आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं यावरून…..
……. हसऱ्या चेहऱ्याचा दुखरा माणूस……
एक शेतकऱ्याचा मुलगा. परिस्थिती बेताचीच म्हणण्यापेक्षा त्याहीपेक्षा कमीच. अभ्यासात हुशार. परिस्थिती साथ देईना. सरकारी शाळेचे शिक्षण घेण्याचा निर्णय पक्का झाला. त्याला त्याच्या बुद्धिमत्तेवर शिक्षकांची फार मोठी मदत झाली. त्याची ज्ञान कसोटी ही फार कष्टातूनच त्याने मिळविली. शिक्षकांचे वारंवार प्रोत्साहन,मागे हटू नकोस. तू तुझ्या हुशारी वरच नक्कीच यशशिखर गाठणार हाच आमचा शब्द.
त्याच्या मेरिट वर त्याला चांगल्या हुद्याची नोकरी मिळाली पण तो लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढला नाही. आई-बाबांचे कष्ट त्याला सतत दिसत होते. ते डोळ्यासमोर ठेवून तो त्याला सुट्टी मिळाली की गावात जायचा व शेतात राबायचा. घराची व परिसराची स्वच्छता अगदी मनापासून करायचा. त्याचे मित्र त्याला म्हणायचे अरे तू एवढा उच्चपदस्थ तर अशा गोष्टी करण्यात तू तुझा वेळ व्यर्थ का घालवितो. ते त्याला घालून पाडून सुद्धा बोलायचे पण त्याने त्याकडेही दुर्लक्ष करून इतरांना मदत करणे सोडले नाही.
त्याच्याशी वाईट वागणाऱ्या मुलांचे अवगुण सुद्धा तो बाजूला सारून मदतच करायचा. त्या मुलांना वाटायचे की आपण एवढे त्याला त्रास देतो पण हा तर आपल्याशी आपुलकीनेच वागतो.
कालांतराने त्याला कळले की आपल्या ऑफिसची काही लोकांनी ट्रिप काढली आहे. सगळी व्यवस्था सुद्धा झाली आहे पण आपल्याला तर कोणीच काही विचारले नाही. इतका वाईट उद्देश असू शकतो त्यांचा आपल्याविषयी. त्याने सुद्धा काहीच ब्र काढला नाही.ट्रीप तर निघून गेली.दोन दिवस सुट्टीचे कसे काढावे कळले नाही.
रूमच्या बाहेर तो आला. कठड्यावर शांतपणे बसून बाजूलाच नदी वाहत होती त्याकडे त्याचे लक्ष गेले . नदीत विहरणारी बदके आनंदाने गटांगळ्या खात आनंद लुटत होती. नदीच्या बाहेर एक खड्डा तयार झाला होता. त्यात एक बदकाचे पिल्लू गाळ असल्यामुळे फसलं होतं. तोंडाने आवाज करीत तो आपल्या आईला आवाज देत होता. आई सुद्धा त्याला शोधत होतीच. आवाज ऐकल्यावर ती ताबडतोब बाहेर आली व आपल्या सवंगड्यांच्या मदतीने तिने आपल्या बाळाला बाहेर काढले. हा अनुभव त्याला त्या ट्रिप पेक्षा फारच महत्त्वाचा वाटला. हे दृश्य पाहून त्याचे सहकारी ट्रीपची मजा लुटत असणार हा विचार त्याच्या मनातून केव्हाच बाहेर पडला.
त्याचा एकच उद्देश होता की आपल्याला आनंदाने जगायचे असेल तर इतरांसाठी काय चांगले केले ते विसरणे व तुमच्याशी जे वाईट वागले त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करणे.
त्याच्या ऑफिसमध्ये पहिल्याच दिवशी आलेला भांबवलेला एक मुलगा त्याला एकटे पडू न देण्याचा त्याने विडा उचलला….
…. शब्द संख्या… ३३४….
……. अंजली आमलेकर……. १२/८/२५

छान कथा