दिर्घ कथा लेखन टास्क (५/७/२५)
स्वर्गात बांधलेली रेशीमगाठी
…….. भाग पहिला…,.
बेल वाजली तशी सुहास स्वतःशीच म्हणाला, कोण आले येवढ्या रात्री? कुमार परत आला की, काय? त्याने दार उघडले तर दारात एक तरुणी बॅग घेऊन उभी होती. घाबरलेली दिसत होती. मी प्राची, कुमार आहेत का? सुहास म्हणाला, नाही तो दिल्लीला गेलाय. त्याची तिथे बदली झाली. प्लिज आपण आत बसून बोलूया का? तिने विनंती केली तसा तो म्हणाला, हो.. याना आत या. आत आल्यावर प्राची रडायला लागली व म्हणाली, प्लिज आजची रात्र मी इथे थांबू का? सकाळी माझी सातला बस आहे. थोडा विचार करून सुहास म्हणाला, ठिक आहे, थांबा. त्याने तिला पाणी दिले व म्हणाला, खायला काही देवू का? ती म्हणाली, नको.
सुहास म्हणाला, तूम्ही कुमारला कशा ओळखता? ती म्हणाली, काय व कशी सुरवात करू कळत नाही. मी कोकणातली. खेडला आमची खानावळ आहे. मागच्या महिन्यात ७/८ तरूण काही कामा करता आले होते. रोज दोन्ही वेळेला जेवायला यायचे. त्यातल्या एका मुलाला राजेशला मी आवडले. त्याने सरळ आई बाबांना सांगून मला लग्नाची मागणी घातली व म्हणाला, मी अनाथ आहे मला जवळचे कोणी नातेवाईक नाहीत. हे मित्रंच माझे सर्व काही आहे. मी मुंबईत एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. मुंबईत माझा चार खोल्यांचा फ्लॅट आहे. तूमचा होकार असेल तर मी इथेच लग्न करून प्राचीला बरोबर घेऊन जाईन. त्यावर आम्ही तिघांनी विचार केला की, मुलगा दिसायला, वागायला, बोलायला चांगला आहे. माझ्या साठी आईबाबा स्थळं बघतच होते. फक्त मुंबईला लांब जावे लागणार होते. आम्ही तयार झालो. घरातच फक्त महत्वाचे विधी करून लग्न झाले.
बाबांनी आम्ही निघताना मला ₹२५०००/- दिले. म्हणाले असू दे तुझ्याकडे. अडीअडचणींना उपयोग होईल. आम्ही मुंबईत आलो. राजेश रहात होता ती जागा चांगली होती, मोठी होती. त्याचे मित्र पण तिथेच रहात होते. सुरवातीला काही दिवस चांगले गेले. राजेश खूप प्रेमाने व आपुलकीने वागायचा, मला फिरायला, सिनेमाला घेऊन गेला. मला म्हणाला, तूझे बॅंकेत खाते काढू. तू बाबांनी दिलेले पैसे तिथे ठेव. तिथेच लाॅकर मध्ये तूझे दागिने ठेवूया. आम्ही दिवसभर बाहेर असणार. तू घरात एकटीच. मुंबईत तू नवीन आहेस, असे म्हणून त्याने बॅंकेच्या फाॅर्मवर माझी सही घेतली व पैसे व दागिने घेऊन गेला तो परत आलाच नाही.
