#श्रावण
नटून सजून श्रावण आला
हिरव्या नवलाईत लाजला
धरेवर साऱ्या उत्साह संचारला
उधाण येई मग आनंदाला
लाल हिरवा निळा आणि पिवळा
अनेकविध रंगांच्या चहूकडे फुलमाळा
मेघ दाटतो आकाशी सावळा सावळा
मोर नाचतो फुलवून पिसारा निळा
दूर क्षितिजावर इंद्रधनुष्य दिसे
लेकी बाळींच्या हृदयी माहेरचे स्वप्न वसे
एक झोका मात्र तिचाच असे
आनंदाचा झरा तिला त्यात गवसे
नभी पक्षांचा थवा विहरतो
क्षणात ऊन तर क्षणात पाऊस पडतो
इंद्रधनुचा खेळ आकाशी दिसतो
आसमंत सारा चैतन्यमय होतो
श्रावणात असे संस्कृतीचा पवित्र ठेवा
ऐकू येतो कानी मुरलीधराचा पावा
नारळी पौर्णिमेला बहिणीला भाऊ भेटावा
सण नात्यांचा अनोखा साजरा व्हावा
श्रावण असतो साऱ्यांच्या मनात
होते इथे प्रेम व मांगल्याची बरसात
श्रावणात होते नव्या नात्यांची सुरुवात
त्या ईश तत्त्वाचे स्मरण असे हृदयात
—–वैशाली देव
