# माझ्यातली मी #
***** दीर्घ कथालेखन टास्क *****
कथेचे शीर्षक….. सूर्यास्ता आधीचे ग्रहण….
……….. भाग १……….
मी कॉलेजला असतांना आमची ट्रिप गेली होती. त्यावेळेस आमचा जिथे मुक्काम होता तेथे बाजूला एक वृद्धाश्रम होता. वृद्धाश्रमाचे नाव ‘संजीवनी वृद्धाश्रम ‘. बाहेर खूप मोठे अंगण होते. तिथेच एक मोठी बंगई होती. त्या बंगईवर एक आजी बसल्या होत्या. आम्ही काही जणी तिथे गेलो. त्या गप्पा मारायला खूप मोकळ्या होत्या. आम्ही त्यांच्याशी खूप मनमुराद गप्पा मारल्या. शेवटी मी त्यांना विचारले…. आजी,तुम्ही या वृद्धाश्रमात का आहात ? कशा काय आला आहात तुम्ही येथे ? आजी म्हणाल्या…. बाळा,माझ्याजवळ सगळं काही आहे पण मुलाचं सुख नाही. म्हणजे आजी… मुलाचं सुख नाही म्हणजे ! मग त्यांनी आम्हाला त्यांच्या घरातील संपूर्ण वृत्तांत सांगितला. आज तो माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. विशेष म्हणजे इतकी वर्षे झाली पण मला तो साकारता आला. आम्ही ज्या वेळेला तो वृत्तांत ऐकला त्यावेळेस आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटले.
घरात इन मीन दोन माणसे. आई,व मुलगा. घरातले वातावरण खूप छान होते. मुलगा स्वभावाने खूप चांगला होता व संस्कारी सुद्धा होता. तो अल्पवयीन असतांनाच त्याचे वडील अपघातात गेले. तेव्हापासून आईनेच त्याचा सांभाळ केला. आई पण खूप चांगली शिकलेली होती. वडिलांच्या जागेवर तिला नोकरी लागली. वडिलांची नोकरी ही उच्च दर्जाचीच होती त्यामुळे पैशा अडक्याचा प्रश्नच नव्हता. तिने मुलाला लाडा कोडात वाढविले.त्याचे सगळे शिक्षण पूर्ण केले. तिलाही वाटे की मुलाने खूप शिकावे व वडिलांचे नाव कमवावे. त्याने त्याची जाणच ठेवली.
लगेच एक वर्षाने त्याला नोकरी लागली. नोकरी सुद्धा उत्तम प्रकारची. नोकरी लागल्यानंतर दोन वर्षांनी त्याच्या मागे आईने लग्नाचा तगादा लावला. तो म्हणाला…. हो ग आई करतोय एक दोन वर्षात. तू घाई करू नकोस बरं. एक-दोन वर्ष निघून पण गेले पण तो लग्नाचं नावच काढेना. आईने परत त्याला विचारले…… शिरीष अरे वय वाढेल ना. कधी करणार लग्न. मुलीचे फोटो दाखवले ते तू बघत पण नाहीस. तुझ्या मनात कोणी आहे का ? तो हळूच म्हणाला…. हो आई, माझे शर्वरीवर खूप प्रेम आहे. तिच्याशीच मी लग्न करणार नाही तर करणार नाही. आईने ठरविले होते की त्याला नाराज करायचे नाही.
आईने तिच्या घरची माहिती काढून सगळे काही ठीक आहे समजल्यावर लग्नाला संमती दिली.मुलगी पण शिकलेली व नोकरी करणारीच होती. थाटामाटात लग्न पार पडले. एक महिना चांगला गेला व नंतर तिने आपले गुण दाखवायला सुरुवात केली. घरात मदत न करणे, सतत बाहेर जेवायला जाणे आणि नवऱ्याला ही स्वतःच्या हातातले बाहुले करून घेणे. शिरीष ला सुद्धा प्रश्न पडत होता कोणाची बाजू घ्यावी व कोणाची नाही. त्याला काही समजेना. कोणाला दुखवता येत नव्हते कारण इकडून आई आणि तिकडून बायको. इकडे आड तिकडे विहीर…. अशीच काहीतरी परिस्थिती त्याची झाली होती. बायकोने बरोबर त्याला आपल्या हातातलं कळसूत्र बाहुलं बनवलं होतं.
…. मला एक प्रश्न पडला की जिने आपल्याला लाडाकोडात लहानाचे मोठे केले, त्याची अक्कल कुठे गहाण पडली !
…………. भाग २……….