त्याचे मित्र माझ्याशी लघट करायला लागले. माझ्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करायला लागले. मी विरोध करायला लागले तेव्हा ते म्हणाले, राजेश आता परत येणार नाही. त्याचा हाच धंदा आहे. तो लग्न करून मुलींना आणतो व विकतो. आम्ही तुला विकत घेतले आहे. आम्ही सांगू तसेच तुला करावे लागेल. आणि काय सांगू? या मुंबईत महिन्याभरात मी काय काय भोगले ते. माझ्याकडे पैसे, दागिने काहीच नव्हते,माझा मोबाईल पण त्यांनी काढून घेतला, त्यामुळे मी घरी जाऊ शकत नव्हते व आईबाबांना काही सांगू शकले नाही. मला नाईलाजाने त्यांचे ऐकावे लागले. त्याच वेळी माझी कुमार यांच्याशी ओळख झाली. इतर गिर्हाईकांन पेक्षा हे वेगळे होते. यांच्यात माणूसकी दिसली. आता या लोकांनी मला एका माणसाला विकले आहे. तो मला भारता बाहेर घेऊन जाणार होता म्हणून मी नजर चुकवून पळून आले. एक रात्र कुठे काढु विचार करत होते, कुमार यांना विचारावे म्हणून आले. ते एकदा मला इथे घेऊन आले होते. म्हणून मला हे घर माहीत होते.
सुहास म्हणाला, खूपच वाईट झाले. तूमचे घर या लोकांना माहीत आहे. तूम्ही घरीच जाणार हेही त्यांना माहीत असल्याने ते तिकडे तुम्हाला शोधायला येतील व तमाशा करतील. तूमच्या सर्वांची बदनामी होईल व तूमच्या आईबाबांना पण खूप त्रास होईल. त्यापेक्षा तूम्ही थोडे दिवस इथेच रहा बघू पुढे काय करायचे ते? प्राचीला सुहासचे म्हणणे पटले. सुहासवर विश्वास ठेवून ती तिथेच रहायला तयार झाली. ती सुहासला म्हणाली मी इथे रहाते पण मला घरातली कामं व स्वयंपाक करायची परवानगी द्या. सुहास पण तयार झाला. म्हणाला, सकाळ झालीच आहे, मी चहा करतो व तुम्हाला सगळे दाखवून देतो. ती फ्रेश होऊन आली व सगळे नीट बघून ठेवले. चहा पिऊन झाल्यावर ती म्हणाली, चहा खरंच खूप छान झाला होता. तूमच्याशी बोलल्याने व आता तुमच्या हातचा चहा पिऊन तरतरी आली. तूम्ही नाष्टा, जेवण घरी बनवता की बाहेरून आणता. सुहास म्हणाला, मला चहा काॅफी व मॅगी फक्त करता येते. त्यामुळे सकाळचा नाष्टा व दुपारचे जेवण ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये करतो. रात्री जेवणाचा डबा शांताबाई देतात.
घरात पोहे असतील तर मी आज नाष्टाला कांदे पोहे करीन. सुहास म्हणाला, साॅरी, आम्ही घरी काहीही करत नसल्याने काहीच नाहीये. तूम्ही सामानाची यादी करून द्या मी घेऊन येतो. प्राची म्हणाली, तूम्ही किती वाजता ऑफिसला जाता? सुहास म्हणाला, नऊला निघतो. ऑफिस दहाचे आहे. तिला कागद पेन देऊन म्हणाला,तूम्ही यादी करा तोपर्यंत मी माझे आवरतो. प्राचीने सामानाची व भाज्यांची यादी केली व सुहासला दिली व म्हणाली तूम्ही येईस्तवर मी माझे आवरते. प्राचीला कामाची, साफसफाईची, स्वयंपाक करण्याची सवय व हौस असल्याने सुहास यायच्या आत तिने घरातला पसारा आवरून केर काढला व आंघोळ करून तयार झाली. यादी प्रमाणे सुहास सर्व घेऊन आला. घराचे बदललेले रूप पाहून त्याला त्याच्या आईची आठवण झाली. आई नेहमी म्हणते, बाई घरात असेल तर घराला घरपण असते.
सुहास आल्यावर तिने त्याला पाणी दिले व म्हणाली, चहा करु का?
