एक अनुत्तरित प्रश्न
भाग १………
१९७७-७८ सालची गोष्ट. हुबळीजवळच्या कलघटगी या तालुक्याच्या गावची. देवपूजा आटोपून स्वयंपाकासाठी चूल पेटवण्या आधी रोजच्या सवयीप्रमाणे शालिनीताई मंदाकिनीला काही हवं-नको बघायला माजघराला लागून असलेल्या लहानशा खोलीत डोकावल्या. मंदेचा डोळा लागलेला बघून त्या परत फिरल्या. मंदासाठी ऊन-ऊन पेज घेऊन त्या थोड्या वेळाने परत आल्या. तिच्याकडून प्रतिसाद येणार नाही हे माहीत असूनही त्यांनी प्रेमाने मंदेला हाक मारली, मग हलकेच तिच्या खांद्याला स्पर्श केला; आणि ….. तिची कलंडलेली मान बघून, त्यांनी तिच्यासाठी गोळा केलेलं सारं अवसान गळून पडलं….. गेले ३ – ४ महिने कणा-कणाने जवळ येणारं आपल्या पोटच्या पोरीचं मरण त्या रोज उघड्या डोळ्यांनी पहात होत्या. आज अखेरीस काळाने झडप घातलीच. पोटची पोर गेली म्हणून शोक करावा, की जीवघेण्या यातनांमधून तिची सुटका केली म्हणून परमेश्वराचे आभार मानावेत……
तिच्या त्या निष्प्राण देहाकडे पाहता-पाहता शालिनीताई भूतकाळात पोहोचल्या. मंदा त्यांची आणि वामनरावांची सर्वांत धाकटी मुलगी….शेंडेफळ….मोठ्या सुलू, नलू, सुधा, शांता आपापल्या सासरी नांदत होत्या. रघू डॉक्टरकी शिकायला मुंबईला आणि मग तिथून नोकरीसाठी येमेनला गेला होता. वामनराव आता मंदासाठी स्थळ शोधत होते. मंदा तशी दिसायला यथातथाच…त्यात शिक्षणही फारसं नव्हतं… लग्न न करण्याचंही खूळ होतं डोक्यात… पण वामनराव स्थळ शोधतच होते. तसा उशीरच झाला होता तिच्या लग्नाला….
आणि मध्यस्थांकडून मधुकररावांचं स्थळ सांगून आलं. मलकापूरला शेती होती त्यांची. शिक्षण त्यांचंही बेताचंच होतं, पण शेती, गुरं-ढोरं बक्कळ होती. मोठे बंधू मुंबईला नोकरीला होते. परळला एका चाळीत राहत होते. नेहमी सावळ्या रंगामुळे नकार येणारी मंदा, त्यांनी पसंत असल्याचं कळवलं, मग काय? वामनरावांनी लगोलग तारीख ठरवून बारच उडवून दिला.
लेकीची पाठवणी करताना वामनरावांनी कसलीच कसूर ठेवली नाही. दिसायला सुमार असली, तरी रेशमी वस्त्रं आणि दागदागिने परिधान केलेल्या मंदेच्या चेहऱ्यावर आज वेगळंच तेज विलसत होतं. शालिनीताईंनी लेकीची दृष्ट काढली आणि उभयतांनी तिला भरभरून आशीर्वाद देत साश्रू नयनांनी निरोप दिला.
वामनराव अधूनमधून वेळ मिळाला की मुलींना पत्रं लिहून ख्यालीखुशाली विचारत. मुलीही संसाराच्या धबडग्यातून वेळ काढून पत्रोत्तर पाठवीत. आई-वडिलांना त्रास नको म्हणून फक्त खुशालीच कळवण्याचं कसब मुलींकडे होतंच…..
