#माझ्यातली मी…
#गुरुपौर्णिमा विशेष
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
“गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागूं पांय। बलिहारी गुरु आपनो, जिन गोविंद दियो बताय॥”
या संत कबीरांच्या दोह्याचा गहिरा अर्थ माझ्या मनात कायम घर करून राहिला आहे. गुरु आणि देव जेव्हा समोर उभे ठाकतात, तेव्हा आधी कुणाला वंदन करावे? कबीर म्हणतात, मी गुरूंनाच आधी वंदन करीन; कारण त्यांनीच मला देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश दाखवून जीवनाला दिशा देणारे गुरु, हे तर देवापेक्षाही श्रेष्ठच!
गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, मला कोणत्या गुरूंना पहिले वंदन करावे, हा प्रश्न पडतो. बालपणापासून आजपर्यंत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मला अनेक गुरु भेटले. कधी ते ज्ञानदानाचे व्रत घेतलेल्या शिक्षकांच्या रूपात आले, तर कधी मित्रांनी अनपेक्षितपणे जगण्याची नवी दृष्टी दिली. आई-वडील, भाऊ-बहीण हे तर माझ्या आयुष्याचे शिल्पकारच; त्यांच्या संस्कारांनीच मी घडले. पण या सर्वांसोबतच, काही पुस्तकांनी माझ्या जीवनात गुरुपदाचा मान मिळवला आहे.
ती पुस्तके इतकी भावली की, त्यातील केवळ वाक्येच नाहीत, तर त्यांचे समग्र विचार आजही माझ्या स्मरणात आहेत. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर ती पुस्तके मला अदृश्य हातासारखी साथ देतात. जीवनात जेव्हा एखादा प्रसंग येतो, एखादे आव्हान समोर उभे ठाकते, किंवा मनात गोंधळ निर्माण होतो, तेव्हा हीच पुस्तके माझे गुरु होतात. त्यांच्या पानापानात दडलेले ज्ञान, अनुभव आणि जीवनाचे सार मला योग्य मार्ग दाखवते. कधी एखाद्या कवितेतील शब्द, तर कधी एखाद्या महान व्यक्तीचे जीवनचरित्र; कधी एखादा विचार, तर कधी एखादा सिद्धांत – हेच माझे सच्चे मार्गदर्शक बनतात.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन हे ज्ञान, साधेपणा, कठोर परिश्रम आणि निस्वार्थ सेवेचे मूर्तिमंत प्रतीक होते. ‘मिसाइल मॅन’ ते ‘जनतेचे राष्ट्रपती’ असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे विचार आणि कार्य आजही कोट्यवधी तरुणांना प्रेरणा देतात. त्यांच्यावरची पुस्तके वाचताना, त्यांच्या शब्दांमधून मला अनेकदा जीवनाचे धडे मिळाले, नकळतपणे त्यांनी माझ्या मनात गुरूंचे स्थान पटकावले.
तसेच, यशवंतराव चव्हाण यांचे लिखाण म्हणजे सखोल विचार आणि दूरदृष्टीचा संगमच. त्यांच्या प्रत्येक शब्दात महाराष्ट्राच्या मातीचा गंध आणि राष्ट्रनिर्माणाची ध्येयदृष्टी होती. संयम, सामंजस्य आणि सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श त्यांच्या लेखणीतून प्रकटला. तो केवळ इतिहास नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी एक तेजस्वी प्रेरणा आहे.
लहानपणी वाचलेले रामायण आणि शिवचरित्र आजही माझ्या मनावर अधिराज्य गाजवतात. रामायणातील प्रत्येक पात्र – राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान – नाव घेतले की आजही माझ्या डोळ्यासमोर उभे राहते आणि त्यांच्या कथांमधून मला आदर्श जीवनाचे पाठ मिळतात. शिवचरित्रातून धैर्य, पराक्रम आणि नीतिमत्तेची शिकवण मिळते.
या सर्व अनुभवांवरून मला मनापासून वाटते की, पुस्तकेच माझे खरे गुरु आहेत. ती बोलत नसली तरी, त्यांच्या माध्यमातून महान व्यक्तींचे विचार आणि अनुभव माझ्यापर्यंत पोहोचतात. ते मला घडवतात, दिशा देतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देतात. पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून, ती ज्ञानाचे अक्षररूप आहेत, जी आयुष्याला आकार देतात. ~अलका शिंदे