तो म्हणाला, हो चालेल. तिने दोघांसाठी चहा केला व हाॅलमध्ये घेऊन आली व म्हणाली, आजच्या दिवस तूम्ही कॅन्टीनमध्ये नाष्टा व जेवण करा, उद्या पासून मी करीन. शांताबाईंना आज डबा नको म्हणून सांगा मी करीन, चालेल ना? तो म्हणाला, हो चालेल. पण दुपारी तूम्ही काय करणार व नाष्टाचे काय तूमच्या? पार्सल मागवून देऊ का? ती म्हणाली, नाष्टा नको मला. मी स्वयंपाक करून जेवीन. तो म्हणाला, नक्की ना. नाही तर मागवतो तूमच्या साठी. ती म्हणाली, खरंच नको. तूमची निघायची वेळ पण झाली आहे.
सुहास ऑफिसला गेल्यावर तिने सर्व सामान मिळेल त्या डब्यात बरणीत भरून ठेवले, भाजा फ्रिजमध्ये ठेवल्या. दोघांना पुरेशी भाजी, पोळ्या, आमटी व भात केला व स्वतः जेवली व सर्व भांडी घासून आवरून बाहेर हाॅल मध्ये कोचावरच आडवी झाली. इतके दिवसांचा मनावरचा ताण व विचार करून मेंदूला आलेला क्षीण व इथे सुरक्षित असल्याची खात्री यामुळे तिला लगेच झोप लागली.
……. भाग दुसरा …..,
संध्याकाळी सातला सुहास आला. आल्यावर दार उघडल्यावर उदबत्तीच्या वासाने घरातले वातावरण मंगलमय झाल्या सारखे वाटले. तिने लगेच पाणी आणले व चहा करु का विचारले. तो म्हणाला चालेल अर्धा कप. तिने त्याला चहा करून दिला व म्हणाली, तुम्ही रात्री किती वाजता जेवता? तूमची वेळ झाली की, सांगा मी अन्न गरम करून वाढते. सुहास म्हणाला ठराविक वेळ नाही पण साधारण नऊच्या आसपास जेवतो. तूम्ही नाही चहा घेतलात? नाही मगाशी घेतला मी. दुपारी जेवलात की, नाही? प्राची म्हणाली, हो जेवले व आज खूप दिवसांनी दुपारी शांत झोप पण लागली.
रात्री प्राचीने अन्न गरम केले व सुहासला जेवायला वाढले. तो म्हणाला, तूम्ही पण जेवायला बसा. ती म्हणाली, तूम्ही सुरुवात करा मी नंतर जेवते. आज खूप दिवसांनी चविष्ट व घरगुती जेवल्याचा आनंद सुहासला झाला. तो आनंद व समाधान त्याच्या चेहर्यावर दिसत होता. त्याने मनापासून तिच्या स्वयंपाकाची स्तुती केली व म्हणाला, खरंच तूमच्या हाताला चांगली चव आहे. आज खूप दिवसांनी मनापासून व पोटभर जेवलो. प्राची म्हणाली, भाजी आमटीत तिखट मिठ बरोबर आहे ना? तूम्हाला कसे लागते माहीत नव्हते त्यामुळे मी अंदाजाने केले. तूम्ही सांगा त्याप्रमाणे मी उद्या पासून करीन. सुहास म्हणाला, आजच्या सारखेच करा.
जेवण झाल्यावर दोघेही हाॅलमध्ये आले. सुहास म्हणाला, तूमचे आईबाबा काळजीत असतील, तूम्ही खूप दिवसात फोन केला नाही म्हणून. करायचा असेल तर माझ्या फोनवरून करा. प्राचीच्या डोळ्यात त्यांच्या आठवणीने पाणी आले. म्हणाली, काय सांगू त्यांना? तेच कळत नाही खरं सांगू की खोटे? बाबांना हार्टचा त्रास आहे व आईला डायबेटिस आहे. खरं सांगितले तर दोघांना खूप मोठा धक्का बसेल, त्रास होईल व त्यांना सावरायला तिथे कोणी नाही. आणि खरं तरी किती दिवस त्यांच्या पासून लपवून ठेवू असे म्हणून ती रडायला लागली. सुहास तिला पाणी देत म्हणाला, शांत व्हा. रडू नका. आपण यावर काही तरी मार्ग काढू.