मंदेच्या लग्नाला दोन-एक वर्षं झाली असतील, आणि माहेरपणाला आलेल्या नलूकडून शालिनीताईंना मंदाच्या डोकेदुखीबद्दल समजलं. पण त्यांनी ते त्यावेळी फारसं मनावर घेतलं नाही. साध्या डोकेदुखीचे परिणाम इतके वाईट होतील, असं त्यांना वाटलंच नव्हतं. तेव्हाच तिला इथे आणून वामनरावांनी औषधोपचार केले असते, तर कदाचित आजचं चित्र काही वेगळंच असतं! वामनराव पंचक्रोशीतले विख्यात वैद्य होते. त्यांच्या हाताला चांगला गुण होता. पण दुर्दैव! नियतीने आपले फासे टाकले होते…..
पुढच्या घटना तर फारच पटापट घडत गेल्या. मंदाची डोकेदुखी वाढत चालली, अधूनमधून फीट्सही येऊ लागल्या. मधुकररावांना तर ही तिची नाटकं वाटत होती. त्यावरून आता दोघांचे वादही सुरू झाले होते. एके दिवशी तिच्या शेजारी राहणारी, आणि एव्हाना तिची जिवलग मैत्रीण झालेली मंगल तिला गावातल्या डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यांच्या औषधांचा परिणाम दिसेना, तेव्हा त्यांनीच मधुकररावांना तिला मुंबईला नेऊन काही चाचण्या करून घेण्यास सांगितलं. डॉक्टरांनीच सांगितलं म्हटल्यावर मधुकररावांना तिला मुंबईला नेणं भाग पडलं. मुंबईला जाईपर्यंत नलूच्या यजमानांची आणि नंतर मुंबईत सुधा आणि तिच्या यजमानांचीही खूप मदत झाली. रघू के ई एम् रुग्णालयात शिकायला होता, तेव्हाच्या त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांना भेटून सगळी परिस्थिती सांगितली. त्यांच्यामुळे लवकरच चाचण्या झाल्या. आणि निदान झालं…..ब्रेन ट्यूमर…..शेवटची पायरी……
भाग २……….
डॉक्टरांनी ताबडतोब शस्त्रक्रिया करायला हवी असं सांगितलं. ट्यूमरचा आकार १५ सेंटिमीटरपेक्षाही थोडा मोठा होता आणि त्याचा वाढण्याचा वेगही जास्त होता. शस्त्रक्रिया करणं भाग होतं. त्यानंतरही ‘धोका नाही’ असं छातीठोकपणे डॉक्टर सांगू शकत नव्हते. पण तिला होणारा त्रास बघता सर्वानुमते शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. शस्त्रक्रिया झाली, काही दिवसांनी केमोथेरपीची तारीख ठरवून घरी सोडलं. पुन्हा दवाखान्यात जावंच लागणार म्हणून मधुकररावांना मुक्काम परळलाच करावा लागला. चाळीतल्या त्या दोनच खोल्या….. त्यात ही आजारी…. शस्त्रक्रिया होऊनसुद्धा तिची डोकेदुखी पूर्ण थांबली नव्हती. सततच्या आजारपणाने सहनशक्तीही कमी झाली होती. डोकेदुखी वाढायला लागली की गुरासारखी ओरडायला लागायची. चाळीतले लोकही तक्रार करायला लागले. तिचं सगळंच अंथरुणात….. तिचं करून करून वहिनीही कंटाळली. तिला केमो देऊनही फायदा होईना. पुन्हा ट्यूमरने हात-पाय पसरायला सुरुवात केली. मग मात्र मधुकररावांनी ठाम निर्णय घेतला आणि तिला घेऊन रुग्णवाहिकेने तडक कलघटगी गाठलं.
“ही तुमची मुलगी. आता तुम्हीच सांभाळा.” असं म्हणून तिला सोडून मधुकरराव जाऊ लागले. वामनराव आणि शालिनीताई त्यांच्या या आवेशाने हबकलेच.
“अहो, असं तिला सोडून गेलात, तर गावात आमची काय इभ्रत राहील?” वामनराव खालच्या स्वरात म्हणाले.
