#माझ्यातलीमी
#दीर्घकथामालिका
#दीर्घकथा
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
झेप
————————————————-
💚 भाग – १ 💚
———–
आज तीच मन खूप बेचैन होतं. पूर्णपणे हतबल झाल्यासारख वाटत होत तिला! आपण घेतलेला निर्णय योग्य कि अयोग्य यावर विचार करत राहण्यापेक्षा येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत पुढे जाणं हा तिचा स्वभाव होता. मन शांत करण्याकरता ती बाबांच्या फोटोजवळ गेली. त्यांना डोळेभरून बघितलं. डोळे मिटून शांत उभी राहीली. कुणालाही कळू नये, विशेषतः पियुष ला वाइट वाटू नये म्हणून तीने आपका हुंदका दाबुन ठेवला आणि मनातल्या मनात बाबांशी बोलू सागली, “बाबा, मी खूप मीस करतेय तुम्हाला. तुम्ही का असे सोडून गेलात. तुमच्या आधाराची मला खुप गरज आहे. तुम्ही मला स्वतःच्या पायावर उभं केलंत, चांगल्या वाईटाची जाण दिलीत, माझ्या प्रत्येक कार्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. मला कशाचीही उणीव भासू दिली नाही. तुमचे प्रेमळ आणि आपुलकीले शब्द मला नेहमीच मार्गदर्शक ठरले. मी आताही तुमच्याच पावलावर पाऊल टाकून चालते. स्वतःचे निर्णय घ्यायला सक्षम आहे. पण तरीही आता माझ्या निर्णयात तुमचा सहभाग नाही, प्रोत्साहन नाही, त्यामुळे मन डळमळीत होतं. तुमचे मायेचे शब्द ‘तू पुढे चल, मी तुझ्या पाठीशी आहे !’ माझ्यासाठी संजीवनी ठरायचे. पण आता मी या सगळ्याला मुकले आहे. आयुष्यातील तुमची कमी कधिच भरून निघणार नाही. माझ्या आताच्या परिस्थितीत मात्र मी पूर्णपणे एकटी पडली आहे. मला तुमच्या आधाराची, प्रेमाची, सहानुभूतीची आणि सल्ल्याची नितांत गरज आहे. या ना हो बाबा, मला निदान स्वप्नात येऊन काही दृष्टांत तरी द्या ना, ज्यामुळे माझं जगणं सुखकर होईल……….
“आई, ये ना लवकर! बाबांचा फोन आलेला. ते येत आहेत सायंकाळी! ये, ना ग…!” पियुषने हाक मारली आणि ती धावतच बाहेर आली.
“काय झालंय बाळा? का एवढ्या हाका मारतोस?”
“आई, आज ना बाबा येणार आहेत. तू काहीतरी चांगला बेत कर ना. नाहीतर, तू पावभाजीच बनव ना. मला तुझ्या हातची पावभाजी खूप आवडते. बाबांनाही आवडते. बनवशील ना?”
“हो रे बाळा, नक्की बनवते. खूष ना आता!”
पियुष तिचा जीव कि प्राण! एकुलता एक मुलगा. दोन वर्षापूर्वी तिचे बाबा गेले तेंव्हा या 19-20 वर्षाच्या पियुषनेच तिला स्वतः मोठं होवुन किती आधार दिला होता!
पियुष तीचं सर्वस्व ! आणि असणारच ना! आईला तिचं बाळ सर्वस्व असतंच. तसच अस्मितालाही! पण अस्मिताची गोष्ट, आणि अस्मिता-पियुषचं नातं निराळच होतं. प्रत्येक माय-लेकाची एक गोष्ट असते .. सर्वाहुन वेगळी.. आज आस्मिता जे काही करतेय ते सगळं पियुषसाठी. जगणं, लढणं, निर्णय घेणे, तारेवरची कसरत करणं, जमेल तेवढा वेळ कामात गर्क असणं, हसणं, रडणं, देवधर्म करणं, स्वतःच्या स्वपांना तिलांजली देणं, सारं-सारं पियुषसाठी.
“चल पियुष, लवकर तयार हो. आपल्याला जायचंय ना दुकानात!” असं म्हणत तीही तयार व्हायला आत निघून गेली.
