शालेय वयात योगाचे महत्त्व

सर्वांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

मंडळी आज जागतिक योगा दिन आहे आणि योगाचे महत्व फक्त मोठ्यांसाठीच नसून शालेय जीवनातील मुलांसाठी त्याचं खूप महत्त्व आहे आणि फक्त शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्या मुलांना जर सक्षम करायचं असेल , त्यांची चंचलता कमी करायची असेल तर प्राणायाम किंवा ध्यान ही खूप महत्त्वाची बाब आहे. आजच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या जगात तर शालेय विद्यार्थ्यांसाठी योगा फार गरजेचा आहे शालेय जीवनापासून जर त्यांना योगा शिकवला तर मुलांचे शरीर लवचिक होईल , नियमित योगा करण्याची सवय लागेल मुलांमध्ये जे लठ्ठपणाचे प्रमाण आहे ते कमी होईल त्यांचा आळस कमी होईल तसेच ध्यानामुळे त्यांची एकाग्रता वाढेल याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे भ्रामरी प्राणायाम होय.

तुमची मुलं खूपच चंचल आहेत का?
त्यांचे कशातच लक्ष लागत नाही का?

सध्याच्या धकाधकीच्या आणि धावत्या युगात आपले मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे आपल्या मनात नेहमीच कसला न कसला तरी गोंधळ चालूच असतो , ताण-तणाव असतो.

त्यामुळेच, मनःशांतीसाठी ”ध्यानधारणा’ ही काळाची गरज ठरली आहे आणि ही गरज फक्त मोठ्यां पुरतीच मर्यादित न राहता अगदी लहान मुलांसाठीसुद्धा आवश्यक झाली आहे. ध्यानामुळे मनाला एक वेगळे समाधान मिळते, शांती मिळते.
माझे गुरु केतन सर नेहमी म्हणतात ‘आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देवाशी बोलतो पण आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा देवाचे ऐकतो’ आता तुम्ही म्हणाल देवाचे ऐकतो हे कसे काय? तुम्हाला आठवतं का ते गाणं ‘देह देवाचे मंदिर’आत आत्मा परमेश्वर’.
आपला देह म्हणजे एक मंदिर आहे आणि त्यात जो आत्मा आहे तोच खरा परमेश्वर आहे आणि आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपल्या देवाशी म्हणजेच आपल्या आत्म्याशी एकरूप होतो, ध्यानामुळे मनाला एक वेगळे समाधान मिळते .आपण पूर्वीपासून फक्त ऋषी-मुनी , संत महात्मे यांना ध्यान करताना पाहिले आहे किंवा इतिहासात या गोष्टी वाचल्या आहेत परंतु आत्ताचा वाढता ताणतणाव ,स्पर्धा , चिंता काळजी यामुळे सर्वांनीच ध्यान करणे आवश्यक झाले आहे. अगदी बाल्यावस्थेत सुद्धा मुलांना ध्यान करायला शिकवले पाहिजे लहानपणीच मुलांना ध्यान करायची सवय लावली की त्यांचा मानसिक,भावनिक विकास उत्तम रित्या होतो ,पुढील जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला, अडचणींना तोंड देणे या मुलांना सोपे जाते. आपण आपल्या मुलांना नेहमीच जे चांगले आहे हे जे उत्कृष्ट आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो उदाहरणार्थ उत्तम जेवण, कपडे ,खेळणी ,शाळा इत्यादी परंतु आता अशी वेळ आली आहे की ‘ध्यान’ ही मौल्यवान भेट तुम्ही मुलांना दिली पाहिजे जेणेकरून त्यांचे जीवन आनंदी आणि समाधानी होईल आता तुम्ही म्हणाल की लहान मुलांना ध्यान कसे बरे शिकवायचे चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लहान मुलांना ध्यान शिकवण्याचा ६ टिप्स

१. मुलांना ध्यानाचे बाळकडू द्या

अगदी लहान वयातच मुलांना ध्यान करायला शिकवले पाहिजे त्याची पहिली पायरी म्हणजे जेव्हा मूल तीन ते चार वर्षाचे होईल तेव्हा त्याला सकाळी सकाळी बागेत किंवा मोकळ्या वातावरणात फिरायला घेऊन जावे सुरुवातीला तुम्ही मुलांना फक्त मोकळ्या हवेत फिरू द्यावे, निसर्गाशी त्यांना एकसंध होऊ द्या ,पक्षांचा आवाज ऐकणे ,झाडांशी बोलणे , फुलं, लहान-सहान कीटक यांचे निरीक्षण करणे या गोष्टींचा त्यांना अनुभव घेऊ द्या व निसर्गाशी मैत्री करु करू द्या.