“गावात तुमची इभ्रत रहावी म्हणून अशी आजारी मुलगी माझ्या गळ्यात बांधलीत?” मधुकररावांचा जरा चढाच आवाज लागला. वामनरावांना हा आरोप ऐकून फार वाईट वाटलं. ते त्यावर काही बोलणार, तोच मधुकररावच पुढे म्हणाले, “५/६ महिने फार तर …. असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण आता मला शक्य नाही. मलकापूरला तिचं करायला कुणी बाईमाणूस नाही, आणि मुंबईला चाळीच्या दोन खोल्यांत ठेवणं शक्य नाही. तेव्हा आता तुम्हीच बघा.”
आपल्या पोरीची अवस्था बघून आणि मधुकररावांचं बोलणं ऐकून एव्हाना शालिनीताईंच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तरणीताठी पोर, कामाला वाघ… तिची अवस्था बघवत नव्हती. नुसती हाडं दिसत होती. दाट, लांब काळेभोर केस कापून टाकल्यामुळे आणखीच भेसूर दिसत होती. अंगात चोळी आणि कमरेला परकर…. भुंडे हात, भुंडे कान, गळ्यात फक्त एक काळी पोत….. ते बघून, थोडं बळ एकवटून त्या म्हणाल्या, “तिच्या अंगावर सौभाग्याचं लेणं तरी ठेवायचंत्…..”
“तिच्याच आजारपणासाठी खर्ची पडलेत तिचे दागिने. एवढा पैसा मी तरी कुठून आणू? मंगळसूत्राचं म्हणाल, तर तिला आता त्याचं वजन तरी झेपणार आहे का?” मधुकरराव कडाडलेच. “आणि हो, मला पुन्हा पुन्हा इथपर्यंत येणं जमणार नाही, तेव्हा शेवटचा निरोप तेवढा कळवा, म्हणजे मला माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल.”
दोन-अडीच वर्षांपूर्वी जिचं सालंकृत कन्यादान केलं होतं, तिला लंकेची पार्वती करून, नेसत्या वस्त्रानिशी , तिच्या तब्येतीला न झेपणारा प्रवास करून आणून इथे कायमची सोडून निघून गेले जावईबापू! देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने जिच्याशी साता जन्मांची गाठ बांधली, तिला अखेरचा निरोप देताना ना त्यांचे पाय उंबरठ्यात अडखळले, ना त्यांची मान क्षणभरासाठीही वळली, ना त्यांच्या डोळ्यांत तिच्याविषयी कोणतीही भावना प्रकटली…..
मधुकरराव निघून गेले. शालिनीताईंच्या डोळ्यांचा पूर ओसरेना. वामनरावांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ! शेवटी त्यांनी निक्षून सांगितले,”आज डोळ्यांतून पाणी काढलंत, ते शेवटचं….. यापुढे तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत डोळ्यांत पाणी येऊ द्यायचं नाही…. आपण दोघे मिळून सांभाळू तिला.”
भाग ३……….
वामनरावांच्या घराचा परसू आणि त्यांचा पुतण्या रामूअण्णाच्या घराचा परसू एकमेकांना लागूनच होते. वामनरावांच्या घरातला आवाज चुलत सुनेने-जानकीने-ऐकला होता. तेव्हा हाततली कामं संपवून ती बघायला आली, आणि तिच्या कानांवर हे वामनरावांचे शब्द पडले. तीदेखील मंदाचा तो अवतार पाहून चपापलीच.
