#आधी वंदू तुज मोरया
अनादी काळापासून गणपतीला कोणत्याही लौकिक, वेदिक कार्यात अग्रपूजेचा मान मिळाला आहे. आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेश वंदनाने होते.
सणवारांनी भरलेला श्रावण महिना संपला की गणरायाच्या आगमनाची सुवार्ता भाद्रपद महिना देतो. गणपतीला चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता मानलं जातं. बाप्पाला निसर्गाच्या शक्तींचे महान रूप मानले जाते. घरात लग्नकार्य असलं की प्रथम आमंत्रण पत्रिका गणपतीलाच दिली जाते. नवीन घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची प्रतिमा असते. आपल्या अभ्यासाच्या वहीवर देखील आपण श्री गणेशाय नमः असं लिहितो.
गणपतीची पूजा प्रथम होण्यासंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा सर्व देवतांमध्ये वाद झाला की कोणत्या देवाची प्रथम पूजा केली जावी. प्रत्येक देवता आपल्याला श्रेष्ठ समजत होती तेव्हा नारदाने त्यांना महादेवाला शरण जायला सांगितले. हे भांडण सोडवण्यासाठी महादेवांनी एक अनोखी स्पर्धा घ्यायचे ठरविले. त्यांनी सर्व देवतांना त्यांच्या वाहनांमध्ये बसून संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला सांगितली. जो कोणी प्रथम येईल त्याला प्रथम पूजेचा मान मिळेल असे सांगितले. या स्पर्धेमध्ये गणपती पण होता. सर्व देवता जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाले तेव्हा गणपती एकदम निवांत होता. त्याने आपल्या आई-वडिलां भोवती म्हणजेच शिवपार्वती भोवती सात फेऱ्या मारल्या आणि त्यांना वंदन केले. या स्पर्धेत गणपतीला विजयी केल्यानंतर सर्वांनी त्याचे कारण विचारले. तेव्हा महादेवांनी सांगितले की सृष्टीमध्ये पालकच उच्च स्थानावर आहेत. असा तीक्ष्ण बुद्धी असलेला गणपती हा बुद्धीची देवता त्याचप्रमाणे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. म्हणूनच कोणत्याही कार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.
आपल्या संत जनांनी सुद्धा गणेश स्तुती, गणेशवंदनाला महत्त्व दिले आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना गणेशाला ‘ ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या’ म्हणून वंदन केले आहे.
कालानुरूप गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत चाललंय परंतु गणरायाचा पहिला मान मात्र तोच आहे. गणपती प्रति जनतेच्या त्याच भावना आहेत.श्री गणेशाच्या पूजनाने साऱ्या बाधा दूर होतात. म्हणूनच त्याला विघ्नहर्ता संबोधलं जातं आणि प्रथम पूजेचा मान मिळतो
गणपती बाप्पा सौभाग्याचा आश्रयदाता आहे म्हणून विवाह कार्यात त्याचे प्रथम पूजन करतात त्यायोगे नवदांपत्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. आपण बोलतानाही बोलतो की आज मी या कार्याचा श्रीगणेशा केला. लहान थोर सर्वांनाच गणपतीचा आशीर्वाद प्रथम घ्यावा असं वाटतं.
©️®️सीमा गंगाधरे