वर्ष,दोन वर्ष असंच सुरू होतं. तिला कल्पना येऊन गेली की हे असंच सुरू राहिलं तर आपला येथे कितपत टिकाव लागेल! तिने ‘संजीवनी वृद्धाश्रमाची’ ख्याती खूप ऐकली होती. तिने त्याची माहिती काढली. तिच्याच दोन मैत्रिणी अशाच घरगुती कारणामुळे तेथेच स्थायिक झाल्या होत्या. एक दिवस मुलगा व सून ड्युटीवर गेल्यावर तिने आश्रमाला भेट दिली. तेथे जाताच तेथील वातावरण तिला खूपच प्रसन्न वाटले. तिथला परिसर खूप रमणीय होता. खूप मोठी बाग, त्या बागेमध्ये वावरणारी वृद्ध मंडळी प्रसन्न दिसत होती. तेथे एक छोटेसे वाचनालय होते. तिला वाचनाची खूपच आवड होती. त्यामुळे आपण येथे आलो तर आपले सोनेच होईल. भरपूर मित्र-मैत्रिणींमध्ये वावरता येईल. आपण वयाच्या मानाने शरीराने धडधाकट तर आहोतच. आश्रमातील काही कामेही आपल्याला करता येतील. आता आपण संसारातून पाऊल काढूया आणि इकडे येण्याचा निर्णय पक्का करून आई परत घरी आली.
घरी आली तेव्हा रात्रच झाली होती. मुलगा व सून घरी आले होते. मुलाने विचारले….. आई,कुठे गेली होतीस ग तू? इतक्या वेळ तर तू कोठे जात नाहीस. असं कोणतं ग काम होतं तुझं! आई म्हणाली….. अरे मैत्रिणीकडे कार्यक्रम होता म्हणून गेले होते. जरा यायला उशीरच झाला. दिवसभर फिरल्यामुळे थोडासा थकवा आल्यासारखे तिला वाटले म्हणून ती बेडरूम मध्ये आराम करायला गेली. मुलगा व सून शांतपणे सोफ्यावर बसून होते. आई बाहेर आली नाही म्हणून मुलाने आवाज दिला.आई,येना ग बाहेर…जेवायचे नाही का? आतून आई म्हणाली…. मी थोड्या वेळाने जेवेन तुम्ही दोघे जेवून घ्या.
पाच-दहा मिनिटे दोघे तशीच बसून होती. शेवटी शर्वरी उठली व अन्न गरम करायला स्वयंपाक घरात गेली तर बघते तर काय स्वयंपाक तयारच नव्हता! तिने शिरीष ला आवाज दिला, म्हणाली अरे शिरीष, आईने तर स्वयंपाक केला नाही. आता काय करायचे. शिरीष आईच्या बेडरूममध्ये गेला व आईला झोप लागलेली बघून तो बाहेर आला. शर्वरीने विचारले…. का रे काय झाले? अगं तिला झोप लागली म्हणून मी उठविले नाही. शर्वरी पक्की. तिने आईला हलवून उठविले व स्वयंपाक न करण्याचे कारण विचारले. त्या म्हणाल्या… मी दिवसभर घरी नव्हते.तुमच्या समोरच मी घरी आले. केव्हा करणार मी स्वयंपाक ! आई ही थोडीशी पक्कीच झाली. तू करून घे नाहीतर बाहेर जेवायला जा. मला जेवायचे नाही. शर्वरी व शिरीष बाहेर जेवायला निघून गेले.
रात्री आईला झोप येत नव्हती. निर्णय तर पक्का होताच वृद्धाश्रमात जाण्याचा. तिथे जेव्हा भेट देऊन आली तेव्हा काहीजणांनी सांगितलेल्या कथा समोर येरझारा घालत होत्या. कोणी आपणहून आलेले, कोणी भूतकाळ विसरलेले, काही तर म्हणत होते आम्ही सर्व काही विसरून वर्तमान काळात जगायलाच इथे आलो. आलेला प्रत्येक दिवस आम्ही आनंदात घालवितो. इथे सगळे सण आम्ही साजरे करतो. आजीला सगळ्याच गोष्टीची आवड होतीच. आईला जगायला जो माहोल हवा होता तो या वृद्धाश्रमात तिला दिसला व तिने सकाळीच जाण्याचा निर्णय पक्का केला.
…………… भाग ३………..
दुसऱ्या दिवशी मुलगा व सून संध्याकाळचे बाहेर फिरायला गेले. घड्याळाचा काटा भरभर पुढे सरकू लागला. बघता बघता रात्रीचे बारा वाजले. आईच्या डोळ्याला डोळा लागला नाही. का बरं हे दोघे घरी आले नसतील ! या विचाराने मन सुन्न झाले व दारावरची बेल वाजली. याही वयात ताडकन उठून तिने दार उघडले. म्हणाली… बाळांनो,कुठे गेला होतात ? इतका उशीर का झाला? मुलाने लगेच म्हटले…. आई, तू झोपली नाहीस अजून! का वाट पाहते ग एवढी. अरे.. अजून जेवणं व्हायची आहेत. चला हात पाय धुऊन पटकन या बरं. इतके बोलून ती आत अन्न गरम करायला गेली. मुलगा आत गेला व त्याने हळूच आईला सांगितले आई ,आम्ही बाहेरूनच जेवण करून आलो आहोत. तू का वाट पाहतेस एवढी! झोपून जायचं न. आम्ही का आता लहान आहोत एवढी वाट बघायला. आम्हाला झोपू दे व तू पण झोपायला जा.
