#विकेंड टास्क१९/७/२५
#माझ्यातलीमी कथालेखन #शीर्षक-घटस्फोट
सकाळचे आठ वाजले होते वृषालीने नीरजला आवाज दिला .”चहा प्यायला खाली ये नीरज “नीरज सकाळी उठून वरच्या खोलीत सेमिनारसाठी जायची तयारी करत होता. वृषाली चा आवाज ऐकून लगेच खाली आला .तो चहाचे घोट घेत असता वृषाली जवळ येऊन बसली आणि अचानक निरजला म्हणाली “नीरज मला घटस्फोट हवाय”
“काय ?नीरज दचकलाच .हातातल्या कपाला धक्का बसून चहा वृषालीच्या अंगावर सांडला. नीरज ने “सॉरी डियर” म्हणून लगेच उठून हाताने तिच्या अंगावरचा चहा पुसला.
” ए भलत्या वेळी थट्टा करायची नाही हं .प्लीज आज मला सेमिनार आहे लवकर निघायचं आहे. असं म्हणून तो उठून गेला. वृषालीने त्याची रिए
क्शन पाहायला म्हणूनच तो बॉम्ब टाकला होता. नीरज अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर होता. त्याच्या एका प्रबंधाचं आज कंपनीत वाचन होतं. वाचन झाल्यावर त्याला तिथल्या सहका-यानी अभिनंदन करून त्याच्या सुखद भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नीरज घरी आला तो अगदी रोमँटिक मूडमध्ये होता. येता येता त्यांनी तिच्यासाठी मोगऱ्याचा गजरा सुद्धा घेतला.”ए आज बाहेर जाऊया ,पिक्चर पाहू .आज एन्जॉय करू .वृषालीने कोणतीच प्रतिक्रिया दर्शवली नाही .नीरजनी तीला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.
“आज माझा मूड नाही.” वृषाली म्हणाली “थट्टा नाही. नीरज मी अगदी मी निसंकोच आणि स्पष्टपणे सांगते आहे “मला घटस्फोट हवा आहे”
” अगं का ?माझं काही चुकलं कां? ए मी कधी चुकून रागाने बोललो असेल तर माफ कर मला. पण काहीच काही बोलू नकोस ग. तुझ्याशिवाय मी कसा जगेन?”
” काहीतरी नाही ,थट्टा नाही मी अगदी स्पष्ट सांगते आहे मला तुझ्याजवळ राहायचं नाही. मला घटस्फोट हवा आहे. ताबडतोब. नीरज आश्चर्याने पाहू लागला तिच्याकडे. त्याला पुढे बोलणं सुचेना. लग्नानंतर 24 वर्ष बरोबर संसार झाला होता. त्यांनी तिच्यासाठी काय नाही केल? तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. स्वतःच्या इच्छा बाजूला सारून तिच्या इच्छांना दिली दाद आणि “माझं सर्व तुझंच आहे” म्हणून तोच झाला बरबाद. . दोघेही अगदी प्रतिष्ठित कुटुंबातले. सासरचे माहेरचे सर्व आनंदात होते. दोघांचा संसार व्यवस्थित चालला आहे या समजूतीत होते. सर्व सासरच्याना खूप कौतुक होतं तिचं.पण तिचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे हे मात्र कोणाला समजलं नाही .
घटस्फोटाच्या अनेक कथा रोज घडत आहेत. दर चार घरानंतर ह्या न त्या कारणांमुळे नवरा बायकोचे पटत नाही ,घर तुटलं की संसार मोडलेले दिसतात, शेवटी परिणती घटस्फोटात होते. घटस्फोटाची अनेक कारणे असू शकतात. पुरुषांचा अहंकार, स्त्रीचा इगो सासरची वागणूक, आर्थिक असमानता ,दारूचे व्यसन. पण नीरज आणि वृषालीच्या घटस्फोटात ही कोणतीच कारणे नव्हती. तरी घटस्फोट का झाला?
नीरजनी जेव्हा खोदून खोदून “माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर”म्हणून तिला या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला शेवटी तीनं सांगितलं ” माझा एक लहानपणापासूनचा मित्र. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण ते सफल होऊ शकलं नाही. शेवटी आम्ही दोघांनी निर्णय घेतला की जे समोर आलाय ते स्वीकारायचं. पुढे पाहू. आम्ही दोघांनी आपापले संसार केले. मुलांना मार्गी लावलं. त्यानेही त्याच्या बायकोला घटस्फोट दिला आहे. आता आम्ही दोघं लहानपणचे प्रेम पूर्ण करणार आहोत. दोघ बरोबर राहणार आहोत.”
हे सगळं ऐकून नीरज सुन्न झाला. संतापला “अगं एवढं प्रेम होतं तर आधीच घरातून पळून जाऊन लग्न करायचं होतं .नाहीतर आपल्या लग्नाच्या वेळी मला येऊन भेटायचं होतं. मी तुला नकार देऊन मोकळं केलं असतं. पण तुम्ही दोघांनी दोन कुटुंब उध्वस्त केली आहेत हे बरोबर केलं नाही. तुम्हींअपराधी आहात. ह्या वयात हे थेर ?लाज वाटायला हवी होती.” यावर वृषाली काही बोलली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी निरजणी घरात सगळीकडे पाहिलं वृषाली दिसली नाही ती घर सोडून निघून गेली होती.
माणसाचा स्वार्थ जेंव्हा डोक्यात भिंनतो तेंव्हा त्याला आई-वडील ,संसारनातेवाईक नवरा, एवढेच काय मुलांची सुद्धा पर्वा नसते. नीरजची मुलांनी पण आईला समजावण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. तेव्हा त्यांनीच नीरजला समजावलं ”
बाबा एवढा लाचार होऊ नकोस. तिला राहायचं नाही ना आपल्या घरात? जाऊ दे तिला.”
आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकल असते. नीरजच्या घरच्या लोकांना तर धक्काच बसला हे सर्व ऐकल्यावर. नी रजनी आपलं मन त्या धक्क्यातून बाहेर निघण्यासाठी अध्यात्मात रमवलं. त्याची आई मात्र, अतिशय प्रामाणिक सद्गुणी, निर्व्यसनी मुलाच्या आयुष्यात हे असं का घडलं म्हणून खूप दुःखी झाली. लहान वयात हे सर्व झालं असतं तर तो बालिश पणाचा दोष असतो. पण 24 वर्षाच्या दीर्घ प्रवासानंतर दोन तपाच्या सहवासानंतर एका स्त्रीने असा निर्णय घेणे आपल्या बुद्धीच्या बाहेर असते. खरंतर इतक्या वर्षानंतर सततच्या सहवासाने आपसूकच एकमेकांमध्ये एक प्रेम संबंध एक आपुलकी, जवळचं नातं निर्माण होतं पन्नासाव्या वर्षात 24 वर्षे एकत्र राहून सुख भोगल्यानंतर एका स्त्रीने घटस्फोटाची मागणी करणे हे अनाकलनीय आहे.
यापुढे देवाची काय योजना आहे ते त्यालाच माहीत घटस्फोटाची ही सुरुवात आहेआणि हे असंच चालणार आहे यापुढे असं वाटतं. .
*
लेखिका मनीषा लिमये