घरात येणाऱ्या-जाणाऱ्या कोणाचा त्रास मंदाला होऊ नये, म्हणून माजघराला लागून असलेल्या छोट्याशा खोलीत शालिनीताईंनी जानकीच्या मदतीने तिची व्यवस्था केली. किती दिवस तिच्या अंगाला पाणी लागलं नव्हतं, देव जाणे! शालिनीताईंनी चुलीवर पाणी गरम करून आणलं आणि पंचाने स्वच्छ पुसून तिला स्वच्छ कपडे घातले. एवढ्यानेही दमछाक झाली त्यांची. साठीच्या होत्या त्याही. त्यांनाही हे सारं कसं झेपावं? एव्हाना दुपार टळून गेली होती. कुणाच्याही पोटात अन्नाचा कणही नव्हता. मग जानकीनेच चुलीवर भात शिजवायला ठेवला, घरी जाऊन भाजी-भाकरी घेऊन आली. बळेबळेच वामनराव आणि शालिनीताईंना जेवायला लावले, मग शालिनीताईंशी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत गरम गरम पेज मंदाला भरवू लागली, आणि दोघींच्याही लक्षात आलं, की तिला काहीच दिसत नाहीये……
एकंदर परिस्थिती पाहता या वृद्ध दांपत्याला मंदाचं आजारपण फारच जड जाणार हे जानकीनं हेरलं. मग तिनेच पुढाकार घेऊन एका ओळखीच्या गरजू मुलीला बोलावून आणलं, तिच्या मदतीची आपल्याला कशी आणि किती गरज आहे हे शालिनीताईंच्या गळी उतरवलं, आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून तिला कामावर यायला सांगून ती आपल्या घरी निघून गेली.
दुसऱ्या दिवसापासून त्या तिघांच्याही आयुष्यातला खडतर प्रवास सुरू झाला. भल्या पहाटे उठून, आन्हिकं उरकून, देवपूजा आटोपून शालिनीताई मंदाच्या खोलीत डोकावत. मग तिच्यासाठी पेज करून ठेवत, विहिरीचं पाणी उपसून तापायला ठेवत. तोपर्यंत मधू – जानकीनं कामावर ठेवलेली मुलगी – येई. तिच्या मदतीनं मंदाचं तोंड धुवून, तिचं अंग गरम पाण्याने पुसून, कपडे घालत, आणि थोडी पेज पाजत. मग त्यांचा स्वयंपाक होईपर्यंत वामनराव माजघरात रेडिओवर शास्त्रीय संगीत ऐकत बसत. लक्ष गाण्याकडे कमी आणि मंदाकडे जास्त असे. डोक्यात तिला औषधं कोणती, कधी, किती प्रमाणात द्यावीत त्याचे विचार असत. तेही अनुभवी वैद्य होते. अनेक रुग्णांना त्यांच्या औषधांचा फायदा झाला होता. पण दुर्दैवाने त्यांच्या स्वतःच्या मुलीला ते वाचवू शकत नव्हते. फक्त तिचा त्रास कमी करणं एवढंच त्यांच्या हातात होतं.
मंदाला अन्न गिळायलाही त्रास होत असल्यामुळे शालिनीबाईंना तांदळाची पेज, गुरगुट्या भात, मऊ खिचडी, मुगाचं कढण असंच काहीतरी तिच्यासाठी करावं लागे. तिच्या शुश्रुषेत दिवस कसा संपे, कळतही नसे. रात्रीही कधीतरी तिच्या कण्हण्यामुळे त्यांना झोप लागत नसे. कधी झोप लागलीच, तर तिच्या ओरडण्याने दोघेही दचकून जागे होत. तिला तर दिवस – रात्रीतला फरक समजेनासाच झाला होता. फक्त तिची डोकेदुखी एवढीच एक तिची जाणीव….. तिची सेवा करून शालिनीताई दमून जात बिचाऱ्या. मनाविरुद्धच खरं, पण मधूला मदतीला घेतलं ते बरं झालं, असं आताशा त्यांना वाटू लागलं होतं. ती दिवसभर मंदाबरोबर असायची. तिचं आता सारं काही मधू करायची. तिचे कपडे बदलणं, धुणं, सगळंच….. तेव्हा कधीतरी दुपारी शालिनीताईंचा डोळा लागायचा. तेवढीच काय ती त्यांची विश्रांती.