आई सुद्धा जेवली नव्हती. एक पेला पाणी पिऊन ती झोपायला गेली खरी पण झोप कसली लागते! विचारांच्या काहूराने तिला झोपूच दिले नाही. विचार करून ती थकली. एकदाची दिशा तर तिला मिळाली होतीच त्यामुळे शांतपणे ती झोपली. तिच्याजवळ पैसा भरपूर होता. तिने सकाळचे पाच वाजू दिले.वृद्धाश्रमाचा. नंबर डायल केला. त्यांना फोन करून तिने तिथे ऍडमिशन घेतली. एका तासात सगळे आवरून ती वृद्धाश्रमाच्या मार्गाला लागली. अतिशय मोठा वृद्धाश्रम होता तो. तिच्यासारख्याच वृद्ध माता-पित्यांना बघून तिचे डोळे भरून आले. वृद्धाश्रमात येण्यापूर्वी तिने मुलाला एक पत्र लिहून ठेवले होते.
………… प्रिय शिरीष ( बाळा )………..
तुला वाटेल आई घरातल्या घरात पत्र का लिहून ठेवतेस. तिला बोलायला का जात पण बेटा तुझ्याकडे माझ्यासाठी बोलायला वेळ तरी आहे का ? काल तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून मी तुला आवडतो म्हणून गोडाचा शिरा बनविला होता. आज तरी आपण सोबत जेवूया असे मला वाटले. पण माझी इच्छा अपूर्णच राहिली. तुम्ही दोघे बाहेरून जेवून आलात त्यामुळे मला कसे जेवण जाणार. मी माझ्या भुकेला पाण्याच्या घोटावर भूक भागविण्यास सांगितले. बरेच काही लिहायचे होते पण लिहू शकत नाही. एकमेकांची काळजी घ्या व दोघे सुखाने रहा.
…………. तुझी आई…………
सकाळी मुलाला जाग आली. रविवारच होता.नऊ वाजले होते. बाजूला बायको झोपलेलीच होती. आईने चहा केला असेल म्हणून तो डायनिंग कडे वळला पण त्याला घरात शुकशुकाट जाणवला. त्याने आईच्या बेडरूम मध्ये जाऊन बघितले तर त्याला चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी तिने उश्याशीच ठेवली होती. ती चिठ्ठी वाचून त्याचे डोळे भरून आले. प्रश्नार्थक मुद्रेने तो तसाच उभा राहिला. कोठे गेली असेल बरे आई! त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फोन केले. तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे सुद्धा फोन केले. एका मैत्रिणीने सांगितले तू एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन बघ कारण ती सारखी वृद्धाश्रमाविषयीच बोलत असायची. त्याने सगळे वृद्धाश्रम पालथे घातले.’ संजीवनी वृद्धाश्रमच फक्त बघायचा राहिला होता. शेवटी तो त्या वृद्धाश्रमात गेला व तेथेच त्याची आईची भेट झाली. त्याला खूप गदगदून आले. आई मला माफ कर. मी खूप चुकलो आहे. माफीच्या लायक नाही पण तरीसुद्धा आई मला माफ कर व आपल्या घरी चल.
थोड्यावेळ ती काहीच बोलली नाही. तिला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. तिलाही गहीवरून आले पण मनाची पक्की. ती म्हणाली…. बाळा, मी घरी येऊ शकत नाही. तुम्ही दोघे सुखाने राहा. मला तुमच्या संसारात आता लुडबुड करायची नाही. मी येथे माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत खुश आहे. ही तुझी ( अर्थात दोघांची ) पहिली चूक नव्हती. अशा तू खूप चुका केल्या आहेस. तू तर माझ्या रक्ताचा गोळा आहेस. तिला का दोष देऊ मी. आता माझी सहनशक्तीची मर्यादा संपली. तू पण आता विसरून जा आणि सुखाने संसार कर. फक्त एकच मागणं मागेन… की मला नात – नातू जर झाला तर त्याचा एकच फोटो मला पाठव . त्याकडे बघून मी येथे सुखात राहीन. मुलाला अश्रू आवरेनात. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. त्या अश्रूचे थेंब आईच्या पायावर पडले. ते पुसण्याचे नाटक करून त्याने आईला शेवटचा नमस्कार 🙏 केला व जड पावलाने पश्चातापाची शिदोरी घेऊन आपल्या गृही मार्गस्थ झाला……….
……….अंजली आमलेकर……….७/७/२५