थोड्यावेळाने विचार करून सुहास म्हणाला, तूम्ही तूमच्या आईबाबांना फोन करा व सांगा तूमचे मिस्टर कामासाठी बाहेर गावी गेलेत व तूमचा फोन हरवला म्हणून फोन केला नाही. मी आज आता मैत्रिणीकडे रहायला आले आहे व तिच्या फोनवरून तूम्हाला फोन केला. तूमच्या फोन मुळे त्यांना तूमची खुशाली कळेल व तुम्हाला त्यांची. घरी गेल्यावर त्यांना खरं काय ते सांगावे असे मला वाटते. प्राचीला हि कल्पना पटली. तिने बाबांच्या फोनवर फोन केला व त्यांचा आवाज ऐकून डोळ्यात पाणी यायला लागले. तिथे बाबांची पण तीच अवस्था झाली होती. खूप दिवसात तिचा फोन नाही काही खुशाली कळत नव्हती त्यामुळे तेही खूप काळजीत होते व आज अचानक लेकीचा फोन…… प्राचीने ठरवल्याप्रमाणे बाबांना सांगितले. आईशीपण बोलली. आई तर रडत रडतच बोलत होती व सारखी विचारत होती प्राचू घरी कधी येतेस, तूझी खूप आठवण येते. प्राची म्हणाली की, हे गावाहून आले की, नक्की येते. तूम्ही माझी काळजी करू नका मी इथे मजेत आहे. तूम्ही तूमची काळजी घ्या. औषध वेळेवर घ्या. मी लवकरच येते तुम्हाला भेटायला.
आईबाबांशी बोलल्याने प्राचीला बरे वाटले. ती सुहासला म्हणाली, खरंच तूमचे मनापासून आभार, खूप उपकार आहेत तूमचे माझ्यावर. अनोळखी असून तूम्ही मला आसरा दिलात माझी काळजी घेतलीत. माझ्या अडचणीत देवासारखे धावून आलात. तूम्ही भेटला नसता तर आज माझे काय झाले असते. याची कल्पना पण मी करु शकत नाही. असे बोलताना तिला रडू येत होते. सुहास म्हणाला, त्यात उपकार कसले. अडचणीत असलेल्यांना मदत करायची हिच माणूसकी आहे. ती मी फक्त दाखवली. हेच आईबाबांचे संस्कार आहेत. तूम्ही इथे सुरक्षित आहात थोडे दिवस जाऊ देत. मग तुम्ही घरी जा. मी चिपळूणला राहतो. पुढच्या शनिवारी मी घरी जाणार आहे तेव्हा तुम्हाला घरी सोडायला मी स्वतः येईन.
सकाळी प्राचीने घर झाडून पुसून घेतले. दूध तापवून चहा केला तेवढ्यात सुहास उठून आला व म्हणाला, गुड मॉर्निंग. ती पण म्हणाली, गुड मॉर्निंग. चहा देऊ का? हो. द्या. तूम्ही घेतलात का? ती म्हणाली, नाही. बरोबरच घेऊ म्हणून नाही घेतला. तूम्ही नाष्टा आंघोळी नंतर कि आधी करणार म्हणजे तसे मला करायला. सुहास म्हणाला आंघोळीच्या आधी करीन म्हणजे आवरुन लगेच निघता येइल. ती म्हणाली, ओके. चहा घेऊन झाला की करते. नाष्ट्याला काय करु पोहे चालतील का? तो म्हणाला, हो. चालेल. चहा पिऊन सुहास पेपर वाचत बसला व प्राची कामाला लागली. पोहे करता करता भाजी चिरुन फोडणीला टाकली व कणिक भिजवून ठेवली. त्याला पोहे दिले व विचारले खाल्ल्या नंतर चहा हवा का? तो म्हणाला, हो चालेल. तूम्ही पण खाना. ती म्हणाली, मी नंतर सावकाश खाईन. तिने चहा केला व त्याला दिला. तो पर्यंत भाजी झाली. मग तिने पोळ्या केल्या व लगेच डबा भरुन ठेवला. तेवढ्यात सुहास आवरुन आला व डबा घेऊन ऑफीसला गेला.