दुकानात वेळेवर पोहोचणं हा तिचा नित्यनियम होता. दुकानासोबतच ती केजी ते सातवी पर्यंतची शिकवणी घ्यायची. मुलांना शिकवणं, पुस्तकी शिक्षणच नाही तर त्यांच्यावर चांगले आणि योग्य संस्कार करणं, व्यवहारज्ञान देणं तीचा छंदच होता म्हणा ना! म्हणूनच अगदि सुरुवातीपासूनच तिच्याकडे मुलं शिकवणीला येऊ लागले. दुकान चालवणे, व्यापार करणे, शिकवणी घेणे हे तिच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. किमान सध्यातरी आहे ..
_______________________________
💚 भाग – २ 💚
———-
पण तीन वर्षांपूर्वी तीची परिस्थिती अशी नव्हती. ती खूप सुखी जीवन जगत होती. मेकेनिकल इंजिनियरिंग आणि एम. बी. ए. अशी उच्च विभूशीत होती. लहाणपणापासूनच ती अभ्यासात खूप हुशार होती. वडीलांची लाडकी अस्मिता. तीची स्वतःची अस्मीताही अशीच उच्चविभूशीत होती. पहिल्या श्रेणीत पास झाल्यानंतर लगेचच तिला एका फार्मास्यूटिकल कंपनीत मोठ्या पगाराची नौकरी लागली. आनंद गगनात मावेना. त्यानंतर तीचं लग्न झालं. सासरही खुप छान मिळालं. नवरा खूप प्रेमळ आणि आधार देणारा होता. आणि त्यामुळेच ती घर, नौकरी, संसार ही तारेवरची कसरत पार पाडत होती. लग्नानंतरची दोन-तीन वर्ष आनंदात गेली. आणि तीच्या संसाराच्या वेलीवर गोड कमळ फुललं. आनंद द्विगुणित झाला. पियुषच्या येण्याने जगण्याला नवा अर्थ मिळाला. गोरपान, गुबगुबित, हसरं बाळ, पण ते मुदतपूर्व जन्माला आलेलं. त्याच्या मेंदूची वाढ पूर्ण न झाल्याने ते खूप नाजूक आणि अस्वस्थ होतं. पियुष दोन वर्षाचा होईपर्यंत त्याच्या तीन शस्त्रक्रिया झाल्या. अशा बाळाला जन्म दिल्याने परंपरेप्रमाणे समाजाने सगळा दोष तीलाच दिला. पण ती डगमगली नाही. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागली. मुलाला वाढविण्यात आपलं सगळ तन, मन, धन खर्ची घातलं. पियुष तीन वर्षाचा झाला त्यावेळी त्याच नाव शाळेत घालतांना बऱ्याच कठीन प्रसंगांना सामोरं जावं लागलं. पियुष केजी ला असतांना त्याच्या प्रिंसिपल ने सरळ सांगितलं की तो या शाळेत शिकू शकणार नाही. पण तीने आपले प्रयत्न सोडले नाही. पियुषला मुंबईच्या लोकप्रिय इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवून दिला. प्रवेश परिक्षेची त्याची तयारी तिने स्वतः करुन घेतली. घर, नौकरी सांभाळत तीने ही तारेवरची कसरत पार पाडली. पियुष दहावी होईपर्यंत तीने दिवस रात्र एक करुन त्याचा अभ्यास घेतला. नव्हे, ती त्याची शाळाच झाली. त्याच्या अपरिपक्वतेमुळे अनेकदा त्याच्या वर्गातील मुलं चिडवायची, टिंगल करायची, त्यामुळे तो बरेचदा शाळेत जायला घाबरायचा. त्याच्या मनात न्युनगंड तयार होवू नये म्हणून अस्मिता सतत जागरुक असायची. त्याला प्रोत्साहन द्यायची, कौतुक करायची, पुरेपूर स्तुती करायची आणि त्याचं काही चुकत असेल तर त्याच्या कलाने घेऊन समजावूनही सांगायची. तीने त्याच्यात सकारात्मकता आणि लढण्याची जीद्द निर्माण केली.
पियुष जात्याच हुशार होता. घरुन इतके छान संस्कार, आईवडीलांचे मार्गदर्शन, प्रेम, योग्य ते सहकार्य मिळाल्याने पियुष दहावित मेरीट मधे आला. अस्मिताची एक परिक्षा संपली.
