पुस्तकाचे नाव तोत्तोचान (Tottio Chan)
मूळ लेखक Testuko Kuroyangi
मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी

तोत्तोचान, शाळेतील पहिल्या वर्गातील जेमतेम पाच वर्षाची चिमुरडी. मुळातच धडपडी, उत्साही, चंचल, बडबडी, उतावीळ, दयाळू, खोडकर पण तितकीच निरागस! शाळेच्या शिस्तीच्या बडग्यामुळे तिला शाळेतून काढून टाकतात. कारण ती सतत डेस्क उघड बंद करून वर्ग डिस्टर्ब करते. कधी पशुपक्ष्यांसोबत बोलत राहते तर कधी खिडकीत उभी राहून बँड वाल्यांना बँड वाजवायला सांगते. सगळा वर्ग डोक्यावर घेते. सुदैवाने तिची आई एक समजदार आणि सहनशील अशी सुजाण पालक असते अशा ह्या तोत्तोचानला तिची आई नव्या शाळेत घेऊन जाते. त्या शाळेची नवे मुख्याध्यापक पहिल्याच भेटीत तोत्तोचानची अखंड बडबड एक दोन नव्हे तर तब्बल चार तास ऐकून घेतात आणि तिला “आता तू ह्या शाळेची आहेस” असे आश्वासन देतात. तोत्तोचानचा या नव्या शाळेतील प्रवास म्हणजेच तोमई शाळेतील तिच्या आठवणी तिच्या शब्दात अनुभवायला भेटतात”तोत्तोचान’ ह्या माझ्या आवडत्या पुस्तकात.
तोमाई नावाची नावाजलेली आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था आणि तिचे संस्थापक सोसांकु कोबायशी यांच्या बद्दल लिहिलेले “तोत्तोचान” हे पुस्तक आहे. तोमई शाळा सुरु करण्यामागे कोबायशी यांची काही निश्चित उद्दिष्टे होती. मुले स्वभावताच चांगलीच असतात. वयस्कर व्यक्तींच्या प्रभावामुळे आणि आजूबाजूच्या वातावरणाचा दुष्परिणाम, म्हणून मुले बिघडतात. मुलांमध्ये चांगुलपणाची रुजवात करणे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते ही बाब तोत्तोचान पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवत राहते.
तोमई शाळेत तोत्तोचान आणि तिच्या मित्रांनी जे अनुभवलं , ते तिला आणि तिच्या छोट्या मित्रांना खूप आवडायचं. रेल्वेच्या डब्यात भरणारी शाळा, गणवेश व साचेबद्ध अभ्यासक्रमाला फाटा देत राबवलेली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, शारीरिक सुदृढतेला दिलेले महत्त्व, दैनंदिन जीवनात आवश्यक व्यवहारिक कौशल्याची उपक्रमाद्वारे केलेली जडणघडण.,”काहीतरी डोंगरावरचा काहीतरी समुद्रातलं”या पद्धतीने पटवून दिलेले चौरस आहाराचे महत्व …. सर्व काही काही नाविन्यपूर्ण आणि हवाहवासं वाटणारं! मुलांच्या अंगभूत गुणांना वाव देत, त्यांचा विश्वास जिंकत, त्यांना प्रेरणा देत, मुलांमध्ये स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण करून स्वतःवर प्रेम करायला शिकवत मुलांचा सर्वांगीण विकास सहज शक्य होतो ही बाब तोत्तोचान हे पुस्तक वाचतांना स्पष्टपणे अधोरेखित होताना दिसते.
खोडकर धडपड्या तोत्तोचानला मुख्याध्यापक कोबायशी तू एक खरोखर चांगली मुलगी आहे असे म्हणत प्रोत्साहित करत. शारीरिक व्यंग आणि पोलिओ या शब्दाशी छोट्या तोत्तोचानचा याच शाळेत परिचय होतो. पोलिओ असणाऱ्या मित्राला झाडावर चढवण्याची तोत्तोचानची धडपड, त्याच्या सोबतची मैत्री, क्रीडा महोत्सवातील शारीरिक व्यंग असणाऱ्या मुलाचा सहभाग लढाईसाठी निघालेल्या शाळेतील चौकीदारासाठी आयोजिलेला निरोप समारंभ, भुताला पकडणे, संगीत कवायत, जखमी जवानांशी भेट यांसारखे पुस्तकांमधील अनेक प्रसंग विलक्षण आणि वाचनीय आहेत.
