दीर्घकथा.
कथेचे शीर्षक :- अथांग रंग आणि सूर.
भाग एक :- अदृश्य भेटीची सुरुवात.
मुंबईच्या रंगमंचात नेहमीच नवोदित कलाकारांना एक वेगळं व्यासपीठ मिळत असे.”कला संगम “नावाची एक अनोखी स्पर्धा नुकतीच जाहीर झाली होती. ही स्पर्धा इतर स्पर्धांच्या पेक्षा जरा वेगळीच होती. या स्पर्धेत असे दोन स्पर्धक होते, एकाकडे सुंदर चित्र काढून रंग भरण्याची उत्कृष्ट कला होती पण पायाने अधू होता आणि गोड गळ्याची स्पर्धक पण तिला दृष्टीच नव्हती .तरीही त्यांच्याकडे एक अथांग आंतरिक दृष्टी होती.
प्रिया 22 वर्षांची सुंदर तरुणी, जी जन्मापासूनच अंध होती. पण तिच्या आवाजात अशी काही जादू होती की ऐकणाऱ्याला ती स्वर्गात घेऊन जात असे. तिचं गाणं म्हणजे केवळ सूर नव्हते तर ते भाव होते, संवेदना होत्या आणि जगण्याची अनुभूती होती. तिच्या गाण्यामधून ती विविध भावभावना उलगडत गेली. तिच्या आई-वडिलांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले ते म्हणत,” प्रिया तुझा आवाज हेच तुझे डोळे, तुझ्या गाण्यातून तू इतरांना जग दाखवशील!. तिने शास्त्रीय संगीताचं शिक्षणही घेतलं होतं आणि आता ती” कला संगम” स्पर्धेत भाग घेण्यासाठी आली होती.
दुसरीकडे रोहन हा 23 वर्षाचा देखणा तरुण. त्याला एका अपघातात आपले पाय गमवावे लागले होते. तो व्हीलचेअर वरच होता. एक उत्कृष्ट चित्रकार, एकदा का त्याने ब्रश हातात घेतला की त्याच्या चित्रांमधून रंग बोलू लागायचे. तो अमूर्त चित्रकला करायचा. त्याच्या चित्रात भावभावनांचा कल्लोळ स्पष्ट दिसत असे. त्याचे रंग म्हणजे फक्त रंगच नव्हते तर त्यात त्याची स्वप्ने लपलेली होती, त्याचा संघर्ष होता. विशेष म्हणजे आयुष्याबद्दलची सकारात्मकता होती. अपंगत्व आल्यावर काही काळ त्याला निराश्याने जरूर ग्रासले होते. पण त्याच्या चित्रकलेने त्याला पुन्हा उभारी दिली होती. तो नेहमी म्हणायचा,” पाय जरी गेले असले तरीही माझ्या हातात अजूनही शक्ती आहे, रंग भरण्याची आणि जग जिंकण्याची’. स्वतःला सतत समजावत राहायचा. त्यातच त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी चालून आली ती म्हणजे,” कला संगम” स्पर्धेमुळे!.
स्पर्धेचा पहिला टप्पा सुरू झाला. प्रियाने आपल्या गोड आवाजात एक सुरेख भक्ती गीत सादर केले.
” कानडा राजा पंढरीचा……”
तिचा आवाज हॉलमध्ये दुमदुमला, डोळ्यासमोर पंढरीचा राजा उभा ठाकला. तिचं गाणं प्रत्येक श्रोत्यांच्या मनात घर करून गेलं. तिचा शांत, प्रसन्न चेहरा, आवाजातली करुणा पाहून परीक्षकांचे डोळे पाणावले.
” वाह ! काय आवाज आहे. डोळे नसतानाही इतकं अद्भुत गाणं …..अविश्वासनीय!”परीक्षकांपैकी एक जण बोलले.
