हक्काची माणसं

inbound488083931242247137.jpg

#माझ्यातलीमी
#लघूकथालेखनटास्क(१२/१/२६)

#हक्काची माणसं

सुमेदा रडली नाही, चिडली नाही; तिने फक्त थांबणं निवडलं.
सासूबाई गेल्यानंतर घर सावरताना तिने स्वतःला कधीच प्रश्न विचारला नव्हता मला काय हवं?
धाकट्या दिराचं लग्न तिनेच जमवलं होतं. रिमाला घरात आणताना तिने विश्वास दिला होता हे घर तुझंच आहे.

पण संसार सुरू झाला तसं सुमेदाचं अस्तित्व गृहित धरलं गेलं.
रिमा नोकरी, थकवा, कारणं सांगत राहिली.
सुमेदा मात्र वेळ देत राहिली—घराला, नात्यांना, माणसांना.

एके दिवशी सुमेदाने शांतपणे सांगितलं,
“भांडण होण्याआधी आपण गोडीत वेगळं राहूया.”

रिमा आणि संतोष वेगळे झाले. मनात पटत नव्हतं, तरी सुमेदाने मन पक्कं केलं.
कारण स्त्री म्हणून तिने आता स्वतःच्या मर्यादा आखल्या होत्या.

एकदा सुमेदा आजारी होती. तिने रिमाला फोन करून दिराचा आणि मुलाचा डबा करायला सांगितलं.
रिमाने कारण देत टाळलं.
त्या क्षणी सुमेदाने काही बोललं नाही… पण मनात एक रेषा ओढली गेली.

काही महिन्यांनी रिमा आजारी पडली.
एकटीची जबाबदारी, ऑफिसचा ताण, घर—सगळं अंगावर आलं.
तिने सुमेदाला फोन केला.
सुमेदा लगेच तिला घरी घेऊन आली. औषधं, काळजी, दिराच सगळं केलं. कोणताही हिशेब नाही.बघितला

बरी झाल्यावर रिमाने माफी मागितली.
“वहिनी, पुन्हा एकत्र राहू या?”

सुमेदा शांतपणे म्हणाली,
“नाही. तुझी जबाबदारी तूच सांभाळ. सोयीसाठी एकत्र येणं मला मान्य नाही. मला गृहीत धरलं जाणं आवडत नाही.”

“रागावलात का?” रिमाने विचारलं.

“नाही,” सुमेदा म्हणाली,
“पण आत्मसन्मान जागा झाला आहे.”

रिमा आपल्या घरी गेली.
पण तेव्हापासून तिचं वागणं बदललं. कारणं संपली, मदत सुरू झाली.

एके दिवशी ती म्हणाली,
“वहिनी, मला कळलं .वेळेपेक्षा माणूस महत्त्वाचा असतो.”

सुमेदा तिचा हात हातात घेत म्हणाली,
“आणि वेळ देणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते. तेव्हाच नाती टिकतात, फुलतात.”

क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली,
“एकच लक्षात ठेव
हक्काची माणसं कारण देत नाहीत, वेळ देतात.”
©® मनगुंजन सीमा
सौ सीमा कुलकर्णी

error: Content is protected !!