तोत्तोचान आणि सर्वच मुलांच्या जीवनाचा मूलाधार कोबायशी यांचे मुलांबाबत असलेले अपार प्रेम होते. म्हणूनच मधल्या सुट्टीत मुले त्यांच्या मांडीवर बसायला धडपडत. मनातल्या गोष्टी सांगून टाकत. इतर लहान मुलांसारखी तोत्तोचान सुद्धा भविष्याबद्दल अनेक स्वप्न पाहते. सुरुवातीला गुप्तहेर, मग तिकीट विक्रेता नंतर नर्तकी होणार असे ठरवत असतानाच एका भावूक क्षणी ती आपल्या मुख्याध्यापकाला त्याच्या मांडीवर बसून तोमई शाळेत शिक्षिका व्हायला आवडेल असे सांगते. कोबायशी यांच्या दृष्टीने तो अत्यंत आनंदाचा क्षण असतो. तोत्तोचानकडून ते तसं वचन घेतात. तोमई शाळा म्हणजे तोत्तोचान आणि मुलांचं घरापासून दूर असलेले एक घरच असते.
जपानच्या तोक्यो शहराजवळ असलेली ही तोमई शाळा १९४५ साली अमेरिकन बॉम्ब हल्ल्यात जळून नष्ट होते. अवघे आठ वर्ष आयुष्य लाभलेल्या या तोमई शाळेने शिक्षणक्षेत्रात असंख्य नाविन्यपूर्ण प्रयोग केले, उपक्रम राबवले नवे नवे मार्ग धुंडाळले. आपल्या स्वप्नातली शाळा अग्नीच्या भक्ष्यस्थानी स्वाहा होताना पाहून पन्नास वर्षे वयाचे कोबायशी त्यांच्या मुलाला म्हणजेच तोमई याला विचारतात,”आपली नवीन शाळा आपण कशी उभारायची रे?”…… आणि पुस्तकांचा शेवट होतो.
तोमईमध्ये शिक्षिका होण्याची तोत्तोचानची इच्छा अपूर्णच राहते. पण त्या आठ वर्षातील समृद्ध आठवणी तिच्या मनात कायम घर करून असतात. कालची ही चिमुरडी तोत्तोचान आज जपान मधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार तेत्सूके कुरोयानागी नावाने ओळखले जाते. तिच्या शाळेबद्दल ती पुस्तक रूपाने व इतर माध्यमातून खूप काही सांगत राहते. युनिसेफची ती सद्भावना दूत आहे.
तोत्तोचान पुस्तक शिक्षक ,पालक आणि मुले या सर्वांना उपयुक्त मार्गदर्शक आणि आवडेल असेच आहे. एका शाळेच्या प्रगती सोबत एका विद्यार्थ्याच्या जडणघडणीचा प्रवास या पुस्तकात अतिशय सुंदर शब्दात चित्रित केला आहे. तेत्सूके कुरियानगी यांच्या मूळ जपानी भाषेतील तोत्तोचान या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. चेतना सरदेशमुख यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद अतिशय ओघवत्या भाषेत केलेला आहे. एका छोट्या मुलीने तिची गोष्ट सांगावी अशी पुस्तकाची शब्दरचना आहे. प्रसिद्ध जपानी चित्रकार चिहिरो इवासाकी यांनी काढलेली चित्रे पुस्तकाला अधिक शोभा आणताना दिसतात. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व चित्रे पुस्तक प्रदर्शनाच्या कितीतरी आधी काढलेली आहेत. जेव्हा तोत्तोचान पुस्तक प्रदर्शित झाले तेव्हा इवासाकी यांनी जगाचा निरोप घेतलेला होता. तोत्तोचानच्या पहिल्या वर्गातील सर्व मुलांचा आजचा परिचय उपसंहार मध्ये दिला आहे. विशेष म्हणजे ही सर्व मुले डॉक्टर इंजिनीयर शास्त्रज्ञ वकील अशा महत्त्वाच्या व नावाजलेल्या क्षेत्रात काम करत आहेत.
लहान मुले कोमल प्रेमळ निरागस असतात. त्यांना प्रेम माया दिली आणि लळा लावला तर ती सहज आपलीशी होतात. लहान मुलांची उपजत शक्ती आणि बुद्धिमत्ता लक्षात घेऊन त्यांना योग्य प्रबलन देऊन मार्गदर्शन केले तर त्यांचा सुयोग्य विकास घडून येऊ शकतो याचा उत्तम धडा देणारे पुस्तक म्हणजे तोत्तोचान.
सौ अश्विनी गहाणकरी

खुप छान परीक्षण.