रोहनने एका मोठ्या कॅनवास वर अवघ्या काही मिनिटातच एका वादळाचं सुंदर चित्र साकारलं. त्याचे ब्रश स्ट्रोक इतके वेगवान आणि आत्मविश्वास पूर्ण होते की ते पाहून सर्वच थक्क झाले. त्याच्या चित्रात वादळाची भीषणता असली तरी एक प्रकारची शांतता ही दडलेली होती.
स्पर्धेच्या हॉलमध्ये अनेकदा त्यांचे मार्ग एकमेकांना स्पर्शून जात .पण त्याची एकमेकांना कल्पनाच नव्हती. स्पर्धेची लगबग, लोकांचे आवाज आणि सादरीकरणाची तयारी यामुळे ते कधीच समोरासमोर आले नाहीत. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं.
अंतिम फेरी जवळ आली. प्रिया आणि रोहनने आपल्या कलेने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते. प्रियाच्या आवाजाची जादू ,रोहनच्या चित्रांची खोली लोकांच्या मनात घर करून बसली होती. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची नावे जाहीर झाली. प्रिया आणि रोहन दोघांचीही नावे त्यात होती. आता फक्त निकालाची प्रतीक्षा होती आणि बक्षीस वितरण सोहळ्याची. जिथे या दोन कलाकारांची खऱ्या अर्थाने पहिली भेट होणार होती. त्या क्षणांची दोघांनाही कल्पना नव्हतीच, त्या एका भेटीन त्यांचं आयुष्यच बदलेल याची.
भाग दोन :- रंग आणि सुरांचा संगम
” कला संगम” स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्याचा दिवस उजाडला. भव्य सभागृह ,प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं. विजेत्यांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. प्रिया तिच्या आईसोबत आणि रोहन त्याच्या बाबांच्या सोबत आला होता. दोघांच्याही मनात धाकधूक होती तरीही चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज झळकत होतं.
कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य पाहुण्यांनी स्पर्धेचे महत्त्व सांगितले आणि कलाकारांच्या प्रयत्नांचं कौतुकही केलं. त्यानंतर विजेत्यांची नावे एक एक करून जाहीर होऊ लागली…..
आता.. तो क्षण आला आहे…..” कला संगम” स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गायिकेचे नाव घोषित करण्याची. सूत्रसंचालकाने घोषणा केली आणि ही विजेती आहे…. “प्रिया साळवी!”
प्रियाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला. तिची आई तिला व्यासपीठाकडे घेऊन गेली. प्रियाने प्रमुख पाहुण्यांना नमस्कार करून नम्रपणे पुरस्कार स्वीकारला. तिच्या डोळ्यातून एकीकडे आनंदाश्रू वाहू लागले तर चेहऱ्यावर समाधानी हास्य!.
त्यानंतर…. आता….” कला संगम” स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चित्रकार. त्याचे नाव आहे…. रोहन देशपांडे!.
रोहनचा चेहरा खुलला. व्हील चेअर वर बसलेल्या रोहनला त्याचे वडील व्यासपीठाकडे घेऊन गेले. रोहनने प्रमुख पाहुण्यांना नमस्कार केला आणि पुरस्कार स्वीकारला.
रोहन आणि प्रिया त्यावेळेला एकाच व्यासपीठावर असूनही त्यांच्या थेट संवाद झालाच नव्हता. पुरस्कार स्वीकारल्यावर ते एकमेकांच्या जवळ उभे होते पण त्यांच्यात एक अदृश्य भिंत होती.
कार्यक्रमानंतर विजेत्यांना एकमेकांशी ओळख करून देण्यासाठी एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच ठिकाणी त्यांची पहिली औपचारिक भेट झाली.
” प्रिया, अभिनंदन! तुमचा आवाज खरच मंत्रमुग्ध करणारा आहे”रोहन म्हणाला. रोहन चा आवाज सौम्य आणि आश्वासक होता.
प्रियानेही स्मित हास्य केले,”धन्यवाद रोहन ! आणि तुमचेही खूप खूप अभिनंदन! तुमच्या चित्रांबद्दल ऐकलं आहे, ती खूप बोलकी असतात असं लोक म्हणतात”.