आता पियुषला पुढील शिक्षणासाठी तयार करायचं होतं. महाविद्यालयीन शिक्षणातही पियुष अव्वल राहीला. इतर मुलांप्रमाणे त्याला डॉक्टर, इंजिनीयरींग करण्यात रस नव्हता. त्याने पत्रकारितेमध्ये मास्टर्स केलं आणि त्यानंतर एम. बी. ए. ही सर्वात मोठी पदवी देखिल मिळवली. स्वतःमधिल व्यंगावर मात करून त्याने स्वतःला सिध्द केलं, पण शिक्षण आणि व्यवहारी जग वेगळं असतं. शिक्षणाचं महत्व असतंच पण व्यवहार ज्ञान असणं ही आवश्यक असतं. त्यामुळे या समाजात वावरतांना पियुषला काहिही त्रास होऊ नये, त्याचं सगळं व्यवस्थित मार्गी लागावं यासाठी अस्मिता सतत त्रस्त असायची.
बढती मिळत मिळत अस्मिता आता त्या कंपनीत मॅनेजर म्हणून रुजू झाली होती. त्यामुळे तीच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. कंपनीच्या उत्पन्नांच्या जाहिरीतींसाठी, खप वाढण्यासाठी तीला वेगवेगळ्या शहरात, राज्याबाहेर तर कधी देशाबाहेरही जावे लागायचे. मुंबईबाहेर, घराबाहेर असतांना तीला अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या. अनेक सण-समारंभ, नाती-गोती दूर साराव्या लागल्या. वटपौर्णिमा असो वा दिवाळी-दसरा, आधी आपलं काम ! बरेचदा तर तीने विडीओ कॉल करुन आपली वटपौर्णिमा साजरी केली. अस्मिता परदेशी असो वा परगावी तीने कधी आपली संस्कृती, व्रत-वैकल्ये सोडली नाही. हे सगळं करताना ती आपल्या कामात पूर्णपणे बुडून गेली होती.
_______________________________
💚 भाग – ३ 💚
————
अशातच पियुषचं शिक्षण संपलं आणि एके दिवशी तो आईला म्हणाला, “आई, आता मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. तू करशील ना मला मदत?”
मुलाची इच्छा! त्यातच तीला असंही वाटायचं की पियुषला नौकरीत खुप खस्ता खाव्या लागतील, तो अजूनही निरागस आहे. त्याला मदत करायलाच हवी. पण कशी? माझी तर फिरस्तीची नौकरी! तिने विचार केला नौकरी सोडायची. घरी अभिमानला सांगीतलं. तीच्या निर्णयावर पतीचा नेहमीच पाठींबा असायचा. तो म्हणाला, “तुला जे योग्य वाटतं ते कर. मी सदैव तुझ्या आणि पियुषच्या पाठीशी आहे.”
तिच्या या निर्णयावरही अनेक आक्षेप घेतले गेले. नाही नाही ती बोलणी तिला खावी लागली. पियुषला वाईट वाटू नये म्हणून ती त्याला काही कळू द्यायची नाही. ती स्वतः तर खंबीर राहीलीच आणि पियुषलाही मानसिक दृष्ट्या प्रबळ केलं. आणि आता सगळं ठरलं.
मुंबईला परवडणार नाही म्हणून तीने आपल्या आईच्या घराजवळ नाशिकला दोन खोल्यांची जागा भाड्याने घेतली. नौकरी लगेच सोडणं शक्य नव्हतं कारण कंपनीच्या नियमात ते बसत नव्हतं, पण तिचा इतक्या वर्षांचा अनुभव बघता तीला घरून काम करण्याची परवानगी मिळाली.
