बुक रिव्ह्यू

1001271647.jpg

पुस्तक परिचय
पुस्तक :- त्या तरुतळी
( मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा आस्वाद )
लेखिका:- डॉ. अश्विनी देहाडराय .
💐💐💐
वनमहर्षीचा अजोड साहित्यप्रपंच !

” मारुती चितमपल्ली !’ नाव उच्चारताच दृष्टीपुढे उभे राहते जंगलात,राना-वनात प्राणी पक्षांच्या सानिध्यात उभे आयुष्य वेचलेला ज्ञानसंपन्न आधुनिक वनऋषी! पशु,प्राणी,पक्षी,कृमी कीटक जंगल,अरण्य,वन त्यातील तरहेतर्हेची झाडे,फुलझाडे,नदी,तळी नक्षत्रसृष्टी या सर्वांच्या सहवासात रमणारा,या अद्भुत निसर्गसृष्टीचा,त्यातील बदलाचा सूक्ष्म अवलोकन,निरीक्षण,संशोधनाद्वारे अभ्यास करून ते सर्वसामान्यांना भावेल अशा पद्धतीने शब्दबद्ध करणारा एक ध्येयवेडा, छंदिष्ट माणूस ! या निसर्ग पुत्राने रानावनात राहून त्यातील फेरबदलाचा केलेला अभ्यास पुस्तक,ग्रंथरूपात प्रकाशित होत गेला तसतसे मराठी साहित्य विश्वाचे दालन निसर्ग,वन्यप्राणीपक्षी यांच्या शास्त्रशुद्ध लिखाणाने समृद्ध होत गेले.
मारुती चितमपल्ली हे पोटापाण्यासाठी वनाधिकारी या हुद्यावर नोकरी करत होते उपजतच हुशार असल्याने तर छंदवेडे व ध्येयवादी होते. म्हणून पोटापाण्यासाठी नोकरीच्या रुळलेल्या वाटेने जाताजाता स्वताच्या ध्येयसिद्धीची तेजस्वी,चाकोरीबाह्य पायवाट निर्माण केली.तीच पायवाट लहानपण गरिबीत गेलेल्या मारुती चितमपल्लीना उत्तर आयुष्यात निसर्ग सृष्टीत त्यांनी केलेल्या भरीव,अजोड कार्यकर्तृत्वाने व त्यास दर्जेदार ग्रंथरूप दिल्याने साहित्य विश्वातील अत्यंत मानाच्या व प्रतिष्ठेच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी घेउन गेली.मायबोली तेलगू असलेल्या चितमपल्लीनी पुढे मराठी, संस्कृत,हिंदी,बंगाली,इंग्रजी व इतर बोलीभाषा आत्मसात केल्या.इतकेच नव्हे तर या वनपुरुषाला विविध प्राणीपक्षांच्या सहवास,सानिध्याने प्राणी जगताच्या भाषाही समजत असे
त्या तरुतळी या पुस्तकाच्या लेखिका डॉ अश्विनी देहाडराय प्रास्ताविकात म्हणतात की “संपूर्ण वनसृष्टीचे मानवी जीवनासाठी महत्व,उपयोगिता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेले किंबहुना तसे जीवनव्रत घेतलेले मारुती चितमपल्ली यांनी अनुभवसिद्ध निसर्गाची “महती जय बहुविध ग्रंथातून गायली आहे त्या साहित्य विश्वाचा आस्वाद घेण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक!” पक्षी जाय दिगंतरा,रानवाटा,सुवर्णगरुड,पाखरमाया,जंगलाचं देणं,पक्षीकोश,चकवाचांदण अशी बहुविध साहित्य निर्मिती मारुती चितमपल्ली यांची आहे.त्यातून केवळ रानावनांची ओळख करून न देता त्या जगताची ओढ लागेल,कुतुहुल वाटेल अशा त्या साहित्याचा आस्वाकाच्या भूमिकेतून लेखिकेने घेतलेला वेध म्हणजे हे पुस्तक.
प्रस्तुत पुस्तकात प्राचार्य विजय देशपांडे यांनीआपल्या प्रस्तावनेत लिहिल्या प्रमाणे लेखिकेने चितमपल्ली यांच्या अनेक पुस्तकाच्या अनुषंगाने मराठी व संस्कृत साहित्यातील चपखल व अनुरूप उदाहरणांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.उदा. निसर्गसृष्टी व मानवी जीवन यांचा परस्पर व पूर्वापार संबंधाचे महत्व विषद करताना लेखिका ज्ञानेश्वर माऊलींचा सुंदर अर्थपुर्ण अभंग सादर करतात तो असा
‘” ऐसें न राहतयाते राहावी ।
भ्रमतयाते बैसवी ।
थापटूंनी चेववी ।
विरक्तीते ।। ”

म्हणजे निसर्ग वैभवाने नटलेले जंगल शहरवासियाला राहावयास आकर्षित करते. विचलित अस्थिर,भरकटणारे मन शांत करते.विरक्ती,वैराग्याला थापटी मारून जागे करते.
मारुती चितमपल्लीचा जीवन प्रवास,वाडमयीन व्यक्तिमत्व या प्रकरणात त्यांचे गुरू,मार्गदर्शक,प्रेरणास्थान असे गो नी दांडेकर,व्यंकटेश माडगूळकर,जी ए कुलकर्णी, नरहर कुरुंदकर, व थोर पक्षीतज्ञ डॉ सलीम अली या सुप्रसिद्ध महान व्यक्तीचा उल्लेख होतो.वृक्षवल्ली आम्हा सोयरी, प्राणिजगत,पक्षीजाय,सर्पसृष्टी व कृमी – कीटक,सहवास निसर्गाचा व समारोप या साऱ्या प्रकरणातून लेखिकेने अभ्यासु,चिंतनात्मक,व बहारदार शैलीतून घेतला आहे. मारुती चितमपल्ली निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या या वनऋषींच्या साहित्याचा आस्वाद हे पुस्तक वाचताना निश्चित मिळतो यातच त्याचे यश सामावलेले आहे.

विजय रघुनाथ भदाणे
686 रविवार पेठ
नाशिक
9552213340

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!