सौदर्य आपले आपले

सौदर्य सर्वांनाच आवडतं पण
काहींना चेहऱ्याचं तर, काहींना विचारांचं….

या वाक्यावरून कथा (२७/१०/२५)

सौदर्य आपले आपले ….

मराठीच्या बाईंनी “सौदर्य” या विषयावर निबंध लिहायला दिला होता. सर्वांनी आपापल्या परीने सौंदर्याचे वर्णन केले होते. बाई नेहमी चांगले निबंध वर्गात वाचून दाखवायच्या. आज त्यांनी माधवीचा निबंध वाचायला सुरुवात केली.

सौदर्य अनेक प्रकारचे असते. एक बाह्य सौदर्य यात मुख्य चेहऱ्याचे. कुणाचे नाक सुंदर असते, कुणाचे डोळे बोलके असतात तर कुणाच्या हासताना गालावर सुरेख खळी पडते. एखाद्याचे चालणे लक्ष वेधून घेते तर एखाद्याची देहबोली आकर्षक असते एखादी व्यक्ती गोरीगोमटी असते तर एखादी काळी सावळी पण स्मार्ट असते. यात केसांचे पण तेवढेच सौदर्य आहे. कुरळे,सरळ,लांब, छोटे. काळेभोर, सोनेरी. केसांचे सौदर्य डोळ्यात भरते. बाह्य सौदर्य हे आपल्या डोळ्यांना जाणवते व त्याचे प्रतिबिंब आपल्या मनात उमटते.

तसेच आवाजात पण सौदर्य असते. कुणाचा गोड व आपलासा वाटणारा, कुणाचा भारदस्त मनाचा ठाव घेणारा तर कुणाचा साधाच पण मनात वादळ निर्माण करणारा असतो. आपल्या कानांना हे सौदर्य आधी जाणवते व ते नंतर मनाच्या गाभाऱ्यात साठून राहते. आणखीन एक सौदर्य आहे मनाचे, विचारांचे, वागण्याचे, बोलण्याचे, बुध्दीमत्तेचे. पण हे जाणवायला थोडा वेळ लागतो. व्यक्तीच्या सहवासात बराच वेळ राहिल्या नंतर ते सौदर्य हळूहळू आपल्या मेंदूला जाणवते. एकदा हे सौदर्य जाणवले की, आपण त्या व्यक्तीचा आदर करायला लागतो. ती व्यक्ती आपल्या साठी आदर्श होते. देवाने प्रत्येकाला काही ना काही सौदर्य दिले आहे. ते बघण्याची सौदर्य दृष्टी डोळ्यांना, कानांना व मेंदूला हवी. या सौंदर्याचा गर्व न करता देवाचे वरदान समजून त्याचा चांगल्या साठी उपयोग करून आपले सौदर्य सत्कारणी लावावे. असे मला मनापासून वाटते.

बाईंचा निबंध वाचून झाल्यावर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.

शब्द संख्या : २५१

error: Content is protected !!