#माझ्यातलीमी#लघुकथालेखन (११/८ / २५)
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
कार्मिक मी
जसजसा एक एक आरोप मांडला गेला तसतसा पारा वर चढू लागला. हरेक प्रसंग डायरीतून वाचावा तसं ती सांगत होती. डोळ्यातून ठिणग्या , शब्दांतून लाव्हा अशा लाह्या तडतडत होत्या.
आणि तो.. शांतपणे म्हणणं मांडत होता..
मी हिच्यासाठी काय काय केलं कसं कसं केलं .
——————————————————-
पोलीस कर्माला हात लावून बसला होता..ब्रह्मदेवाने सुद्धा नवरा बायकोच्या भांडणात पडू नये,हेच खरं.
नव्या रक्ताची ताज्या दमाची पोलिस हवालदार टेबलावर काठी आपटत धावून आली.. आम्हाला काय दुसरे उद्योग
नाहीत का घरगुती भांडणं सोडवायला..जा कोर्टात.
धरवत नाही सोडवतही नाही म्हणून चौकी रोजच्या तमाशाचा ठिकाणा बनवलाय.
तो बिचारा पती.. मनात म्हणत होता .. गेल्या जन्मी मी हिचं घोडं मारलं .. आता वचपा काढतीये.. आकाशिक मिटिंगमध्ये गुरु मातेनं बजावलं होतं..
प्रतिक्रिया तळतळाट देणं बंद करा..पुढच्या येणाऱ्या
————————————————————-
काळात स्वतःसाठीच वाईट भोग लिहून ठेवाल.
————————————————————-
त्यानं वाचिक हिंसा उलट दुरूत्तरे हे बंद केलं होतं.
कान जणु आतनं बंद ठेवले होते.
समोरच्यानं दुखावलं वाईट केलं तरी विसरायचंच.
————————————————————-
इथं ती काय वाईट करतीये त्रास देते हे विसरायचं.
दुर्लक्ष करायचं. चित्रगुप्ताचा लेखाजोखा कळला ना .. मग जुन्याची ही परतफेड आहे.
तिच्यासाठी चांगलं केलेलं विसरायचं..
अपेक्षा ठेवायच्या नाहीत.
——————————————–
आताची चांगली कर्मे ही तर भविष्यासाठी पेरणी.
——————————————————————
ती मात्र तिकडं किंचाळतच होती.. याच जन्मात फेडशील सगळं .. माझी बाजू सत्याची.. त्याचं शीतयुद्धाचं धोरण तिला डिवचत होतं.
याला मात्र दिसत होतं.. वाईट बोलू नका ऐकू नका पाहू नका सांगणाऱ्या तीन माकडांच्या शेजारी चवथं माकड..
वाईट विचारही करू नका हे हृदयावर हात ठेवून बजावणारे.
काय तोफखाना का गिरणीचा पट्टा आहेस का तू .. जा घरी .. डायरी हा पुरावा नाही धरला जात कोर्टात.
अहो राव .. बायको कंट्रोल नाही करत .. पोलिसांच्या डोक्याला खुराक..
तो काकुळतीला येऊन बोलला..
हो साहेब मी मोक्षासाठी प्रार्थना करतोय..
पण या बाईला सांगा वटसावित्रीला वडाला धागा नको बांधत जाऊस.
तशी ती करवादली.. सगळा हिशोब चुकता करायचा तर हा जन्म अपुरा पडेल.. पुढच्या जन्मांतही हवासच तू ..
अशी सोडून देईन का तुला??
जिवंतपणीच भुतासारखी झाड न सोडण्याचा हट्ट करणारी
ती.. त्यानं ठरवून टाकलं.. दर वटसावित्रीला तीन तीन उलट फेऱ्या मारत पिंपळाला धागा बांधीन .. पण हा हिशोब याच जन्मात संपो..चांगल्या वाईटाचा,पीडेचा.
हवं तर अशाच समदुःखी पीडितांना ही बरोबर घेउन.
कारण सिद्धांतानुसार पुढच्या जन्मात परत लाॅस ऑफ मेमरी होतो..काय वाईट केलं..या जन्मात ही कशाची फळं हा परत प्रश्न पडायला नको.
आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा..
तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं..
आणि इतरांनी तुमचं जे वाईट केलं.
आनंद नाही पण निदान मनःशांती तर राहते.
आपण सगळं करत राहतो.. चांगलं वाईट..
काही विसरतो ..आठवतही राहतो..
चांगलं वाईट…आपलं..दुसऱ्यांचंही.
चित्रगुप्ताला मात्र काहीच विसरून चालत नसतं.
काही आठवत राहणं शक्य होत नसतं.
कार्मिकाचा हिशोब ब्रह्मांडात चालूच राहतो.
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
400 words