” हो, खरं आहे ते, मी माझ्या भावना रंगातून, चित्रातून मांडण्याचा प्रयत्न करतो “रोहन म्हणाला.
मलाही तुमचं गाणं पुन्हा एकदा ऐकण्याची उत्सुकता आहे. ऐकू शकेन कधीतरी?.
“हो, नक्कीच! आणि मला तुमच्या चित्रांमधून डोकावून पाहायला नक्कीच आवडेल. जरी मी डोळ्यांनी पाहू शकत नसले तरीही,”प्रिया म्हणाली. तिच्या आवाजात एक प्रकारची निरागसता.
त्यांचा थोडावेळ संवाद झाला. त्यांनी एकमेकांच्या कलांबद्दल आणि आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तशी ओढच निर्माण झाली. प्रियाला रोहनच्या आवाजातला कणखरपणा आणि त्याच्या बोलण्यामधला आत्मविश्वासही जाणवला. रोहनला प्रियाच्या बोलण्यातली शालिनीता भावली.
त्यांची दुसरी भेट काही दिवसांनी रोहनच्या आर्ट गॅलरीमध्ये झाली. रोहनने प्रियाला त्याच्या चित्रांबद्दल सांगितले. प्रत्येक चित्रातील संकल्पना, हेच रंग का वापरले त्या मागची भावना समजावून सांगत होता. प्रिया सुद्धा लक्ष देऊन ऐकत होती. त्यावरुन ती चित्राची कल्पना करत होती.
हे चित्र मी वादळावर काढलं आहे, त्यात गडद निळे आणि काळे रंग वापरलेत त्यातून एक आशेचा किरण दिसतोय. जणूकाही वादळानंतरची शांतताच….. रोहन समजावून सांगत होता, प्रिया डोळे मिटून त्या वादळाची कल्पना करू लागली, म्हणाली” , मला जे जाणवतंय, रोहन! तुमच्या चित्रात, रंगात एक प्रकारची ऊर्जा आहे. जणू काही ती माझ्या मनात डोकावून माझ्याच कल्पनांना रंग देत आहे.
तिने दिलेल्या प्रतिसादामुळे रोहन आनंदित झाला. त्याला वाटले,” ही मुलगी माझ्या चित्रांना डोळ्यांनी पहात नसली तरी ती माझ्या भावनांना पाहते”.
त्यानंतर त्याच्या इच्छेसाठी प्रियाने एक गाणं गायलं ते एक शांत आणि मधुर गाणं होतं…..
“फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश”…
त्या क्षणापासून एक वेगळंच नातं त्यांच्यामध्ये निर्माण झालं. त्यांच्यातील शारीरिक मर्यादा त्यांना एकमेकांच्या जवळ येण्यापासून रोखू शकल्या नाही. उलट ते एकमेकांना अजून चांगल्या प्रकारे समजू शकले. त्यांची कला, त्यांचा संघर्ष, त्यांची स्वप्ने त्यांना एका मजबूत बंधनात बांधत गेली.
भाग तीन :- अद्भुत प्रेमाची अभिव्यक्ती.
प्रिया आणि रोहन च्या गाठीभेटी वाढतच गेल्या. ते एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू लागले. त्यांच्या भेटी फक्त त्यांच्या कलेबद्दल बोलण्यापुरत्या मर्यादित राहिल्या नव्हत्या. ते एकमेकांच्या आयुष्यातील सुखदुःख, स्वप्न, भीती एकमेकांशी वाटून घेऊ लागले.
एकदा दोघे सकाळच्या वेळी बागेत बसले होते. पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्यांचा मंद स्पर्श, शेजारी पडलेल्या पारिजातकाच्या फुलांचा सडा आणि त्याचा धुंद करणारा सुगंध. सारं वातावरण प्रसन्न आणि अल्हाददायक……
” रोहन! मला कधी कधी वाटतं, जर मला दृष्टी असती तर जग कसं दिसलं असतं? “प्रियाने हळूच विचारलं.
