#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन(४.८.२५)
अबाधित
ती तशी सुखवस्तू कुटुंबातील. आई सोज्वळ, सात्विक तर वडील करारी, शिस्तप्रिय..त्यामुळे प्रामाणिकपणा, सत्याची कास, शिस्त, जिद्द, परोपकार आणि मेहनत घेण्याची तयारी हे सारे बाळकडू तिला लहानपणापासूनच घरातून मिळालेले. खूप हुशार आणि सालस..यथावकाश तिचे लग्न झाले. मनासारखं नवरा मिळाला आणि राजाराणीचा संसार सुरू झाला. छान चाललं होतं तिचं ..!
पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अवघ्या चार वर्षातच नवरा गेला आणि तिच्यावर जणु आकाश कोसळलं. ना मूल ना बाळ..! सावरायला वेळ लागला तिला..मग पुन्हा विचार करण्याचा सासर माहेर दोन्हीकडून आग्रह होऊ लागला..पण तिचा ठाम नकार..! तिच्या मनात काही वेगळेच चालू होते.
तिला पहिल्यापासूनच समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती..आवड होती. म्हणून तिने वेगळा मार्ग निवडला. मूक-बधिर मुलांना शिकवण्याचा तिने कोर्स केला. सोपे नव्हते ते..! पण जिद्दीने पूर्ण केले सारे तिने..आणि अगदी छोट्या शहरातील एका अनुदानित निवासी आदिवासी मूक -बधिर शाळेत मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाली.. जवळच छोटी खोली घेऊन राहू लागली. मनापासून सारे सांभाळू लागली. स्वतःला वाहून घेतले तिने..
सारे बरे चालू होते. पण गावातील राजकारण, काही पुरुषी अप प्रवृत्तीचा तिला प्रचंड त्रास होऊ लागला. तिच्यावर चुकीच्या गोष्टी करून पैसा घेण्यासाठी दबाव वाढू लागला चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न सुरू झाला..खूप चटके बसू लागले. प्रचंड मनस्ताप ! घरच्यांनी सारे सोडून येण्याचा पुन्हा पुन्हा सल्ला दिला. तिलाही तिची पापभीरू वृत्ती, प्रामाणिकपणा सारे तत्वज्ञान व्यर्थ आहे असे वाटू लागले. पण ती बधली नाही.
आणि एक दिवस शाळेतील एका पुरुष शिक्षकाने तिला पैसे घेतल्याच्या खोट्या आरोपात अडकवले.. कधीही न पाहिलेले पोलिस स्टेशन..तिथे काढलेली ती एक रात्र..! सारे असह्य होते तिच्यासाठी..!
पण हरली नाही ती..ना हताश झाली. सत्य आणि त्यासाठी लढण्याची जिद्द…ती वरपर्यंत गेली.. शेवटपर्यंत लढली.. स्वतःला सिद्ध केले. आणि एक आदर्श मुख्याध्यापिका म्हणून मानाने संस्थेतून निवृत्त झाली..!
आजही जेव्हा जेव्हा ती मागे वळून पाहते, तेव्हा तेव्हा ती अस्वस्थ होते. जुन्या जखमा डोकं वर काढतात. त्यावेळचे बसलेले ते चटके, ते झटके तिला आजही व्यथित करतात…पण खूप खंबीर आहे ती.!
आपल्या तत्वांच्या विजयाने खूप समाधानी आहे ती. आज ताठ मानेने जगते आहे..!!
सौ. सुविद्या करमरकर
पुणे
शब्द संख्या – ३१२
