#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#कथालेखन
#मनभावनश्रावण
#दहीहंडी
💚 दहीहंडी 💚
“श्रावणात घननीळा बरसला ..” , गाणे रेडीओवर सुरू होते. श्रावणाच्या संध्यासमयी या आल्हाददायक गाण्याने स्वातीचे मन प्रफुल्लित झाले होते. ऑफिस मधून ती नुकतीच घरी आलेली. शैलेश ला यायला वेळ होता, त्यामुळे रेडिओवरील गाणी ऐकत ती गॅलरीत बसली होती.
श्रावण, महिन्यांचा राजा, हिरवळीने बहरलेले वातावरण, पावसाची रिमझिम, मधे मधे इंद्रधनुची कमान, ऊन पावसाचा खेळ, नवनवीन उगवलेली रोपटी, फळाफुलांची बरसात. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच आवडता महिना – श्रावण.
व्रत वैकल्ये, सण उत्सव श्रावणात पुरेपूर असतात. उपासतापास, शिवभक्तीला हा महिना समर्पित असतो. नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, पोळा अशा विविध सणाची रेलचेल असते. प्रत्येक सण एक मौलिक संदेश देतो.
इतर साऱ्यांप्रमाणे स्वाती सुद्धा सारे सण, व्रत वैकल्ये उत्साहात आणि समर्पणाची भावना ठेवून साजरी करायची. तिच्या मैत्रिणी तिला नेहमी म्हणायच्या, “एवढं ऑफिस सांभाळून तू सारे सणवार कसे करतेस? एखाद् दुसरा सण नाही केला तरी काही फरक पडत नाही. आपलं काम काय कमी जोखमेचे आहे! घरच्या इतर जबाबदाऱ्या पण असतातच ना!? त्यात परत हे सगळं!”
यावर तिचं एक उत्तर कायम असायचं, “आपणच नाही केले हे सणसमारंभ, व्रतवैकल्ये तर आपल्या मुलाबाळांना या बद्दल कसं कळणार? आणि मला आवडतं हे सगळं करायला. आपल्या धावपळीच्या आयुष्यात या गोष्टींने शांतता आणि समाधान मिळते.” हे मात्र तिच्या मैत्रिणींना पटायचं.
“आज आनंदी आनंद झाला .. ” गाणे सुरू असतानाच शैलेश येताना दिसला. आणि तिचाही आनंद द्विगुणित झाला. आनंदाचे मुख्य कारण म्हणजे आज जन्माष्टमी होती. शैलेश आल्यानंतर दोघेही मिळून पूजेची तयारी करणार होते. आणि रात्री बरोबर बारा वाजता कृष्णाचा पाळणा करून कृष्ण जन्मोत्सव साजरा होणार होता. श्रीकृष्ण तिचे आवडीचे दैवत. आपल्या बाळातही ती श्रीकृष्णाचे रूपडे शोधत असायची. लहानपणापासूनच तिने आपल्या आदित्य ला कृष्णाच्या बाललीळा सांगितल्या होत्या. त्यामुळे त्यालाही जन्माष्टमी आणि गोपाळकाला, विशेषतः दहीहंडी फार आवडायची.
लगेच तिने दार उघडलं. शैलेश आत येतंच म्हणाला, “आई, बाबा गेलेत का गं बाळकृष्णाची मूर्ती आणायला?”
“हो, येतीलच एवढ्यात. ”
“आणि आदित्य..! घरी आहे की गेलाय दहीहंडीच्या सरावाला .. ?” हसतच त्याने विचारले.
“तो कुठे एवढ्यात येतोय… उद्याच दहीहंडी .., त्यामुळे येईल सावकाश. तुम्ही या आत. हात, पाय धुवून घ्या. मी चहा टाकते दोघांसाठीही. मी थांबलेय तुमच्यासाठी. मग आपण पूजेची तयारी करूया. मावशी पण येतील एवढ्यात. त्यांना सणाचा स्वयंपाक सांगते. प्रसाद मात्र मी स्वतःच बनवणार.”
आता तिचे सासू सासरे पण आलेले. काही वेळातच आदित्य पण आला.
“झाला का दहीहंडीचा सराव ..”, तो येताच सगळ्यांनी एकदम विचारलं.
“हो तर .. छान झालाय सराव, उद्या बघालंच तुम्ही. येणार ना तुम्ही सगळे?”
“हे काय विचारणं झालं! नक्की नक्की येणार. आणि यावेळी म्हणे तू फोडणार दहीहंडी!” आदित्य च्या पप्पांनी उत्साहात विचारलं.
“हो, पण फक्त मीच नाही, सगळ्यांना संधी मिळणार! कारण या वेळी आम्ही दहीहंडी चा पॅटर्न बदलला आहे.”
“म्हणजे काय ..?”
“मागच्या वेळेस नाही का, त्या हरी किशन पथकातील सोमेश, वर चढला आणि पाय घसरून पडला. डोक्याला मार बसला ना त्याच्या! आणि आता उंच थरांवर चढून दहीहंडी फोडायला बंदी आहे. त्यामुळे आम्ही नवीन पद्धतीने फोडणार. उद्या बघालंच तुम्ही . !”
