कड्यावरचा गणपती

गर्द हिरवं रान, समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, आणि त्या निळ्या पाण्याच्या घुसळणीतून बाहेर पडणारा पांढराशुभ्र फेन…..
दूरवर पाण्यात उभा असलेला, इतिहासाची साक्ष देणारा सुवर्णदुर्ग…..आपली सगळी सृजनशक्ती पणाला लावून त्या ब्रह्मदेवानं या जागेची निर्मिती केली. दोन्ही हातांनी या ठिकाणी त्यानं सौंदर्याची उधळण केली. असं हे ठिकाण म्हणजे कोकणातील आंजर्ले गाव.

अशा शांत, नयनरम्य ठिकाणीच असतो ना दैवी शक्तींचा वास! शिलाहार राजांना जाणवला तो, आणि उभी राहिली या समुद्रकिनाऱ्यावर, जोग नदीच्या मुखाशी, दोन देवालयं – एक महादेवाचं आणि दुसरं गजाननाचं – नांवं होती – अजरालयेश्वर आणि सिद्धीविनायक. दगडी जोत्यांवर कोरीव लाकडी खांबांवर शतकानुशतकं उभी होती ती…..मंदिरांतल्या मूर्ती समईच्या सौम्य प्रकाशात उजळून निघत होत्या. पहाटेची काकडारती, घनगंभीर घंटानाद, मंत्रोच्चार, पूजा-अर्चा, या सगळ्यांमुळे या ठिकाणाच्या पावित्र्यात वाढच होत होती. वर्षानुवर्षं अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण करत हा जागृत सिद्धीविनायक या निसर्गरम्य ठिकाणी आनंदाने वास्तव्य करत होता.

काही वर्षांनी समुद्रजलाची पातळी हळूहळू वाढू लागली. आणि मग हे देऊळ पाण्याखाली गेलं. एकेकाळी भक्तांनी गजबजलेलं हे देवालय आपली ओळखच जणू विसरून गेलं. सतत भक्तांच्या गराड्यात राहणाऱ्या श्री गणेशाला हे एकटेपण मानवेना. तेव्हा आपल्या एका भक्ताला गणरायांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपली पुनर्प्रतिष्ठापना करण्यास सांगितलं. तेव्हा जवळच्याच एका टेकडीवर या भक्तानं नवीन देवालयाची निर्मिती केली.

समोरच सुदर्शन तलाव असलेलं, सभागृह, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना असणारं पेशवेकालीन स्थापत्यकलेचा वारसा जपणारं देवालय हळूहळू आकार घेऊ लागलं. कळसावर अष्टविनायकांच्या प्रतिमा कोरल्या गेल्या. सभागृहाच्या घुमटाकृती छताला घुमटांच्या टोकांशी कमलपुष्पं कोरली गेली.काळ्या पाषाणातून घडवलेल्या उजव्या सोंडेच्या सिंहासनाधिष्ठित गणेशमूर्तीशेजारी रिद्धी-सिद्धीही उभ्या राहिल्या.

आणि तो दिवस उगवला – प्राणप्रतिष्ठेचा…..
भक्तानं आपल्या आराध्य दैवताला मनाच्या गाभ्यातून साद घातली, आणि त्याच्या हाकेची वाट पाहणाऱ्या गजाननानं अशी काही धाव घेतली, की त्याचं पहिलं पाऊल पडलं, तेच मुळी टेकडीच्या कड्यावर, आणि दुसऱ्या पावलातच त्यानं देवालय गाठलं.

आज हा “कड्यावरचा गणपती” महाराष्ट्रातलं एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं ‘पहिलं पाऊल’ आजही मोठ्या श्रद्धेनं पूजलं जातं. देवालयात आजही त्या दैवी शक्तीची प्रचीती येते. आजही या कड्यावरून सौंदर्याने नटलेला तो समुद्रकिनारा, त्यात डौलानं उभा असलेला तो सुवर्णदुर्ग दिसतो. आणि क्वचित समुद्राच्या ओहोटीच्या वेळेस, एकेकाळी गजबजलेल्या जागृत देवस्थानाची साक्ष देणाऱ्या जोत्यांचे अवशेष या इहलोकाच्या क्षणभंगुरत्वाची चुणूक देऊन जातात…..

11 Comments

  1. Khup chan varnan keles me jaun aale aahe tya Ganpatila ani parat athvani jagya zalya

  2. खूप सुंदर आणि अप्रतिम वर्णन. डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते

  3. हे माझे आजोळ आणि सासरचे गाव आहे. अनुपमा, तुझे लेखन खूप छान आहे. डोळ्यासमोर पूर्ण गाव आणि मंदिर यांचे चित्र उभे राहते.

  4. हे माझे आजोळ आणि सासरचे गाव आहे. अनुपमा, तुझे लेखन खूप छान आहे. डोळ्यासमोर पूर्ण गाव आणि मंदिर यांचे चित्र उभे राहते. तुला खूप खूप शुभेच्छा

  5. **mitolyn official**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!