मग प्राचीने नाष्टा केला. आंघोळ करून गणपतीच्या फोटो समोर दिवा लावला व उदबत्ती लावली. व पेपर वाचत बसली. दुपारी जेवून जरा वेळ आराम केला. संध्याकाळी मुगाची खिचडी व कढी केली. सुहास घरात आल्याबरोबर वासाने त्याची भूक चाळवली. तो प्राचीला म्हणाला, मी फ्रेश होऊन येतो आपण लगेच जेवू या. जेवताना सुहास म्हणाला, भाजी छान झाली होती. पोळ्यापण मऊ मस्त होत्या. दोघेही जेवले. आज येताना सुहास नवीन मोबाईल घेऊन आला व तो त्याने प्राचीला दिला. नवीन नंबर घरी कळवा म्हणजे त्यांना फोन करता येईल. व तुम्हाला पण करता येईल. प्राचीला काय बोलावे तेच कळेना. मुंबईत आल्यापासून हा पहिलाच नि:स्वार्थी माणूस नव्हे देवमाणूस भेटला होता.
…….. भाग तिसरा …..
असेच दोन चार दिवस गेले. सुहासला प्राची बद्दल आधी फक्त सहानुभूती वाटत होती पण त्याला ती आता आवडायला लागली. तिची साधी राहणी, मनमिळाऊ स्वभाव व सगळ्यात जास्त त्याला तिचा आयुष्याकडे बघायचा सकारात्मक दृष्टीकोन आवडला. तिच्यावर येऊ नये ते प्रसंग आले तरी तिच्या मनात कुणाबद्दलही कटुता नव्हती. जे झाले ते तिने एकटिने सहन केले व त्यातून सुटण्याचा प्रामाणित प्रयत्न केला. सुहासचे आईबाबा पण त्याला लग्न करण्यासाठी मागे लागले होते पण त्याला आज पर्यंत एकही मुलगी आवडली नाही. त्याच्या ऑफीसमध्ये सुंदर, शिकलेल्या हुशार मुली आहेत पण त्यांच्याकडे तो त्या दृष्टीने बघत नव्हता.
पण तो आता सतत प्राचीचाच विचार करत होता. तिचे निरागस हासणे, बोलणे, घरातला वावर त्याला आवडू लागला. त्याच्या मनात आले की, आपण प्राचीशी लग्न केले तर…. खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिच्या बरोबर जे घडले त्यात तिचा काय दोष आहे. आपल्याला अशीच प्रेमळ, संस्कारी, सुखदुःखात साथ देणारी जीवनसाथी हवी आहे. आईबाबांना आधी पटणार नाही पण नंतर तेही मला समजून घेतील याची खात्री आहे. तिच्या आईबाबांना पण आपण समजावून सांगू व या लग्नाला राजी करु. पण आधी या विषयावर प्राचीशी बोलायला पाहिजे. तिचे मतही विचारले पाहिजे. आणि तेही लवकर. ती तिच्या घरी जायच्या आधी.
जेवण झाल्यावर हाॅलमध्ये सुहास येऊन बसला व येताना म्हणाला, तूमचे आवरुन झाले की, हाॅलमध्ये या मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे. प्राची सर्व आवरून आली. सुहास म्हणाला, बसा मला तुमच्याशी थोडे महत्वाचे बोलायचे आहे. हे ऐकून प्राची एकदम गंभीर झाली. म्हणाली, बोलाना. … काय् महत्त्वाचे बोलायचे आहे. सुहासला कशी सुरवात करावी कळेना. तो एका दमात म्हणाला, तूम्ही मला आवडला आहात, माझे तुमच्यावर प्रेम आहे, तूम्ही माझ्याशी लग्न कराल का? आणि तो तिच्याकडे उत्तराच्या आशेने बघत राहिला. तिचा तर हे ऐकून पुतळाच झाला. काय बोलावे तिला कळेच ना. थोड्यावेळाने ती सावरली व म्हणाली, सुहास, मला हा अनपेक्षित धक्का आहे. तूम्हाला माझा बद्दल सर्व माहीत असूनही तूम्ही…. माझ्याशी लग्न करायचे म्हणता?