२.ध्यान म्हणजे काय

मुलांची निसर्गाशी मैत्री झाल्यावर निसर्गाबद्दल त्यांच्या मनात ओढ निर्माण होईल त्यामुळे मुलं रोज तुमच्या बरोबर फिरायला यायला तयार होतील आता तुम्ही मुलांना ध्यान म्हणजे काय? ते कसे करावे याची माहिती द्या मुलांच्या वयानुसार त्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांना ध्यानाचे महत्त्व पटवून द्या त्याचे फायदे सांगा व सुरुवातीला एखाद्या खेळाप्रमाणे ध्यान करायची सवय लावा तिथे कोणतेच नियम किंवा बंधनं नसावीत आपण एखादा खेळ खेळतोय असे सांगून त्यांना ध्यानाला बसवायला सुरुवात करा.

३. योग्य जागा व योग्य वेळ निवडा

ध्यान करण्यासाठी योग्य जागेची निवड करा बागेमध्ये किंवा घरात शांत व प्रसन्न ठिकाणी बसून ध्यान करायला सुरुवात करा .मुलांना ध्यानासाठी बसण्याची पद्धत ,श्वसनाची पद्धत समजावून सांगा. ध्यान सकाळी केलेले कधीही उत्तम पण आपल्याला सकाळी शक्य नसेल तर आपल्या सोयीनुसार रोजची एक वेळ ठरवून ध्यान करावे.

४. ‘ओम’ उच्चारणाने सुरुवात करा

मुलं ज्या वेळेस ध्यान करायला बसतील त्या वेळेला बसण्याची पद्धत, डोळे मिटणे, ताठ बसणे या गोष्टी त्यांना शिकवा आणि सुरुवातीला ‘ओम’ उच्चारणाने सुरुवात करा काही दिवस पहिले पाच मिनिटं त्यांना ‘ओम’ उच्चारण करायची सवय लावा. ओम उच्चारण करताना त्यांचे पूर्ण लक्ष ओम यावर केंद्रित करायला सांगा.

४. स्वतः मेडिटेशन करा

तुम्ही स्वतः मेडिटेशन करून दाखवा .कोणततीही गोष्ट, मुलं अनुकरणाने लवकर शिकतात त्यामुळे मुलांना शिकवताना प्रथम आपण अमलात आणली पाहिजे . मुलांना ध्यानावर लक्ष केंद्रित करायला शिकवा,एखादं छान म्युझिक लावा व त्यावर मुलांना लक्ष केंद्रित करायला सांगा जेणेकरून मुलांचे लक्ष विचलित होणार नाही सुरुवातीला कमी वेळ ध्यान करायला लावा आणि हळूहळू मुलांची जसजशी रुची वाढेल तशी तुम्ही ध्यानाची वेळ वाढवू शकता.

५. मुलांना सक्ती करू नका

मुलांना ध्यान करण्याची सक्ती करू नका चंचल मुलांना ध्यान करणे खूप अवघड जाते त्यामुळे त्यांना सक्ती करू नका हसत-खेळत त्यांच्या मनाचा कल बघून त्यांना ध्यानाला बसवा . सुरुवातीला त्यांनी बेसीक गोष्टी जरी केल्या तरी त्यांचे कौतुक करा व त्यांना ध्यान करण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांच्यावर ओरडू किंवा रागवू नका आणि मुख्य म्हणजे ध्यान करणे बंद करू नका नियमित थोडा वेळ ध्यान केल्याने मुलांना त्याची सवय होईल व ते स्वतःहून ध्यान करु लागतील.

६. ध्यान मुलांची एक सवय बनवा

जेव्हा मुलं ध्यान करायला शिकतील तेव्हा काही तासांच्या अंतराने पाच मिनिटं नियमित ध्यान करायची त्यांना सवय लावा ज्या वेळेस मुलं हायपर झाली असतील किंवा जास्त मस्ती करत असतील त्यावेळेस त्यांना डोळे मिटून बसायची सवय लावा आणि डोळे मिटून बसल्यावर त्यांना ठराविक अंक मोजायला सांग जेणेकरून त्यांचे लक्ष पूर्णतः त्या अंक मोजण्यावर केंद्रित होईल आणि हसत-खेळत त्यांचा अभ्यासही होईल . चंचल मुलांना शांत करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे .

मुलांकडून मेडिटेशन करून घेणे सोपे नाही पण अशक्यही नाही मेडिटेशनच्या काही टिप्स वापरुन तुम्ही मुलांकडून मेडिटेशन करून घेऊ शकता. चला तर मग आजच सुरुवात करूया आणि मुलांना मेडिटेशनचे बाळकडू देऊ या.

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करा.

धन्यवाद
कल्पना देवकर
Super Junior Expert.

14 Comments

  1. अतिशय सुंदर लेख 👌👌
    काळाची गरज आहे ही 👍👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!