“उद्याचं उद्या. चल.. पटकन आवरून घे. आणि पूजेसाठी मदत कर.” स्वाती बोलली.
पूजेचं सगळं यथासांग पार पडलं. बाळकृष्णाची निळीसावळी मूर्ती मन लुभावून टाकत होती. पाळणा फुलांनी सजवला. मूर्ती सोबतच स्वातीने माहेरून आणलेला बाळकृष्णही पाळण्यात घातला. पाळणा गायला. पुजावसर, आरती, प्रसाद सगळं झाल्यावर समाधानाने सारे झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळपासून सगळ्यांची घाईगडबड सुरू होती. आदित्य च्या दहीहंडी साठी स्वाती, शैलेश ने अर्धा दिवस टाकलेला. सगळे छान तयार होवून त्याच्या गोपाल सवंगडी पथकाची दहीहंडी बघायला गेले.
आधी काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. काहींनी गाणे गायले, काहींनी नृत्य केलं. त्यानंतर सामूहिक गरबा नृत्य झाले. आणि आता दहीहंडी साठी सगळ्या सहभागींना एकत्र बोलावण्यात आलं. पंधरा फुटांवर दहीहंडी बांधलेली होती.
आता घोषणा करण्यात आली.
“मी, पीयुष तुम्हा सर्वांचे या आगळ्या वेगळ्या दहीहंडीच्या कार्यक्रमात तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतो आणि कुठल्याही प्रकाराची इजा कुणाला होणार नाही याची काळजीही घेतो. परंतु थरांवर थर रचून, वर चढून दहीहंडी फोडण्यात धोका असतोच. मागच्या वेळी आपण हरी किशन पथकाच्या अपघाताचा अनुभव घेतलाच आहे. त्यामुळे आम्ही या वेळी वेगळ्या पद्धतीने हा सोहळा पार पाडणार आहोत.”
पियुष पुढे नियम सांगू लागला. “सर्वांना सारखी संधी मिळेल. आम्ही चार संघ केलेले आहेत. चारही संघातील एक, एक सभासद इथे येणार. त्याच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात येईल. त्यानंतर त्याला थोड गोल गोल फिरवून त्याच्या हातात लांब बांबू देण्यात येईल. त्याच्या संघातील इतर जण त्याला दहीहंडीच्या अचूक स्थानाची माहिती देतील. त्या नुसार त्याने आपल्या हातातील बांबूने दहीहंडी फोडायची. जो सर्वप्रथम हे करेल तो ठरेल आजचा विजेता. त्याला रोख ५०१ रुपये बक्षिस देण्यात येतील. आणि बाळकृष्णाची एक फोटो फ्रेम सुद्धा. आणि हो, हे करत असतांना संगीत पण सुरू असेल.
चला तर मग आहात ना सगळे तयार.?”
आदित्य, समीर, उमेश आणि राहुल समोर आले. पियुष ने सांगितल्या प्रमाणे दहीहंडी स्पर्धा सुरू झाली. चढाओढीचा सामना होता. कोण जिंकेल काही कळत नव्हतं. अटीतटीच्या या स्पर्धेत आदित्य मात्र हरला. उमेश ने स्पर्धा जिंकली.
आदित्य हिरमुसला होता. उदास झाला. जेवणही करत नव्हता. स्वाती, शैलेश परस्पर ऑफिस ला गेलेले. घरी आल्यानंतर त्यांना आदित्य बद्दल कळलं की तो हरल्यामुळे उदास आहे. जेवलाही नाही.
तेव्हा मग स्वाती ने त्याला समजावलं. “जिंकणं म्हणजेच सर्वकाही नसतं. या वेळी नाही तर पुढच्या वर्षी जिंकशील. तू त्या स्पर्धेत भाग घेतला ते महत्वाचं आहे. आणि तुमची ही आगळी वेगळी दहीहंडी आम्हाला फार आवडली. नाहीतर नुसता घोर लागून राहिला असता.”
“पण आई, दहीहंडी एवढ्या वर का बांधतात?”
“अरे, तुला माहित आहे ना कृष्णाला दही, लोणी फार आवडायचं. आणि तो लहान असताना गोकुळातील गोपिकांच्या घरी आपल्या सावंगड्यांदोबत लपून शिरायचा आणि सगळं दही, लोणी फस्त करायचा. त्याचा हात पुरायला नको म्हणून गोपिका दही, लोणी असे वर टांगून ठेवायच्या. म्हणून ही प्रथा. पण कृष्ण मात्र आता तुम्ही करता तसे थर करून दही, दूध, लोणी फस्त करायचाच.”
“आणि हे बघ, हा श्रावण महिना, किती छान आनंद, उत्साह घेऊन येतो. आणि तू मात्र तोंड फुगवून बसलास. चल, उठ, फ्रेश हो. आणि आधी काही खाऊन घे. शिकवणी ला जायचंय ना.”
आईच बोलणं पटलं आदित्य ला.
“पुढच्या वर्षी मी नक्की जिंकणार ..” म्हणत तो आत गेला. स्वाती ने पण सुस्कारा टाकला.”शहाणं आहे माझं बाळ..” तिच्या मनात येऊन गेलं.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (२५/७/२५)
@ माझ्यातलीमी