रोहनने तिच्या हातावर हलकेच हात ठेवला,” प्रिया, तू जगाला तुझ्या आवाजाने पाहतेस आणि विश्वास ठेव तुझी दृष्टी इतरांच्या दृष्टीपेक्षा अधिक सुंदर आहे. कारण तुझी दृष्टी केवळ बाह्यरंग पहात नाही तर ती आत्म्याला स्पर्श करून जाते.
प्रिया हसली,” आणि रोहन, तुझं काय रे?
रोहनने एक दीर्घ श्वास घेतला, आणि म्हणाला,” पाय नसतानाही मी जगाला माझ्या रंगांनी जिंकला आहे प्रिया. तुझं गाणं ऐकताना वाटतं मी जणू आकाशातच विहार करतोय. कदाचित म्हणूनच आपण दोघे एकमेकांना भेटलो. एकमेकांची अपूर्णता पूर्ण करायला.
एके दिवशी रोहनने प्रियासाठी एक विशेष चित्र काढलं.
ते चित्र पूर्णपणे अमूर्त होतं. ज्यात गुलाबी, पिवळा आणि नारंगी रंगाचा वापर केला होता. जे त्याला प्रियाच्या आवाजात जाणवणारे रंग होते. ते चित्र घेऊन तो प्रियाकडे गेला,” प्रिया खास तुझ्यासाठी हे चित्र काढले आहे. तुझ्या आवाजातले रंग भरलेत. प्रियाने हळूच चित्रावरून हात फिरवला, तिला ते रंग जाणवत होते.
वा, खूपच सुंदर! यातून तुझ्या भावना मला जाणवत आहेत. त्याच्याकडे पाहून म्हणाली मला तुझ्यासाठी ही गावसं वाटतय रे!.
प्रियाने एक प्रेमगीत गायला सुरुवात केली….
तिच्या आवाजातील गोडी आणि भावना होत्या त्या ऐकताच त्याचे डोळे भरून आले. त्यांनी हळूच तिला मिठी मारली. त्याच क्षणी त्यांना एकमेकांसाठी असलेली त्यांची भावना स्पष्टच झाली. ती केवळ मैत्री, नव्हती ते प्रेम होतं. एक निस्वार्थ, अथांग प्रेम!…..
“प्रिया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”, रोहन हळूच तिच्या कानात कुजबुजला.
प्रियाने डोळे मिटले आणि त्याच्या मिठीत अजून जवळ सरकली आणि म्हणाली,” माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, रोहन!”. तिच्या आवाजात भावनांची गर्दी…..
त्यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती शब्दांपेक्षा अधिक होती. ती त्यांच्या आत्म्याची अभिव्यक्ती होती. त्यांच्या शारीरिक मर्यादा त्यांच्या प्रेमाच्या मार्गात कधीच आल्या नाहीत. उलट त्यांनी एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत केली. प्रियाच्या डोळ्यांनी रोहनच्या चित्रामधील रंग पाहिले आणि रोहनच्या पायांनी प्रियाच्या गाण्याच्या सुरांवर नृत्य केले.
त्यांच्या या नात्याला आजूबाजूच्या लोकांकडून ही खूप प्रेम आणि आदर मिळाला. त्यांच्या कथा,” कला संगम” मासिकात छापूनही आल्या आणि अनेकांच्यासाठी प्रेरणा बनल्या. त्या दोघांनीही जगाला दाखवून दिलं की प्रेम हे फक्त बाह्य रूपात नाही तर ते आत्म्याच्या आणि भावनांच्या खोलवरच्या संबंधात दडलेलं असतं. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक रंग आणि प्रत्येक सूर एकमेकांसाठीच होता. ते दोघे आता एकत्र होते. एकमेकांच्या अपूर्णतेला पूर्ण करत, एक सुंदर आणि अथांग जीवन जगत होते.
रोहन :- ” प्रिया, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रंग आहेस”….
प्रिया :- आणि रोहन !तू माझ्या आयुष्यातील सापडलेला मधुर सूर…..
सौ.स्मिता अनिल बोंद्रे.
©®
