#स्टोरीकट्टा

#स्टोरीकट्टा
#कथा लेखन
~अलका शिंदे
पुन्हा भेटशी नव्याने…

​२५ वर्षांनंतर… (भाग १)
​“हॅलो… प्रिया बोलतेय?”
​प्रियाने फोन घेतला आणि पलीकडून ऐकू आलेल्या आवाजाने ती क्षणभर विचारत पडली. हा आवाज खूप ओळखीचा होता.
​”हो… कोण?”
​“मी श्वेता बोलतेय… लक्षात आहे का?”
​प्रियाच्या डोक्यात एकदम वीज चमकल्यासारखं झालं. श्वेता, तिची कॉलेजमधली जिवाभावाची मैत्रीण! २५ वर्षांनी तिचा फोन आला होता. प्रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
​प्रिया: “अगं, श्वेता… कशी आहेस तू? किती दिवसांनी फोन केलास?”
​श्वेता: “मी ठीक आहे. तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. आपलं गेट-टुगेदर ठरलंय! सगळ्यांनी २५ वर्षांनी भेटायचं ठरवलंय. एका मोठ्या हॉटेलमध्ये कार्यक्रम आहे. तू येशील ना?”आणि हो मुलांनीं व्हाट्सअप ग्रुप केलाय त्यावर तु ऍड हो.
​प्रियाच्या मनात एकदम आनंदाची लहर उसळली. तिचं मन भूतकाळात धावलं. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतची मजा, ती आणि समीर… एका क्षणात तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं, पण पुढच्याच क्षणी तिला तिच्या नवऱ्याचा चेहरा आठवला आणि ती शांत झाली.
​रात्री जेवताना तिने मुलासमोर विषय काढला.
प्रिया: “गेट-टुगेदर आहे. माझ्या बालमित्र-मैत्रिणींनी ठरवलंय. मला जायचंय.”
​मुलगा खुश झाला.
मुलगा: “मम्मी, किती छान कल्पना आहे! इतक्या वर्षांनी तुम्ही भेटणार. तू छान तयार होऊन जा. साडी घालू नकोस, छानसा ड्रेस घाल, खूप सारे फोटो काढ.”
​पण प्रिया मात्र आपल्या नवऱ्याच्या डोळ्यांत पाहत होती. त्यांना हे आवडणार नाही, असंच तिला वाटत होतं. आणि झालंही तसंच.
नवरा: “असले कार्यक्रम मला आवडत नाहीत, माहिती आहे ना तुला? कशाला जायचंय?”
प्रिया शांत बसली. तिने काहीच उत्तर दिलं नाही.
​इकडे समीरलाही त्याच्या मित्राचा फोन आला.
“समीर, आपण सगळे २५ वर्षांनी भेटतोय. गेट-टुगेदर ठरलंय. तू येशील ना?”
​समीरच्या मनातही प्रियाचा चेहरा तरळला. तिला भेटण्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. तो बायकोकडे पाहिला. तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
बायको: “असा कुठे कार्यक्रम असतो? शाळेत घ्यायचा ना, हॉटेलमध्ये कशाला ठेवायचा?”
पण समीरने ठामपणे सांगितले की त्याला जायचं आहे. शेवटी ती तयार झाली.
​आज तो दिवस होता. एका मोठ्या हॉटेलमध्ये सगळे एकत्र येणार होते. हॉलमध्ये पाऊल ठेवल्यापासून समीरची नजर फक्त प्रियाला शोधत होती. अनेक चेहरे ओळखीचे वाटत होते, पण ती कुठेच दिसत नव्हती. तो सगळ्यांशी बोलत होता, हसत होता, पण त्या हसण्यामागे एक हुरहूर दडलेली होती.
​समीर एका कोपऱ्यात उभा राहून जुन्या मित्रांशी गप्पा मारत असतानाच, एका क्षणी त्याची नजर दरवाज्याकडे गेली. तिथे एक सुंदर स्त्री उभी होती. तिने निळ्या रंगाची साडी घातली होती, आणि तिच्या चेहऱ्यावर तेच शांत आणि निरागस हसू होतं. तिच्या गालावरची खळी आजही तशीच होती, जी कधीकाळी त्याच्या प्रेमात पडण्याचं कारण बनली होती. ती होती, प्रिया!
​दोघेही काही क्षण स्तब्ध झाले. २५ वर्षांचं अंतर एका क्षणात पार झालं. त्यांच्या चेहऱ्यांवर स्मितहास्य आलं, पण मनात एक वेगळीच भावना दाटून आली. ते दोघेही एकमेकांकडे फक्त बघत होते. समीरच्या ओठांवर एक लहानसं हसू आलं, पण मनातल्या मनात तो म्हणाला, “प्रिया, तू?” आणि प्रियाच्या ओठांवरही तेच हसू होतं.
​त्यांच्या नजरा जुळल्या आणि २५ वर्षांपूर्वीची ती कॉलेजमधली ओढ पुन्हा एकदा जाणवली. दोघेही फक्त लांबून एकमेकांकडे पहात होते.दूर वरूनही डोळे भावना जास्त व्यक्त करत होत्या. ते दोघेही एकमेकांसमोर आले. आता त्यांच्यात फक्त काही फुटांचे अंतर होते.पण ते कितीतरी मैलांच झालं होतं.प्रिया त्याला पाहूनही न पाहिल्यासारखं करत त्याच्या शेजारून निघून गेली होती जशी 25 वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यातून गेली होती काहीही न सांगता….. समीरला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर हवी होती.
मिळतील का त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं प्रिया बोलेल का त्याच्याशी पाहू पुढच्या भागात……. ~अलका शिंदे

646 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!