हो, प्राची मला सगळे माहीत असूनही कारण यात तूमची काय चूक आहे. तूमच्या हिंमतीला सलाम आहे माझा. मी तुमच्यावर दया किंवा उपकार करत नाही. मी खरंच तूमच्या प्रेमात पडलो आहे. मला तूम्ही खूप आवडायला लागलात. मी अगदी खरंच सांगतो, मला तूमच्या सारखीच जीवनसाथी हवी होती. सुहास, पण तूमच्या घरच्यांना चालेल का? ते स्विकारतील का मला? सुहास म्हणाला, तूमचा होकार असेल तर मी त्यांना पण पटवून देईन. त्यांना आधी पटणार नाही पण ते मला समजून घेतील याची खात्री आहे. एवढेच नाही तर ते तुमच्या आईबाबांना पण समजावतील. तूम्ही घरी जायच्या आधी तूमचा निर्णय सांगितला तर बरं होईल. यावर प्राची म्हणाली, मी विचार करून सांगते. चालेल का? तो म्हणाला, हो नक्की.
प्राची रात्रभर विचार करत होती, काय करू? काय निर्णय घेऊ? पहिल्या लग्नाने खूप वाईट अनुभव मिळाले… पण सुहास खूप चांगले आहेत. या तीन चार दिवसांतील अनुभवावरुन ते जे बोलत होते ते मनापासून व प्रामाणिकपणे बोलत होते. आईबाबांना खरं कळल्यावर खूप वाईट वाटेल, दोघेही मनाने खचून जातील त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होणार…. काय करू? हे लग्न तरी ते मान्य करतील का? सुहासचे आईबाबा पण काय म्हणतील? आपला सून म्हणून मनापासून स्विकार करतील का? काय निर्णय घ्यावा याचा विचार करता करता तिला झोप लागली.
सुहासला पण झोप येत नव्हती. प्राची काय निर्णय घेईल. ती लग्नाला तयार होईल का? तिचा आपल्या बद्दल गैरसमज तर होणार नाही ना? बिच्चारी…. किती वाईट घडले तिच्या बरोबर. आपणही घाई करायला नको. तिला निर्णय घ्यायला वेळ लागणारच तो वेळ द्यायला हवा. मी तिच्या निर्णयाची वाट पाहिन. सकाळी नेहमी प्रमाणे सुरवात झाली. दोघेही गप्प होते. काय बोलावे कळत नव्हते. सुहास आवरून ऑफीसला गेला. दोघेही दिवसभर बेचैन होते. नेहमी प्रमाणे कामात दोघांचेही लक्ष नव्हते. प्राचीला पण सुहास आवडायला लागला होता. दिसायला तर तो हँडसम होताच पण प्रेमळ, संवेदनशील व संयमी पण होता. त्याने मनात आणले असते तर तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला असता पण त्याने तसे केले नाही तर पवित्र नात्याने त्याला ती हवी होती.
