#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (१४/७/२५)
#हतबल
समीर आणि सुमेधा पंचेचाळीशीच्या पुढचे जोडपे. दोघांचे कार्यालय बाजूबाजूच्या इमारतीमध्ये होते. रोज सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यात चालताना समीर कायम सुमेधाचा हात धरून चालायचा. ते पाहून टवाळखोर लोक त्यांना बुढे लैलामजनू म्हणून त्यांची टिंगल करायचे. विभा बऱ्याच वेळा त्यांच्या मागेपुढेच असायची. तिचं कार्यालय सुमेधाच्या इमारतीत होतं. एक दिवस ती त्यांच्या मागेच होती. तिने पाहिलं. समीर सुमेधाला सांगत होता, “सांभाळून राहा. पायाची काळजी घे. मी आल्याशिवाय निघू नकोस.” समीरने हात सोडल्यावर ती हतबलपणे लंगडत आतमध्ये गेली. तेव्हा विभाच्या मनात आलं त्या टवाळखोर लोकांना ओरडून सांगाव, “तुमची बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. त्याची तिच्याप्रती असलेली काळजी बघा.
©️®️सीमा गंगाधरे
शब्द संख्या १००