नाशिकला आल्यानंतर मात्र तीची खुपच धावपळ सुरु झाली. तीने सुपर मार्केट प्रमाणे स्टेशनरी चं दुकान लावलेलं. त्या सोबतच लेडीज पर्सेसे आणि कपडे, लहान मुलांचे कपडे, प्लास्टीकच्या घरघुती उपयोगाच्या वस्तू, बॉटल्स वगैरे वगैरे जेणेकरून चांगला नफा मिळू शकेल. सतत गि-हाईक येणार नाही त्यामूळे फावल्या वेळात काय करायचं असा विचार करून तीने शिकवणी वर्गही सुरु सुरु केले. हया दोन्ही जबाबदाऱ्या अस्मिता आणि पियुष दोघेही मिळून सांभाळायचे. त्यात अस्मिताचं कार्यालयाचं (ऑफिसच) काम होतंच. या तिन्ही जबाबदाऱ्या, घरातील कामं इत्यादी सगळ्या गोष्टी ती समर्थपणे पार पाडत होती. पण टेंशन कमी होत नव्हतं. ती आणि पियुष नाशिकला आलेले असले तरीही अभिमानला मात्र मुंबईलाच राहणं भाग होतं कारण त्याची नौकरी मुंबईला होती. त्यामुळे अस्मिताला सतत त्याची काळजी वाटत राहायची पण आठवड्याच्या शेवटी शनिवार, रविवार तो नाशिकला यायचा. त्याला जमेल तशी तीला सगळी मदत करायचा. ही एकच तिच्याकडे जमेची बाजू होती.
दोन-तीन महिन्यात तिच्या नौकरीचा राजीनामा मान्य झाला. पैशाची आवक कमी झाली. व्यवसायात हवा तसा नफा होत नव्हता. त्यातच दुकानात वस्तूंची कमतरता भासू नये म्हणून ती जास्तित जास्त माल भरून ठेवत होती. त्यामुळे खर्च, मेहनत जास्त आणि मिळकत कमी अशी गत होती. पण या तीन वर्षात तीने आपल्या व्यवसायात खूप प्रगतीही केली. भाड्याने असलेलं दुकान जागेसकट विकत घेतलं. कपड्यांचं वेगळं दुकान लावलं. शिकवणी वर्गातील मुलांची संख्या वाढत होती. सोशल मिडीया वरही online business च पान सूरु केलं. त्यासाठी खूप अभ्यासही केला. पण जीवनातील प्रॉब्लेम्स वाढतच होते. मिळकतीपेक्षा खर्च जास्त होता. गि-हाईक येत नव्हते. तीचं दुकान ज्या भागात होतं त्या भागात खालच्या मध्यम वर्गातील लोकांची वस्ती असल्याने तिला वस्तूंच्या कींमती कमी ठेवाव्या लागायच्या. त्यामुळे नफा फार कमी व्हायचा. त्यातच मधे तिच्या भावाच्या आणि वहीनीच्या आरोग्याच्या तक्रारी आल्या, भावाच्या नौकरीत अडचण आल्याने त्याला दुसरीकडे नौकरी शोधावी लागली त्यातही त्याला फसविण्यात आलं त्याचं एक वेगळं टेन्शन ! भाचीच्या लग्नानंतरचे तिच्या संसारातील हेवेदावे, मतभेत, अडचणी त्या सोडविणे, या ना त्या अशा अनेक गोष्टी होत्या. हे कमी होतं की काय कुणितरी त्यांना पार फसवलं. त्यांचे लाखो पैसे त्यात अडकले. कोर्ट कचेऱ्या सुरु झाल्या. नाशिक-मुंबई फेऱ्या वाढल्या. डोक्यावर कर्ज वाढत होत. घरखर्च देखिल पेलवणं कठीण झालं. यातून मार्ग तर काढणं गरजेचं होतं पण याचा थांगपत्ताही पियुषला लागू दयायचा नव्हता. अन्यथा त्याला असं वाटायचं कि हे सारं त्याच्या व्यवसाय करण्याच्या हट्टामूळे होतय आणि त्याचा त्याला मनस्माप होऊ नये म्हणून ती इतकी हतबल झाली होती. आणि आपल्या सगळ्या व्यथा वेदना आपल्या बाबांजवळ
व्यक्त करत होती. पण आता तिला आधार दयायला तिचे बाबा येणं शक्य नव्हतं. त्यांच्या आठवणीच तिच्यासाठी प्रेरणा होत्या. त्याच प्रेरणेने अणि विश्वासाने, प्रचंड इच्छाशक्तीने आणि प्रचंड सकारात्मकता मनात बाळगून ती उठली, आवरलं आणि आपल्या कामाला लागली. या आत्मविश्वासावर ती आकाशात झेप घ्यायला सज्ज झाली आणि तिच्या सशक्त पंखांवर बसून पियुष सुध्दा !
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
#माझ्यातलीमी
#दीर्घकथा
@ मनिषा चंद्रिकापुरे (५/७/२०२५)