एखादा चित्रपट पहावा तशी शालिनीताईंच्या नजरेसमोरून सारी दृश्यं फिरत होती. एव्हाना मधूनं परसातनं जाऊन जानकीवहिनींना झाली गोष्ट सांगितली होती. रामूअण्णा, त्यांची मुलं, शेजारपाजारची माणसं गोळा व्हायला लागली होती. रामूअण्णानं खात्री करून घेतली. वामनरावांना त्यानं एकदा विचारून घेतलं, “तिच्या नवऱ्याची वाट पहायची का?” त्यांनी नकार देताच तो पुढच्या तयारीला लागला. शालिनीताई अजूनही आपल्याच तंद्रीत होत्या.
“आज्जे, अगं केव्हाच्या हाका मारतोय्……” अरविंदानं – रामूअण्णाच्या धाकट्या मुलानं – शालिनीताईंना गदागदा हलवत म्हटलं, तेव्हा त्या भानावर आल्या. बाजूला सरकल्या.
मंत्राग्नी देऊन वामनराव परत आले, तरी शालिनीताई तशाच सुन्नपणे बसून होत्या. सगळी धावपळ आता संपली होती. त्यांची तरणी पोर त्यांना मागे टाकून पुढच्या प्रवासाला निघून गेली होती……त्यांचे भकास पण कोरडे ठाक डोळे पाहून वामनरावांच्या काळजात चर्र झालं. कितीही मोठं झालं, तरी आपलं बाळ – आपल्या अंशाचा शेवट आपल्या डोळ्यांनी पाहणं – यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? “ईश्वरेच्छा बलीयसी” म्हणून वामनराव कामाला लागले. इतर मुलींना, परदेशी असलेल्या मुलाला, आणि हो, मंदेच्या नवऱ्यालाही – कळवायला हवं….. मंदा इथं आल्यानंतर शांताच काय ती एकदा येऊन गेली. ती तशी जवळही राहते. बाकीच्या काय करतील बिचाऱ्या? लांब राहतात….. सासू, सासरे, मुलं….. साऱ्या घराची भिस्त त्यांच्यावर…..स्वतःला समजावत वामनरावांनी जगरहाटीला सुरुवात केली. दहाव्याचा दिवस साऱ्यांना कळवला.
बातमी कळली, तशा हळूहळू सुलू, नलू, एकेकजणी येऊ लागल्या. आतापर्यंत कोरड्या, निस्तेज डोळ्यांनी यांत्रिकपणे वावरणाऱ्या शालिनीताई त्यांच्यापाशी मोकळ्या होऊ लागल्या आणि त्यांच्या डोळ्यांना लागलेली धार पाहून वामनरावांचा जीव एकदाचा भांड्यात पडला. बातमी कळूनही शेवटी जावईबापू दहाव्यालाही आले नाहीत. दहावं-बारावं पार पडलं. जमलेली मंडळी हळूहळू आपापल्या घरी परतली.
पुन्हा एकदा वामनराव आणि शालिनीताई दोघेच उरले आणि त्यांच्या कानांत साठून राहिलेल्या त्यांच्या असहाय्य मंदाच्या किंकाळ्या…… त्या किंकाळ्या दोघांनाही पोखरून गेल्या होत्या. आणि काही दिवसांनी कानांवर बातमी आली, धाकट्या जावईबापूंनी मंदाचे दिवस पूर्ण होण्याचीही वाट न बघता डोक्याला मुंडावळ्या बांधल्या….. दोघांच्याही हृदयातला आक्रोश फक्त त्या दोघांनीच ऐकला.
कधी नव्हे त्या जुन्या वळणाच्या असूनही शालिनीताई न राहवून वामनरावांना म्हणाल्या, “बोलू नये, पण हेच जर जावईबापूंच्या बाबतीत घडलं असतं, तर आपली मंदा त्यांना अशा अगतिक अवस्थेत सोडून आली असती? आणि जर तिने तसं केलं असतं, तर ते समाजानं मान्य केलं असतं?”
#माझ्यातलीमी
#दीर्घकथा

मस्त