#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(३०/६/२५)
#तिचीव्यथा
मेघा तिच्या कुटुंबातील मोठी मुलगी. वडिलांचे छत्र ती अकरावीला असतानाच हरवलं होतं. तिने मिळेल ती नोकरी पत्करली. तिला स्वतःबद्दल विचार करायला सवडच नव्हती. सगळी भावंडं आयुष्यात स्थिरस्थावर झाली. जबाबदाऱ्या कमी झाल्यावर तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये आणि इतरत्र वावरताना जास्त नखरे नाही तरी नीटनेटकी राहायला लागली. आता तिला सगळेजण म्हणू लागले, “हिचं आपलं बरं आहे. ना आगा ना पिछा. कधी घरी जायची घाई नाही. कसली चिंता नाही. एकदम मनमौजी.” हे ऐकून मेघाला खूप वाईट वाटायचं. तिने मनात विचार केला की ह्या अशा कुजक्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवलं तरच आपल्याला सुख मिळेल. लोकांचं बोलणं ती हसण्यावारी नेऊ लागली.
©️®️सीमा गंगाधरे

