माझे गुरू

inbound5361047246771981464.jpg

#माझ्यातलीमी
#गुरुपौर्णिमाटास्क
#माझे_गुरु

💚 माझे गुरु💚

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।।
गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

नमन त्या सर्व गुरुवर्यांस .. ज्यांनी मला घडवले, वाढवले, सक्षम केले. खरं आपण आपल्या आयुष्यात प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो, त्यामुळे शाळा काॅलेज मधे शिकवणारे शिक्षकच गुरु असतात असे नाही. फक्त मानवाकडूनच नाही तर समूळ सृष्टिकडूनच काही ना काही नकळतपणे शिकत असतो, फक्त शिकण्याची, ग्रहण करण्याची ईच्छा असावी. थोडक्यात काय ..? तर ही सारी चराचर सृष्टीच आपली गुरु आहे असे म्हटल्यास हरकत नाही.
माझ्या आयुष्यात गुरुला फार वरचे आणि महत्वाचे स्थान आहे, ते मला परमपूज्य आहेत आणि कायम असतील. अनेक शिक्षक आपल्याला मोलाचे शिक्षण देतात. सगळ्यांची मी ऋणी आहे आणि ते सारे मला आदरणीय आहेत. असे असले तरीही ‘गुरु’ म्हटले की माझ्या जीवनात आलेल्या तीन शिक्षकांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
शालेय जीवनात मिळालेले ‘भूगोल’ या विषयाचे शिक्षक .. माझे सर्वोत्तम प्रथम गुरु! फक्त पुस्तकी शिक्षणच नाही तर सर्वांगीण शिक्षण देणारे!
अत्यंत कडक शिस्तीचे पण अतिशय आत्मियतेने शिकवणारे – केजे सर.. मी त्यांची लाडकी विद्यार्थीनी. माझ्यावर त्यांचा भारी जीव आणि मला ते अत्यंत आदरणीय. सारे विद्यार्थी, विद्यार्थीच नाही तर इतर शिक्षकही त्यांना घाबरुन असायचे. परंतू मला त्यांना घाबरण्याचे कारणच नव्हते कारण मी वर्गात अव्वल असायचे, माझा गृहपाठ पूर्ण असायचा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, शंका विचारणे .. यामुळेच तर मी त्याची लाडकी होते.
मुळात मी संकोची होते, माझ्यात आत्मविश्वास कमी होता. कधी शाब्बासकी देउन, कधी कौतुक करुन तर कधी थट्टा मस्करी करत त्यांनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. माझ्यात लिखाणाची आवड तेंव्हाच निर्माण झालेली ती आवड मी त्यांच्यामुळे जोपासू शकले. माझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण संपल्यानंतरही वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझ्यातील सुप्तगुणांची जाणीव सर्वप्रथम मला त्यांच्यामुळे झाली. म्हणूनच प्रत्येक गुरुपौर्णिमेला त्यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.
माझे दुसरे गुरु .. मला संगणकीय शिक्षण देणारे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी.एड. झाल्यानंतर मी संगणकीय शिक्षण एका खाजगी संस्थेत पूर्ण केलं. अप्लिकेशन आणि कोडिंग दोन्ही प्रकाराचं ज्ञान मला त्यांच्याकडून मिळालं. त्या वेळी संगणक नविनच होता. १९९८ ला मी या संगणक वर्गात सामील झाले, एक एक करत संगणकातील सगळे ज्ञान प्राप्त करत गेले. त्यानंतर त्याच संस्थेत संगणक मार्गदर्शक म्हणून अनेक वर्ष काम केलं. माझेच शिक्षक फिरोज सर यांच्या हाताखाली.
ते अतिशय शांत होते. नवनविन गोष्टी शिकण्याचा त्यांचा छंद होता. त्यांच्यासोबतच मी ही शिकत गेले. प्रत्येक गोष्ट त्यांना स्वच्छ आणि निटनेटकी लागायची. साध्या वर्तमान पत्राची घडी करायची असेल तर त्याच्या कडा एकमेकांशी तंतोतंत जुळायला हवेत .. अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. मला जमेल तेवढं त्यांच्याकडून आत्मसात केलं.
त्याची एक गोष्ट मला फार आवडायची, ती म्हणजे वक्तशीरपणा आणि कितीही अडचणी आल्या तरीही दिलेला शब्द पाळणे. शब्द पाळण्याचा माझ्यावर कधीच प्रसंग आलेला नाही पण वक्तशीरपणा मात्र मी आजतागायत पाळत आहे.
त्यांच्याकडून एक अशी गोष्ट शिकले ज्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंमल केला तर आयुष्य खुप सुखकर होईल, आणि ती गोष्ट म्हणजे, ‘ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याबद्दल त्रागा करु नये, जे आहे ते आहे, ते बदलू शकत नाही, उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याचा स्वभाव, जसा आहे तसा स्विकार करणे, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही’
माझे तिसरे गुरु.. योगा गुरु! ज्यांनी मला ३६० अंशात फिरवून माझं आयुष्यच योग्य दिशेत बदलून टाकलं, विचारांना नवा आयाम दिला, सकारात्मक विचार किंवा सकारात्मकता म्हणजे नेमकं काय आणि ती आपल्या जीवनात कशी अंगीकारावी हे सारं शिकवणारे सौरभ बोथरा सर. फार फार तर सात आठ महिन्यांची ओळख, ओळख म्हणण्यापेक्षा online योगा क्लास. ना कधी प्रत्यक्ष भेट, ना वार्तालाप .. पण तरीही आयुष्याकडे बघण्याचा, जगण्याचा खरा मार्ग त्यांच्यामुळे मिळाला.
‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः’ म्हणत फक्त योगासन म्हणजे योगा नाही, तर ‘योग’ आपल्या जीवनात अंगीकारता यावा, फक्त शारीरिक दृष्ट्याच नाही तर मानसिक दृष्ट्याही आपण प्रबळ व्हायला हवे. त्यासाठी योगाची सहा अंगे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, आणि धारणा आचरणात आणायला हवी. ती कशी, ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि उदाहरणातून ते शिकवतात.
‘लवकर निजे, लवकर उठे, तया सुख, समृद्धी, आरोग्य लाभे’, आपण ऐकत आलोय, पटतंही पण आजच्या जीवनपद्धतीत ते आचरणं कठीनच! परंतू सौरभ सरांनी कुठल्याही प्रकारची बळजबरी न करता ही चांगली सवय लावली. अशा अनेक चांगल्या सवयी त्यांच्यामुळे लागल्या, आणि पुढेही लागतच राहातील. मी स्वतःला खुप भाग्यवान समजते की मला त्यांच्यासारखे शुद्ध मन असणारे गुरु मिळाले. मी खरंच त्यांची शतशः आभारी आहे.
लहान, मोठे सर्वांकडून आपण काही ना काही शिकत असतो. माझ्या जीवनातील अशा सगळ्यांना ज्यांनी मला शिकवले, घडवले त्यांची मी ऋणी आहे. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. पण माझे हे तीन गुरु मला अनमोल आहेत. त्यांचे शतशः धन्यवाद आणि प्रणाम.
गुरुपौर्णिमेनिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!