दिवसभर मनात विचारांचे काहूर माजले होते. हो नाही हो करत तिच्या मनाने शेवटी सुहास बरोबर लग्न करण्याचा कौल दिला. सुहास संध्याकाळी घरी आला, नेहमी प्रमाणे घरात प्रसन्न वातावरण होते. प्राची चहा घेऊन आली व त्याच्याकडे बघून गोड हासली. त्यामुळे त्याच्याही चेहर्यावर गोड हसू आपोआप आलेच. चहा पिऊन झाल्यावर प्राचीने सुहासला विचारले, तूमचा माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय पक्का आहे का? की यावर परत विचार करावासा वाटतो? तसेच घरुन विरोध असेल तर निर्णय बदलेल का? आपण या विषयावर बोलूयात का? म्हणजे दोघांना निर्णय घ्यायला सोपे जाईल. सुहास म्हणाला, माझा निर्णय ठाम आहे. तुम्ही तयार असाल तर मी घरच्यांना राजी करेन. माझे आईबाबा देतील परवानगी आणि नाहीच दिली तरी मी तूमच्याशीच लग्न करीन. हे ऐकून प्राचीला आनंद झाला व त्याच्या निर्णयाची खात्री पटली. प्राची म्हणाली, मी तयार आहे लग्नाला. आपण दोघेही दोन्ही घरच्यांना आपल्या लग्नासाठी तयार करू. मी तुम्हांला खात्री देते की, माझ्याशी लग्न केल्याचा तुम्हाला कधीही पश्चात्ताप होणार नाही. मी कोणत्याही परिस्थितीत तूमची साथ सोडणार नाही.
सुहासला प्राचीचा होकार ऐकून खूप आनंद झाला. ठरल्याप्रमाणे शनिवारी ते निघाले. आधी चिपळूणला गेले. सुहासने त्याच्या आईबाबांशी प्राचीची ओळख करून दिली व तिच्या बद्दल सर्व सांगितले, व मला हिच्याशी लग्न करायचे आहे व त्या साठी तुमची परवानगी हवी आहे असे प्रेमाने व हात जोडून सांगितले. तिची कहाणी ऐकून त्यांना पण वाईट वाटले व यात तिचा काहीच दोष नाही हेही त्यांना पटले व सर्वात महत्त्वाचे आपल्या लेकाला ती आवडली आहे. त्याच्या आनंदातच आपला आनंद आहे म्हणून त्यांनी मनापासून त्यांना लग्नाची परवानगी दिली व म्हणाले, तूम्ही तिच्या घरी जा. त्यांना कमी त्रास होईल अशा प्रकारे झालेला प्रकार सांगा. त्यातून त्यांना सावरायला थोडा वेळ द्या. मग आम्ही स्वतः जाऊन तिला तुझ्यासाठी लग्नाची मागणी घालू व तूमचे लग्न लावून देवू.
प्राची व सुहास खेडला तिच्या घरी गेले. लेकीला बघून दोघांना खूप आनंद झाला. सुहासने मी राजेशचा मित्र आहे अशी ओळख करून दिली. मी चिपळूणला राहतो, मी येणारच होतो म्हणून यांना घेऊन आलो. चहा पाणी झाले व सुहास परत चिपळूणला गेला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. जेवणं झाली. प्राचीने विचार केला आज लगेच नको सांगायला. आजच्या दिवस त्यांना आनंदात राहू दे उद्या परीस्थिती बघून सांगू. दुसऱ्या दिवशी आईबाबा सारखे राजेश बद्दल विचारायला लागले, जावईबापू तूला घ्यायला येणार आहेत का? कधी येणार आहेत? त्यांची गैरसोय होणार नसेल तर रहा थोडे दिवस. मग प्राचीने इथून मुंबईला गेल्या पासून ते इथे परत येई पर्यंत जे झाले ते सर्व सांगितले. आईबाबांना तर काय बोलावे तेच सुचत नव्हते. आपल्या लेकीने किती वाईट प्रसंगात दिवस काढले. व तिने हिंमतीने त्यातून मार्ग काढून सुखरूप घरी आली. त्यांना सुहास बद्दल कौतुक वाटले व आदरही वाढला. असा चांगला काळजी घेणारा, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जावई म्हणून त्यांना तो आवडला. त्यांनी या लग्नाला आनंदाने परवानगी दिली.
दोघांच्या आईबाबांची परवानगी असल्याने लग्न सर्व नातेवाईकांच्या उपस्थित पार पडले. सुहासने चिपळूणला बदली करून घेतली. प्राची सुहासचा संसार आनंदात सुरू झाला.
…….. समाप्त ….. ..

सुंदर कथानक