले संस्कार त्याने जपले. ‘सत्य बोलावे’, ‘प्रामाणिकपणा’ ही तत्वे मनावर कोरली. पण आयुष्याच्या वाटेवर चालताना त्याला जाणवले, की केवळ तत्त्वांच्या बळावर आयुष्य जगता येत नाही.
व्यवसायात मोठा करार हातातून निसटत असताना त्याला तत्त्वांना मुरड घालावी लागली. प्रतिस्पर्धकाला हरवण्यासाठी त्याने असे डावपेच वापरले, जे त्याच्या तत्त्वांच्या विरुद्ध होते. त्याला विजय मिळाला, पण आतून एक पोकळी निर्माण झाली, आणि मनात समाधान नव्हते.
कुटुंबाच्या गरजांसाठीही त्याला अनेक तडजोडी कराव्या लागल्या.
वडिलांचे ‘पैसा महत्त्वाचा नाही’ हे बोल आठवत होते, पण मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असताना त्याला वाटाघाटी कराव्या लागल्या. हे त्याला पटत नव्हते, पण पर्यायही नव्हता. प्रसंगी डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यावी लागली. पण मुलांच्या स्वप्नासाठी त्याने आपल्या संस्काराशी तडजोड केलीच. मुलाचा आनंद महत्त्वाचा मानला.
त्याला आठवले, आपला एक मित्रही तत्त्वांवर चालणारा होता. त्याला तो भेटायला गेला. त्याच्या बोलण्यातून त्याला जाणवले की त्यानेही वेगळा मार्ग निवडला आणि तो खूप यशस्वी झाला, तरी त्याच्या चेहऱ्यावरही तोच अतृप्त भाव होता. त्याला त्याचे आवडते शिक्षक आठवले, जे सध्या वयस्कर झाले होते; त्यांच्याशी बोलूनही तीच भावना त्याच्या मनात आली. फक्त तत्वज्ञानाने आयुष्य कधीच जगता येत नाही, व्यावहारिक व्हावेच लागते.
तत्वाशी तडजोड ही प्रत्येक जण करतोच.
त्या क्षणी त्याला जाणवले, की आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा तत्त्वांना बाजूला सारून पुढे जावे लागते. हेच जीवन आहे. आयुष्यात येणारे झटके आणि चटके माणसाला व्यावहारिक बनवतात.
त्याने खिशातून आईचा फोटो काढला. ती नेहमी म्हणायची, ‘तत्वं महत्त्वाची आहेत, पण परिस्थितीला जुळवून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.’ आज त्याला त्या वाक्याचा खरा अर्थ कळला होता. त्याच्या मनात अजूनही समाधान नव्हते, पण एक गोष्ट निश्चित होती: उद्यापासून तो एक नवीन सुरुवात करणार होता. एक अशी सुरुवात, जिथे तत्त्वे आणि व्यवहार यांचा समतोल असेल आणि जगण्याचा आनंद असेल.
शब्दसंख्या ३०० ते ३१० ~अलका शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!